32.1 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरविशेषइंजिनिअरिंग डिझाइनसाठी स्वस्त, वेगवान भारतीय एआय मॉडेल

इंजिनिअरिंग डिझाइनसाठी स्वस्त, वेगवान भारतीय एआय मॉडेल

GPT-6 Astra पेक्षा १५० पट खर्च कमी

Google News Follow

भारतीय वंशाचे उद्योजक सॅम पासुपालक यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रासाठी खास कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल विकसित केले आहे. स्कायफॉल एआय या कंपनीने तयार केलेल्या ‘SKY-001’ या मॉडेलमुळे गुंतागुंतीच्या इंजिनिअरिंग डिझाइनची निर्मिती अधिक वेगाने आणि कमी खर्चात करता येऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, काही विशिष्ट चाचण्यांमध्ये या मॉडेलने ओपन एआयच्या GPT-6 Astra ला कामगिरीत मागे टाकले आहे.

काय आहे SKY-001 मॉडेल?

SKY-001 हे कॉम्प्युटर-एडेड डिझाइन (CAD) आणि बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (BIM) यांसारख्या तांत्रिक कामांसाठी विकसित करण्यात आले आहे. एखाद्या गुंतागुंतीच्या वस्तूचे किंवा इमारतीचे डिझाइन तयार करताना हे मॉडेल संपूर्ण रचना एकाच वेळी तयार करण्याऐवजी तिचे छोटे भाग करते. त्यानंतर प्रत्येक भाग कसा तयार करायचा, त्याचे स्केच कसे असतील आणि वेगवेगळे घटक एकमेकांशी कसे जोडले जातील, याचे नियोजन केले जाते.

इमारतीच्या डिझाइनमध्येही हे मॉडेल इमारतीच्या आराखड्याचे स्वतंत्र युनिट्स आणि खोल्यांमध्ये विभाजन करू शकते. त्यामुळे शेकडो किंवा हजारो टप्पे असलेल्या गुंतागुंतीच्या डिझाइनमध्ये प्रत्येक भागाचा संपूर्ण रचनेशी असलेला मेळ राखण्यास मदत होऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

SKY-001 आणि GPT-6 Astra यांची तुलना करताना कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम पासुपालक यांनी खर्च आणि वेगाबाबत महत्त्वाचे आकडे मांडले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, काही विशिष्ट इंजिनिअरिंग चाचण्यांमध्ये SKY-001 हे मॉडेल इतर प्रगत AI मॉडेल्सच्या तुलनेत ५१ ते १२५ पट वेगाने काम करू शकते. तसेच, तुलनात्मक चाचण्यांनुसार त्याचा खर्च १५० ते २१० पट कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

CAD चाचणीतील एका नमुन्याच्या निर्मितीसाठी SKY-001 चा खर्च ०.००५ डॉलर, तर GPT-6 Astra चा खर्च ०.७५ डॉलर असल्याचे कंपनीने दिलेल्या आकडेवारीत नमूद आहे. अचूकतेच्या बाबतीत SKY-001 ने ७९.७ टक्के, तर GPT-6 Astra ने ७९.१ टक्के गुण मिळवल्याचा दावा आहे. ही तुलना डिझाइनमधील साम्य मोजणाऱ्या Intersection over Union (IoU) या निकषावर आधारित आहे.

हे ही वाचा:

दहशतवादावर दुटप्पीपणा खपवून घेणार नाही!

पहलगाम हल्ल्याच्या तुलनेवरून वाद; वर्षभराने सोनू निगमची माफी

एशियन पॅरा गेम्समध्ये भालाफेकीत भारताचा डबल धमाका! रिंकूला सुवर्ण, अजित सिंहला रौप्य

प्रज्ञान ओझा टीम इंडियाचे नवे मुख्य निवडकर्ते

कोण आहेत सॅम पासुपालक?

सॅम पासुपालक हे ओडिशातील भुवनेश्वरचे उद्योजक असून सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे कार्यरत आहेत. ते स्कायफॉल एआयचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी कॅनडातील वॉटरलू विद्यापीठातून २०११ मध्ये गणित आणि संगणकशास्त्रातील पदवी घेतली. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून २०१९ मध्ये राजकारणशास्त्र आणि शासन विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. स्कायफॉल एआय सुरू करण्यापूर्वी त्यांनी २०११ मध्ये मालुबा या एआय संशोधन स्टार्टअपची सहस्थापना केली होती. २०१७ मध्ये मायक्रोसॉफ्टने या कंपनीचे अधिग्रहण केले. त्यानंतर २०२५ मध्ये त्यांनी स्कायफॉल एआयची स्थापना केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा