आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)ने कोलकात्याचे उपाध्यक्ष आणि प्रमुख प्रवक्ते राधारमण दास यांना संघटनेतील सर्व पदांवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय त्यांना माध्यमे, सरकारी यंत्रणा किंवा कोणत्याही सार्वजनिक व्यासपीठावर इस्कॉनचे प्रतिनिधित्व करण्यासही मनाई करण्यात आली आहे. इस्कॉनने हा निर्णय अंतर्गत शिस्तभंग आणि संघटनेच्या कार्यपद्धतीचे वारंवार उल्लंघन केल्याच्या कारणावरून घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात इस्कॉनने सांगितले की, राधारमण दास यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून, ते यापुढे इस्कॉनच्या वतीने कोणतेही सार्वजनिक वक्तव्य किंवा प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत. जगभरातील १०० हून अधिक देशांत कार्यरत असलेल्या इस्कॉनमध्ये निश्चित नियम, आचारसंहिता आणि प्रशासकीय प्रक्रिया आहेत. अनेक वर्षे त्यांना या नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले, मात्र त्यांनी वारंवार अधिकृत परवानगीशिवाय भूमिका घेतल्या आणि संघटनेच्या अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी विधाने केली, असा आरोप संस्थेने केला आहे.
इस्कॉनच्या म्हणण्यानुसार, राधारमण दास यांच्या काही कृतींमुळे जगभरातील इस्कॉनच्या सदस्यांच्या सुरक्षिततेवर आणि हितावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांना आत्मपरीक्षण करून आपली भूमिका सुधारण्याची संधी देण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.
दरम्यान, राधारमण दास यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे कारवाईची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांच्या निर्णयाचा आपण आदर करतो आणि त्याचे पालन करू. तसेच यापुढे इस्कॉनच्या वतीने कोणत्याही माध्यमाशी संवाद साधणार नाही किंवा सार्वजनिक वक्तव्य करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राधारमण दास यांनी आपल्या पोस्टमध्ये कारवाईमागील कारणांचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, बांगलादेशातील हिंदू आणि इस्कॉन भक्तांवरील कथित अत्याचारांबाबत सातत्याने सार्वजनिक भूमिका मांडणे, बांगलादेशातील कारागृहात असलेल्या चिन्मय कृष्ण प्रभूंना पाठिंबा देणे, इस्कॉनबाबत केलेल्या वक्तव्यावरून माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांना कायदेशीर नोटीस पाठवणे, विनोदी कलाकार सुरलीन कौर यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात सायबर तक्रार दाखल करणे, सनातन धर्माच्या समर्थनार्थ सार्वजनिक भूमिका घेणे आणि १९७६ मधील न्यूयॉर्क रथयात्रेशी संबंधित डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक संदर्भावरील सोशल मीडिया पोस्ट शेअर करणे, ही कारणे त्यांना सांगण्यात आली.
हे ही वाचा:
धार्मिक कार्यक्रमात आक्षेपार्ह प्रसारण; ‘जिओ न्यूज’वर १५ दिवसांची बंदी
आसाम-अरुणाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक प्रभावित
जर्मनीत ग्रुमिंग टोळीचे काळे कारनामे; सीरियन पुरुषांसह दोन पाकिस्तानी तरुणांना अटक
नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला फाशी!
या निर्णयाची पार्श्वभूमी पश्चिम बंगालमधील मध्यान्ह भोजन योजनेशी संबंधित वादाशीही जोडली जात आहे. राज्य सरकारने कोलकाता महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शाकाहारी मध्यान्ह भोजन तयार करून वितरित करण्यासाठी इस्कॉनची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर विरोधकांनी टीका केली होती. त्यावेळी राधारमण दास यांनी अंडीऐवजी पनीर, राजमा आणि सोयाबीनसारख्या वनस्पतीजन्य प्रथिनांचा समावेश करून मुलांच्या पोषणात कोणतीही तडजोड होणार नसल्याचे सांगितले होते.
