केरळमधील वायनाड जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. मेप्पाडीजवळ सुरू असलेल्या बोगदा (टनल) प्रकल्पाच्या ठिकाणी अचानक भूस्खलन होऊन मातीचा प्रचंड ढिगारा रस्त्यावर आणि बांधकाम परिसरात कोसळला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून किमान पाच जण जखमी झाले आहेत. शिवाय अनेक कामगार आणि नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
ही घटना वायनाडमधील कल्लडी-मेप्पाडी परिसरात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी बोगदा रस्ता प्रकल्पाजवळ घडली. मुसळधार पावसामुळे साचलेली माती अचानक घसरून खाली आली आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसर चिखल व मातीच्या ढिगाऱ्याखाली गेला. दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात लोक जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी “लवकर पळा”असा इशारा देत लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितल्याचेही व्हिडिओत ऐकू येते.
भूस्खलनानंतर परिसरातील रस्ता आणि पूल पूर्णपणे मातीने झाकला गेला. त्यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन जेसीबी, उत्खनन यंत्रे आणि विशेष शोध पथके तैनात करण्यात आली आहेत. बचाव पथके प्रत्येक भागाची तपासणी करत असून जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सदर बोगदा प्रकल्प हा अनक्कमपोयिल-कल्लडी-मेप्पाडी मार्गाचा महत्त्वाचा भाग असून, कोझिकोड आणि वायनाड यांतील संपर्क अधिक जलद व सुरक्षित करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जात आहे. मात्र, सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या भागात भूस्खलनाचा धोका वाढला असून प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
हे ही वाचा:
भारत- इंडोनेशियामध्ये २० सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या; ब्रह्मोस क्षेपणास्त्र सहकार्यालाही गती
पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान
सावधान! पाकिस्तानी ‘गोरी’सह तीन ब्युटी क्रीम आरोग्यासाठी घातक
भारत-बांगलादेश सीमेतून अवैध घुसखोरी करणाऱ्या रॅकेटमधील १५ जणांना कारावास
केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (KSDMA) नागरिकांना डोंगराळ भागात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा कायम ठेवला असून पुढील काही दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली आहे. प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून बचावकार्य पूर्ण होईपर्यंत परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
