27.2 C
Mumbai
Tuesday, June 30, 2026
घरविशेषनसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला फाशी!

नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला फाशी!

अवघ्या दोन महिन्यांत पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल

Google News Follow

Related

राज्यभरात संतापाची लाट उसळवणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (२९ जून) ऐतिहासिक निकाल देत आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा गुन्हा “दुर्मिळात दुर्मिळ” स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट करत मृत्युदंडाची शिक्षा जाहीर केली. या प्रकरणात अवघ्या दोन महिन्यांच्या आत तपास, आरोपपत्र, सुनावणी आणि निकाल पूर्ण झाला असून, राज्यातील अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधील हा सर्वात जलदगतीने निकाली निघालेल्या खटल्यांपैकी एक ठरला आहे.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकाल देताना हा गुन्हा अत्यंत नियोजनबद्ध, क्रूर आणि अमानुष असल्याचे नमूद केले. अल्पवयीन व स्वतःचा बचाव करू न शकणाऱ्या निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. इतकेच नव्हे तर मृत्यूनंतरही तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याचे वैद्यकीय पुराव्यांतून स्पष्ट झाल्याचे न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितले की, आरोपीने स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी हा गुन्हा केला. या घटनेमुळे संपूर्ण समाज हादरला असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये समाजाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास टिकवून ठेवण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक आहे.

न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा आधार घेत हा गुन्हा “दुर्मिळात दुर्मिळ” श्रेणीत मोडत असल्याचे स्पष्ट केले. गुन्ह्यातील क्रूरता, पीडितेचे अत्यल्प वय, आरोपीची मानसिकता, समाजावर झालेला परिणाम आणि आरोपीमध्ये सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे निरीक्षण नोंदवत मृत्युदंड योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले. शिक्षा ठोठावताना न्यायालयाने आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही विचारात घेतला. यापूर्वीही त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे, एका महिलेवर हल्ला केल्याचे तसेच अन्य महिलांशी गैरवर्तन केल्याचे पुरावे न्यायालयासमोर आले. या सर्व घटनांमधून आरोपीमध्ये सुधारणेची शक्यता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज, डीएनए अहवाल, फॉरेन्सिक तपास, वैद्यकीय पुरावे, सायबर विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे आरोपीविरोधातील पुराव्यांची भक्कम साखळी उभी राहिली. न्यायालयाने तपास यंत्रणांनी सादर केलेले पुरावे आरोपीचा दोष सिद्ध करण्यासाठी पुरेसे असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात पोलिसांनी केवळ १६ दिवसांत आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने उन्हाळी सुट्टीनंतर या खटल्याला प्राधान्य देत सलग सुनावणी घेतली. एकूण ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली आणि अल्पावधीतच खटल्याचा निकाल देण्यात आला.

१ मे २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे आरोपी भीमराव कांबळे याने खाऊ देण्याच्या बहाण्याने साडेतीन वर्षांच्या मुलीला सोबत नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला. घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला हात धरून नेत असल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुलीही दिली होती.

हे ही वाचा:

सोन्याची चमक फिकी; चांदीतही घसरण

जागतिक बाजारात भारताची दमदार एन्ट्री; पाचवा सर्वात मोठा शेअर बाजार

नाकात टाकायचे औषध डोळ्यात टाकले? १९ महिन्यांच्या चिमुकल्याची गेली दृष्टी

जगाचा ‘बदला’ घेण्याच्या अजब आणि क्रूर इराद्याने वाटल्या विषारी गोळ्या

या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत अनेक ठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले होते. चिमुकलीच्या कुटुंबीयांनीही मृत्युदंडाची मागणी केली होती. सोमवारी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पीडित कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले, तर न्यायालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा