27.5 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरविशेषचापेकरांच्या प्रखर राष्ट्रभक्ती आणि शौर्याचे स्मरण

चापेकरांच्या प्रखर राष्ट्रभक्ती आणि शौर्याचे स्मरण

Google News Follow

Related

दामोदर हरी चापेकर हे चापेकर बंधूंमधील ज्येष्ठ. रँडच्या वधाबद्दल सर्व चापेकर बंधूंना फाशी देण्यात आली. त्यांनी क्रांतिकार्यात दिलेले बलीदान कधीही विसरता येणारे नाही. कर्तृत्ववान अशा चापेकर बंधूंबद्दल गैरसमज, अपसमज पसरविण्यात काहीजणांना आनंद मिळतो. दामोदर चापेकर यांच्या १८ एप्रिल (१८९८) या पुण्यतिथीनिमित्त चापेकर बंधूंच्या या क्रांतिकार्याचे स्मरण.

संपूर्ण राष्ट्र ज्यावेळी शस्त्रदृष्ट्या मृतवत होते त्यावेळी बलाढ्य राष्ट्र पराभुत राष्ट्राला आपल्या टाचेखाली चिरडून टाकते. अशावेळी परकीय राजसत्तेच्या दडपशाहीविरुद्ध आपण काही करू शकतो हा आत्मविश्वासच मरून जातो. पारतंत्र्यातील जनता पराभूत मानसिकतेत जगत असते. त्यामुळे तिथली जनता परकीय आक्रमक सत्तेची दास बनून जीवन कंठत असते. अशा परिस्थितीत आपल्या बांधवांमधला आत्मविश्वास जागा करण्यासाठी आणि उन्मत्त परकीय राजसत्तेला हादरा देण्यासाठी आपल्या देशातील वीर बांधव जेव्हा प्रत्याघाताची कृत्ये करतात ती समर्थनीय असतात. अशा आशयाचे उद्गार लोकमान्य टिळकांनी काढून क्रांतिकारक तरुणांना पाठबळ दिले.

चापेकरांच्या शौर्याला क्रौर्य ठरवून त्यांच्या राष्ट्रभक्ती विषयी शंका निर्माण करण्याचे काम आपल्याच देशातल्या काही बांधवांनी केले. रँडचा केलेला वध घातकी परंपरा निर्माण करतो असे उद्गार काढून आक्रमणाला प्रत्याक्रमणाने उत्तर देणाऱ्या आणि क्षात्रतेजाने तळपणाऱ्या वीरांचा अवमान केला गेला. असे असले तरी चापेकर यांच्या जीवनावर नाशिक मधल्या अनंत वामन बर्वे या राष्ट्रभक्ताने लोकमत विजय नावाचे नाटक लिहिले. या नाटकाचे प्रयोग माणिकप्रभू ड्रामॅटिक कंपनीने १४,१९ आणि २० नोव्हेंबर १८९८ या दिवशी पुण्यात केले. तसे प्रयोग नाशिकलाही करण्यात आले. पण तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना या नाटकातला कोणताही प्रसंग आणि प्रवेश आक्षेपार्ह आढळला नाही. पण महाडला २३ डिसेंबर १८९८ या दिवशी याच नाटकाचा जो प्रयोग घोषित करण्यात आला तो मात्र तिथल्या दंडाधिकाऱ्यांने आक्षेप घेऊन बंद पाडला.

दंडाधिकारी एस.आर.आर्थर याने वृत्तपत्राच्या साप्ताहिक सरकारी प्रतीवृत्ताला कळवून नाटकातल्या एकतंत्री, उन्माद इत्यादी पात्राच्या प्रतिपादनाचा दुष्ट हेतू दाखवला आणि १८९८ च्या ५ व्या निर्बंधा खाली या नाटकाच्या प्रयोगावर २३ डिसेंबर १८९८ या दिवशी बंदी घातली. ही बंदी ऐकताच विद्याभूषण प्रेस नाशिकच्या पत्त्यावरून या नाटकाचे लेखक अनंत वामन बर्वे यांनी ८ एप्रिल १८९९ या दिवशी राज्यपालांकडे एक आवेदन केले. या आवेदनात त्यांनी लिहिले…

“सदर नाटकाचे काही प्रयोग पुणे नाशिकला आधी झाले. या प्रयोगावर आक्षेप घेण्यासारखे सरकारला काही आढळले नाही. त्यामुळे या नाटकावर सध्या घालण्यात आलेली बंदी अपसमजावर आधारलेली आहे. उलट सरकार आणि हिंदुस्तान यांच्यातले बंद घट्ट करण्याचा आपला हेतू आहे. अक्षेप कळले तर आपण त्याचे स्वागत करू.” यावर मत मागण्यात येताच लोकमान्य टिळकांना विचार स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून गौरवून भारत मंत्री त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत असे दाखवण्याचा नाटकाचा प्रयत्न आहे. म्हणून ते आक्षेपार्ह आहे असा अभिप्राय ओरिएंट ट्रान्सलेटरने सरकारकडे व्यक्त केला आणि बर्व्यांच्या आवेदनाचा नाटकावरची बंदी उठवण्यासाठी काही उपयोग झाला नाही.

हे ही वाचा:

प्रशासनाने मनमानी करून कार्यक्रम केलेला नाही!

श्रीराम मंदिरासाठी १ कोटी देणारे महंत कनक बिहारी दासजी महाराज यांचे अपघाती निधन

मुंबई विमानतळावर जप्त केले १६ कोटी रुपयांचे हेरॉईन

सीरियात मशरूम पिकवणाऱ्या ३१ शेतकऱ्यांची हत्या

चापेकर बंधूंच्या शौर्याचा परिणाम हिंदुस्थानी जनतेच्या मन बुद्धीवर ठसत असलेला पाहून ब्रिटिश सरकारने एक षडयंत्र रचले. लंडन टाईम्सच्या परराष्ट्रीय आणि साम्राज्यविषयक विभागाचे मुख्य असलेले सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी इंडियन अनरेस्ट या नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात चापेकर यांचे वर्णन करताना चिरोल लिहितो… One of Tilak’s disciples, who was soon to aquire sinister notority. (भावार्थ- लवकरच दुष्टपणाची प्रसिद्धी मिळवणार होता. असा टिळकांच्या शिष्यांपैकी एक.)

त्याच बरोबर चिरोल पुढे लिहितो… 
“The same young man… Declared that it was the doctrine expounded in Tilak’s newspaper that had driven him to the deed. The murders (of Rand and Ayerst) who had mare given effect to teaching of Tilak was sentenced to death, but Tilak himself, who was prosecuted for a seditious article published a few days before the murder, received only a short term of imprisonment.”

(भावार्थ- त्याच तरुण माणसाने म्हटले की, टिळकांच्या वृत्तपत्रात प्रतिपादण्यात आलेल्या तत्वज्ञान यामुळेच आपल्याला हे कृत्य करायला प्रवृत्त केले. टिळकांची शिकवण फक्त कृतीत आणली, त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली; तथापि वधा पूर्वी थोड्या दिवस आधी प्रसिद्ध झालेल्या राजद्रोही लेखासंबंधात ज्यांच्यावर अभियोग भरण्यात आला, त्या टिळकांना स्वतःला मात्र थोड्या अवधीच्या कारावासाची शिक्षा झाली.)

चिरोळचे हे विधान निखालस खोटे आहे. ही सारी विधाने टिळकांची मानहानी करणारी होती. म्हणून लोकमान्य टिळकांनी मंडालेहून सुटून आल्यानंतर चिरोल वर इंग्लंड मध्ये मानहानीचा दावा केला. यासंबंधात विशेष अधिकारी माँटेगोमेरी यांनी म्हटले, “Most definite part of the passage that purporting to give an account of Chapekers own statement, is certainly wrong, as there was no reference either in the confusion or his autobiography…to Tilak’s papers. It was impossible to prove… It cannot be argued that these articles incited Chapekar to murder Mr Rand.”

(भावार्थ-वरील उताऱ्यातल्या चापेकर यांच्या स्वतःच्या निवेदनाचा आशय द्यायचा प्रयत्न करणारा अगदी विविक्षित भाग तर निश्चितच चुकीचा आहे; कारण त्याच्या स्वीकारोक्तित किंवा कारागृहात लिहिलेल्या आत्मचरित्रात टिळकांच्या वृत्तपत्रांचा निर्देश आढळत नाही. चापेकरला या लेखांनी श्री रॅंडचा वध करायला चिथावणी दिली असे प्रतिपादता येणार नाही…. असे सिद्ध करणे तर केवळ अशक्य आहे.) 

वर्ष १८९७ मध्ये मारल्या गेलेल्या रँड आणि आयर्स्ट अधिकऱ्यांचा गौरव व्हावा म्हणून गणेशखिंडी रस्त्यावर ज्या ठिकाणी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला शेतात ब्रिटिश सरकारने एक स्मारक स्तंभ उभारला. त्यानंतर आपण स्वातंत्र्य प्राप्त केल्यावर त्या इंग्रज अधिकाऱ्यांचे स्मारक महाराष्ट्र सरकारने तसेच उभे ठेवावे याचा पुण्यातल्या तरुणांना राग आला. ३१ ऑक्टोबर १९६५ या दिवशी रात्री कोणालाही कल्पना नसताना एका तेजस्वी तरुणाने ते स्मारक उद्ध्वस्त करून टाकले. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली.

इंग्रज सरकारच्या अत्याचाराचा प्रतिशोध म्हणून २१ जुलै १९३१ या दिवशी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वाडिया ग्रंथालयात गोळ्या झाडणारे बेडर क्रांतिकारक वासुदेव बळवंत गोगटे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने जो निधी त्यांच्या चाहात्यांनी जमवला होता तो त्यांनी चापेकर यांच्या पुतळ्यासाठी खर्च करण्यासाठी दिला. त्यातूनच वरील ठिकाणी दामोदर हरी चापेकर यांचा स्फूर्तिदायी अर्धपुतळा उभारण्यात आला. त्यांच्यासमवेत ज्यांनी हौतात्म्य पत्करले अशा त्यांच्या सहकारी क्रांतिकारकांची नावे कोरण्यात आली.

दामोदरपंत चापेकरांच्या ७३ व्या स्मृतिदिनी म्हणजे १८ एप्रिल १९७१ या दिवशी पुण्याचे महापौर नामदेवराव मते यांच्या अध्यक्षतेखाली थाटामाटात समारंभपूर्वक चापेकर यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. देश स्वातंत्र्याच्या लालसेने इंग्रज अधिकाऱ्यांना कंठस्नान घालून धैर्याने फाशी जाणाऱ्या क्रांतिकारकांची परंपरा हिंदुस्थानमध्ये चापेकर बंधूंनी सुरू केली. शत्रूला फितुर होणाऱ्या देशबांधवांना सुद्धा यमसदनी पाठवण्याचे धैर्य क्रांतिकारकांची परंपरा जोपासणाऱ्या चापेकर आणि रानडे यांनी सुरू ठेवली. अशा या देशभक्त क्रांतिकारकांविषयी अभिमान व्यक्त करण्याची परंपरा आपण जोपासलीच पाहिजे. अन्यथा शौर्याला ही क्रौर्य ठरवण्याची परंपरा या पुण्य भूमीत बांडगुळासारखी वाढत राहील.

दुर्गेश जयवंत परुळकर
   व्याख्याते आणि लेखक

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा