28.2 C
Mumbai
Monday, June 29, 2026
घरक्राईमनामापाकिस्तानचा सीमापार हल्ला, २९ दहशतवादी ठार केल्याचा दावा

पाकिस्तानचा सीमापार हल्ला, २९ दहशतवादी ठार केल्याचा दावा

तालिबानकडून नागरिकांच्या मृत्यूचा आरोप

Google News Follow

Related

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. अफगाणिस्तानच्या सीमेलगत पाकिस्तानने केलेल्या लष्करी कारवाईत २९ दहशतवादी ठार झाल्याचा दावा इस्लामाबादने केला आहे. मात्र, या कारवाईत दहशतवाद्यांबरोबरच अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याचा गंभीर आरोप अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने केला आहे. या घटनेमुळे दोन्ही देशांतील आधीच तणावपूर्ण असलेले संबंध आणखी बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानचे माहिती मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानातील पक्तिया, पक्तिका आणि कुनार या सीमावर्ती प्रांतांमध्ये दहशतवाद्यांच्या कथित तळांवर नियोजित लष्करी कारवाई करण्यात आली. या कारवाईत तीन प्रमुख लक्ष्ये उद्ध्वस्त करण्यात आली असून २९ दहशतवादी ठार झाल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, या भागांमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि त्याच्याशी संबंधित गट सक्रिय होते. पाकिस्तानमध्ये वाढत्या दहशतवादी कारवायांमागे या संघटनांचा हात असल्याचा आरोप इस्लामाबादने केला आहे.

दुसरीकडे, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पाकिस्तानच्या दाव्याला विरोध केला आहे. तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या हल्ल्यांमध्ये अनेक सामान्य नागरिक ठार झाले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी या कारवाईला “आक्रमणाचे भ्याड कृत्य” असे संबोधत पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

या सीमापार कारवाईच्या एक दिवस आधी पाकिस्तानातील कराची शहरात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. शनिवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास, स्फोटकांनी भरलेले वाहन सिंध रेंजर्सच्या इमारतीवर आदळवण्यात आले. त्यानंतर झालेल्या भीषण स्फोटानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा तळात घुसून अंदाधुंद गोळीबार केला आणि हातबॉम्ब फेकले. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर तातडीने सील करण्यात आला. नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जवळपास नव्वद मिनिटे चकमक सुरू होती. या कारवाईत विशेष सुरक्षा पथक (एसएसयू), दहशतवादविरोधी दल (एटीएफ) आणि सिंध रेंजर्सच्या जवानांनी संयुक्त मोहीम राबवली.

या हल्ल्यात चार पाकिस्तानी रेंजर्स जवानांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत सहा दहशतवादी ठार झाले, तर एक जखमी दहशतवादी जिवंत पकडण्यात आला. तो अफगाण नागरिक असल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे. कराचीतील या हल्ल्याची जबाबदारी जमात-उल-अहरार या संघटनेने स्वीकारली आहे. हा गट तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) मधून फुटून तयार झाला असून पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचे नाव समोर आले आहे. याच हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने दुसऱ्याच दिवशी सीमावर्ती भागात लष्करी कारवाई करत जमात-उल-अहरार आणि टीटीपीशी संबंधित दहशतवाद्यांना लक्ष्य केल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा:

जागतिक बाजारात भारताची दमदार एन्ट्री; पाचवा सर्वात मोठा शेअर बाजार

नाकात टाकायचे औषध डोळ्यात टाकले? १९ महिन्यांच्या चिमुकल्याची गेली दृष्टी

जगाचा ‘बदला’ घेण्याच्या अजब आणि क्रूर इराद्याने वाटल्या विषारी गोळ्या

AI वर अतिविश्वास ‘फोर्ड’ला पडला महागात; अनुभवी अभियंत्यांना पुन्हा बोलावले

गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमा संघर्ष सातत्याने वाढत आहे. तीन आठवड्यांपूर्वीही पाकिस्तानने अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या कथित तळांवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर आता जमिनीवरील कारवाई करण्यात आल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) हा दोन्ही देशांमधील तणावाचा प्रमुख मुद्दा बनला आहे. पाकिस्तानचा आरोप आहे की, अफगाणिस्तानातील तालिबान सरकार टीटीपीच्या दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देत आहे आणि त्यांच्याच मदतीने पाकिस्तानमध्ये हल्ले घडवले जात आहेत मात्र, अफगाणिस्तानने हे आरोप वारंवार फेटाळले आहेत. काबूलचे म्हणणे आहे की, त्यांच्या भूमीचा वापर कोणत्याही देशाविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी होऊ दिला जात नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा