विमानाला उशीर होत असल्याने एका प्रवाशाने इंडिगोच्या सहवैमानिकाला मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करणाऱ्या महिलेने या आरोपीच्या कृत्याचे समर्थन केले आहे. ‘विमान वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली असती तर ही घटना टाळता आली असती,’ असे मत तिने इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मांडले आहे. दिल्ली-गोवा विमानाच्या झालेल्या रखडपट्टीमुळे ही घटना घडल्याचे तिने सांगितले.
एव्जेनिया बेल्स्किया या प्रवाशाच्या मते विमानातील कर्मचाऱ्यांनी चांगल्या प्रकारे वागणूक दिली असती तर, ही घटना टाळता आली असती. ‘तो वाईट मुलगा नाही. मी असे म्हणत नाही की, हिंसक कृती योग्य होती. परंतु विमानताली सर्वच प्रवासी अस्वस्थ झाले होते,’ असे तिने स्पष्ट केले.
एव्जेनिया या विमानातून प्रवास करत नव्हती. तिची बहिण तिच्या टीममधील काही जण गोव्याला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होते. विमान तब्बल १२ तास उशिराने धावत असल्याबद्दल प्रवाशांनी जाब विचारताच इंडिगो एअरलाइन्सच्या वैमानिकाने याचा दोष प्रवाशांना दिल्याचा आरोप एव्हजेनिया यांनी केला आहे.
हे ही वाचा:
लाल समुद्रावरील परिणामांवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राकडून समितीची स्थापना!
अयोध्येने उघडला ‘गीता प्रेस’साठी नवा अध्याय!
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये जाण्यासाठी सज्ज
मंगेशकर कुटुंबियांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
प्रवाशांना आधीच विमानाने उड्डाण करण्याआधी सुमारे चार तास थांबावे लागले होते. त्यानंतर तब्बल चार तास अरुंद अशा एअरबस ए३२० नीओ एअरक्राफ्टमध्ये काढावे लागले. त्यातच प्रतीक्षाकाळात प्रवाशांना अन्नपदार्थ आणि पाणी दिले जाणार नाही, असे विमानातील कर्मचाऱ्यांनी सांगितले होते. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) सैनिक आल्यानंतर त्यांनी प्रवाशांना पाणी पुरवले, असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, उड्डाणाला उशीर होत असल्याचे सांगणाऱ्या वैमानिकाला मारहाण करणारा साहिल कटारिया या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.