विराट कोहलीच्या ९८ चेंडूतील ८४ धावांची संयमी खेळी, के राहुलच्या ४२ धावा आणि हार्दिक पंड्याची तडाखेबंद खेळी या जोरावर भारताने चॅम्पियम्स ट्रॉफी वनडे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला नमवून अंतिम फेरीत धडक मारली.
भारताची ही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची सलग तिसरी वेळ. ऑस्ट्रेलियाने ठेवलेले २६५ धावांचे आव्हान भारताने ४ विकेट्स गमावून पार केले.
हे ही वाचा:
संभलमधील जामा मशीद ‘विवादित स्थळ’
झारखंड: सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांचे तळ उध्वस्त!
हाकलेपर्यंत मुंडे यांनी वाट पाहिली…
उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार पान खाऊन थुंकला, अध्यक्षांनी दिली समज
ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा सामना करताना भारताचा शुभमन गिल आणि रोहित शर्मा झटपट माघारी परतले आणि २ बाद ४३ अशी भारताची स्थिती झाली. पण विराट आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी करून भारताची आणखी पडझड होऊ दिली नाही. श्रेयस ४५ धावांवर बाद झाल्यानंतर विराट आणि अक्षर पटेलने ४४ धावा जोडल्या.
के एल राहुलने मग विराटच्या साथीने ४७ धावांची भर घातली मात्र शतकाच्या जवळ पोहोचलेल्या विराटची खेळी चुकीच्या फटाक्यामुळे संपली. राहुलने ती निराशा व्यक्त केली. विराट बाद झाला तेव्हा भारताला ४४ चेंडूत ४० धावा हव्या होत्या.
नुकताच आलेल्या हार्दिकने सावध खेळ केला. धावा आणि चेंडू यात फारसा फरक नव्हता. अशात हार्दीकच्या पायाचा स्नायू दुखावला. त्यामुळे त्याला धावणे कठीण झाले. पण एकेरी धावा न काढता त्याने फटकेबाजी करण्याचे ठरवले. त्यात त्याने ३ षटकार आणि एक चौकार लगावून भारताला विजयासमीप आणले. मात्र असाच मोठा फटका खेळताना तो झेलचित झाला. मात्र भारताचा विजय टप्प्यात आला होता.
राहुलने शेवटी ४ धावा हव्या असताना षटकार खेचून सामना भारताच्या खात्यात जमा केला.
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू अर्थात विराट कोहली ठरला. त्याने वनडे कारकिर्दीतील ८ हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. भारताची आता अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड यांच्यातील विजेत्याशी झुंज होईल. ही उपांत्य लढत बुधवारी होत आहे.
स्कोअरबोर्ड : भारत २६७-६ (कोहली ८४, श्रेयस ४५, राहुल ४२*, एलिस २-४९, झम्पा २-६०) विजयी वि. ऑस्ट्रेलिया २६४ (स्मिथ ७३, कॅरे ६१, शमी ३-४८, जाडेजा २-४०, वरुण २-४९)