भारतासाठी जागतिक स्तरावर महत्त्वाची आणि अभिमानास्पद ठरणारी घडामोड घडली असून, मनी लाँडरिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठ्याविरोधातील लढ्यात अग्रणी भूमिका बजावणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या उपाध्यक्षपदी भारताची निवड झाली आहे. मध्य प्रदेश केडरचे वरिष्ठ आयएएस अधिकारी विवेक अग्रवाल यांची जुलै २०२६ ते जून २०२७ या कालावधीसाठी FATF चे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची आणि आर्थिक गुन्ह्यांविरोधातील लढ्यातील योगदानाची महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे. विशेष म्हणजे, पॅरिसस्थित FATF संस्थेमध्ये भारताला प्रथमच इतक्या महत्त्वाच्या नेतृत्वपदावर स्थान मिळाले आहे.
सध्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले विवेक अग्रवाल हे १९९४ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागात अतिरिक्त सचिव म्हणून काम करताना भारताच्या FATF परस्पर मूल्यांकन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०२४ मध्ये झालेल्या या मूल्यांकनात भारताने उल्लेखनीय कामगिरी केली होती, ज्यामुळे जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा अधिक मजबूत झाली.
अर्थ मंत्रालयाने या नियुक्तीचे स्वागत करत याला भारतासाठी “ऐतिहासिक क्षण” असे संबोधले आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार, FATF नेटवर्कमध्ये २०० हून अधिक देश आणि अधिकारक्षेत्रांचा समावेश आहे. अशा व्यापक नेटवर्कमध्ये भारताला मिळालेला हा सन्मान जगभरातील सदस्य राष्ट्रांनी भारतावर व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.
मंत्रालयाने असेही नमूद केले की, डिजिटल पेमेंट प्रणाली, आर्थिक पारदर्शकता आणि व्हर्च्युअल ॲसेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स (VASP) संदर्भातील जागतिक धोरणे तयार करण्यात भारताने बजावलेल्या सक्रिय भूमिकेमुळे देशाचे स्थान अधिक भक्कम झाले आहे. भारताने विकसित केलेल्या डिजिटल व्यवहार प्रणाली आणि आर्थिक देखरेखीच्या उपाययोजनांकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे.
विशेष म्हणजे, FATF च्या उपाध्यक्षपदामुळे भविष्यात संस्थेच्या अध्यक्षपदासाठी भारताची दावेदारी अधिक मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन वर्षांनंतर होणाऱ्या नेतृत्वबदलाच्या प्रक्रियेत भारताला FATF अध्यक्षपद मिळण्याचा मार्ग या नियुक्तीमुळे अधिक सुकर होऊ शकतो.
हे ही वाचा:
नीट परीक्षेसाठी नागपूरच्या विद्यार्थ्याला २,४०० किलोमीटर दूर अबूधाबीमधील परीक्षा केंद्र
नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणीचा पोलिसांवर हल्ला; केस ओढत, नखांनी ओरबाडले
कांदिवलीत बँकेत चोरीचा प्रयत्न, सराईत गुन्हेगार जेरबंद
कोलकाता विमानतळावर तृणमूल-भाजपचे कार्यकर्ते भिडले
FATF ही संस्था जागतिक आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या संस्थेत ४० सदस्य देश आहेत आणि ती मनी लाँडरिंग, दहशतवादी वित्तपुरवठा, संघटित आर्थिक गुन्हे आणि अवैध आर्थिक व्यवहार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानके निश्चित करते. सदस्य देशांच्या कायदेशीर आणि आर्थिक यंत्रणांचे मूल्यांकन करून आवश्यक सुधारणा सुचविण्याचे कामही FATF करते. १७ ते १९ जूनदरम्यान झालेल्या FATF च्या सहाव्या आणि अंतिम पूर्ण बैठकीत या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान एलिसा-द- एंडा मद्रझो यांनी भूषवले होते. बैठकीत आगामी काळातील FATF च्या प्राधान्यक्रमांनाही मंजुरी देण्यात आली.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना विवेक अग्रवाल यांनी ही जबाबदारी स्वीकारणे हा सन्मान असल्याचे सांगितले. जागतिक वित्तीय प्रणाली अधिक सुरक्षित, सर्वसमावेशक आणि लवचिक बनविण्यासाठी FATF सदस्य राष्ट्रांसोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले.







