26 C
Mumbai
Wednesday, July 17, 2024
घरविशेषइंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा "लाल"

इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”

Google News Follow

Related

माझ्या अंगावरील  काठीचा प्रत्येक प्रहार  ब्रिटिश साम्राज्य उध्वस्त करेल … हे शब्द आहेत महान स्वातंत्र्यसैनिक लाला लजपत राय यांचे.  इंग्रजांना विरोध करताना झालेल्या  लाठीचार्जमध्ये जखमी झाल्यानंतर  लाला लजपतराय यांनी हे आवाहन दिले. त्याचे म्हणणे खरे ठरले. या घटनेच्या दोन दशकांतच भारतातून ब्रिटीश साम्राज्याचे नाव पुसले गेले.  पंजाब केसरी म्हणूनही ओळखले जाणाऱ्या लाला लजपतराय यांची २८ जानेवारी जयंती. त्यानिमित्ताने जाणून घेऊ या जहाल क्रांतिकारकांच्या वाटचालीबद्दल …

लाला लजपतराय निस्सिम देशभक्त, शुर स्वातंत्र्य सैनिक आणि एक चांगले नेता तर होतेच तसेच ते एक उत्तम लेखक, वकील, समाज – सुधारक आणि आर्य समाजी देखील होते. लाला लजपत राय यांचा जन्म २८ जानेवारी १८६५ ला धुडिके या गावी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री राधाकृष्ण जी आणि आईचे नाव श्रीमती गुलाब देवी जी असे होते. त्यांचे वडिल सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. लालाजींच्या परिवारातील संस्कारांनीच त्यांना देशभक्तीच्या कार्याची प्रेरणा दिली होती. शालेय   शिक्षण पुर्ण केल्यानंतर  कायद्याचे शिक्षण घेण्याकरीता लाहौर येथे सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पदवी मिळवली. काही काळ त्यांनी वकीली देखील केली पण नंतर बॅंकिंग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला. लाहोरमध्ये पंजाब नॅशनल बॅंक व लक्ष्मी विमा कंपनीची स्थापना करण्यात अहत्वाची भूमिका बजावणारे म्हणूनही लाला लजपतराय यांचे नाव घेतले जाते .

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहालवादी गटाची ओळख लाल-बाल-पाल अशी होती. त्यामध्ये लाला लजपत राय यांचा समावेश होता.  लाला लजपत राय हे भारतातील प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते. लाल-बाल-पालच्या नेतृत्वाला देशभरातून मोठे जनसमर्थन मिळत होते, त्यामुळे इंग्रजांची झोप उडाली होती. आपल्या मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांनी ब्रिटनमध्ये उत्पादित वस्तूंवर बहिष्कार टाकून आणि व्यापारी संस्थांमध्ये संप करून ब्रिटिश सरकारचा विरोध केला. स्वावलंबन साध्य करण्याच्या बाजूने असलेले लाला लजपतराय त्यांच्या विचारांच्या स्पष्टतेमुळे एक आक्रमक नेता म्हणून खूप लोकप्रिय झाले. देशात भूकंप आणि दुष्काळ असताना ब्रिटिश सरकार ढिम्म होते. काहीही न करता हातावर हात ठेवून बसले होते. लाला लजपतराय यांना स्वस्थ बसवले नाही.१८९७ आणि १८९९ मध्ये   त्यांनी तन, मन, धनाने देशातील दुष्काळ ग्रस्तांची सेवा केली. लालाजींनी स्थानिक लोकांसोबत अनेक ठिकाणी दुष्काळात छावण्या उभारून लोकांची सेवा केली.

१९०५ मध्ये बंगालची फाळणी झाली त्यावेळी लाला लजपत राय यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि विपिनचंद्र पाल यांसारख्या आंदोलकांशी हातमिळवणी केली आणि या त्रिकुटाने ब्रिटीश शासनाला सळो की पळो करून सोडले . या तिघांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात असे काही नवनवीन प्रयोग केले जे त्या काळातील अत्यंत अभिनव असे होते.

पंजाबमध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध तीव्र आंदोलन

लाला लजपत राय ऑक्टोबर १९१७ मध्ये अमेरिकेत पोहोचले, जिथे त्यांनी न्यूयॉर्क शहरात इंडियन होम रूल लीग ऑफ अमेरिका नावाची संस्था स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून ते तेथून स्वातंत्र्याची ठिणगी पेटवत राहिले. २०फेब्रुवारी १९२० रोजी लालाजी तीन वर्षांनी भारतात परतले, तोपर्यंत ते देशवासीयांसाठी एक महान नायक बनले होते. कलकत्ता येथे काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाच्या अध्यक्षतेसाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या विरोधात त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध तीव्र आंदोलन केले. गांधींनी १९२०मध्ये असहकार चळवळ सुरू केली तेव्हा त्यांनी पंजाबमध्ये चळवळीचे नेतृत्व केले आणि काँग्रेस स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.

 देश “सायमन गो बॅक” च्या घोषणांनी दुमदुमला

३ फेब्रुवारी १९२८ रोजी जेव्हा सायमन कमिशन भारतात आले तेव्हा लालाजींनीही या आयोगाला विरोध करण्यास सुरुवात केली.   भारतातील कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी सायमन कमिशन आलं होतं. मात्र, सायमन कमिशनमध्ये कोणताही भारतीय नव्हता. त्यामुळे या आयोगाच्या विरोधात संपूर्ण देशात आक्रोश निर्माण झाला . कमिशन भारतात आल्यानंतर त्याच्या निषेधाची आग देशभर पसरली. चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन पुकारल्यानंतर स्वातंत्र्यलढ्यात आलेली स्तब्धता मोडीत निघाली. लोक पुन्हा रस्त्यावर येऊ लागले.   संपूर्ण देश “सायमन गो बॅक” च्या घोषणांनी दुमदुमून गेला.

  काठीचा प्रत्येक प्रहार  ब्रिटिश साम्राज्य उध्वस्त करेल

सायमन कमिशनच्या निषेधार्थ, क्रांतिकारकांनी ३०ऑक्टोबर १९२८  रोजी लाहोरमध्ये निषेध निदर्शने आयोजित केली होती. ज्याचे नेतृत्व लालाजी करत होते. या निदर्शनात जमलेली गर्दी पाहून इंग्रज घाबरले. या कामगिरीने घाबरलेल्या इंग्रजांनी लालाजी आणि त्यांच्या टीमला लाठीमार केला. यात सहभागी तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. लाला लजपतराय इंग्रजांच्या या लाठीला घाबरले नाहीत आणि त्यांचा कठोरपणे सामना केला. या लाठीचार्जमध्ये लालाजी गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. माझ्या अंगावरील  काठीचा प्रत्येक प्रहार  ब्रिटिश साम्राज्य उध्वस्त करेल असे लालजींनी निक्षून सांगितले.. पण दुर्दैवाने या घटनेनंतर काही दिवसांनी १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले.लालाजींच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. एक महिन्यातच चंद्रशेखर आजाद, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांनी लालाजींच्या हत्येचा बदला घेतला. १७ डिसेंबर १९२८ ला ब्रिटीश पोलीस अधिकारी सँडर्स यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांना केवळ लालाजींच्या मृत्यूच्या बदल्यात सँडर्सच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा झाली. ब्रिटींशांच्या सत्तेचा पाया खिळखिळा करण्यात लालाजींचा वाटाही तितकाच मोठा होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा