32 C
Mumbai
Monday, June 1, 2026
घरविशेषस्वरांचा तो निर्मळ झरा अखेर थांबला... सुमन कल्याणपूर यांचे निधन

स्वरांचा तो निर्मळ झरा अखेर थांबला… सुमन कल्याणपूर यांचे निधन

Google News Follow

Related

मराठी आणि हिंदी संगीतविश्वाला आपल्या मधुर, सात्विक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या आवाजाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे आज, ३१ मे रोजी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वातील एक सुवर्णपान कायमचे मिटले असून चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

सुमन कल्याणपूर… हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभा राहतो तो एक शांत, सोज्वळ आणि प्रसन्न चेहरा. कानात घुमू लागतो तो मधासारखा गोड, निर्मळ आणि भावस्पर्शी स्वर. प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून केवळ आपल्या गाण्यांच्या बळावर लाखो रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या या स्वरसम्राज्ञी आज काळाच्या पडद्याआड गेल्या.

२८ जानेवारी १९३८ रोजी ढाका (आताचा बांगलादेश) येथे त्यांचा जन्म झाला. लग्नापूर्वी त्यांचे नाव सुमन हेमाडी होते. वडील शंकरराव हेमाडी हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यांच्या बदलीमुळे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले आणि याच मुंबईत सुमनताईंच्या कलाप्रवासाला खरी दिशा मिळाली.

सुरुवातीला त्यांना चित्रकलेची विशेष आवड होती. मात्र नियतीने त्यांच्या कंठात असे काही सूर ठेवले होते की त्यांना संगीताच्या विश्वातच यायचे होते. पंडित लक्ष्मणराव अमृते यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आणि आपल्या सुरेल प्रवासाची भक्कम पायाभरणी केली.

रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाहानंतर त्या सुमन कल्याणपूर या नावाने सर्वत्र परिचित झाल्या. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी त्यांनी चित्रपटासाठी पहिले पार्श्वगायन केले. त्यांच्या आवाजातील गोडवा ऐकून सुप्रसिद्ध गायक तलत महमूद इतके प्रभावित झाले की त्यांनी स्वतः HMV कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर मात्र सुमनताईंच्या स्वरांची घोडदौड सुरू झाली.

सुरुवातीच्या काळात त्यांच्या आवाजाचे लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साम्य असल्याचे म्हटले गेले. काहींनी त्यांना “दुसरी लता” असेही संबोधले. पण सुमनताईंनी कधीही त्याबद्दल कटुता बाळगली नाही. त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि आपल्या नम्र स्वभावाने सर्वांची मने जिंकली.

मराठी भावगीत, भक्तिगीत, चित्रपटगीते आणि बालगीतांच्या विश्वात त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या आवाजाने अक्षरशः एक पिढी वेडी झाली होती.

“जिथे सागरा धरणी मिळते” म्हणत प्रियकराची वाट पाहणारी प्रेयसी,
“घाल घाल पिंगा वार्या” म्हणत माहेरच्या आठवणीत हरवलेली सासुरवाशीण,
“निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला” ही लेकरांना कुशीत घेणारी अंगाई,
“कशी गवळण राधा बावरली” ही कृष्णभक्तीत रमलेली गवळण,
“सांज आली दुरातुनी” या विरहाच्या सुरावटी,
“केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर” या भावगीताची मधुरता,
आणि “केशवा माधवा”, “जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे”, “देव माझा विठू सावळा” यांसारखी भक्तिगीते…

त्यांच्या प्रत्येक गाण्याने रसिकांच्या मनात एक स्वतंत्र विश्व उभे केले.

विशेष म्हणजे आजही अनेकांना त्यांची काही गाणी ऐकताना ती लता मंगेशकर यांनी गायली असावीत असा भास होतो. पण त्या सुरांमागे असायचा सुमनताईंचा तो विलक्षण गोड आणि पारदर्शक आवाज.

आज तो आवाज कायमचा शांत झाला आहे. पण सुमन कल्याणपूर या व्यक्ती गेल्या असल्या, तरी त्यांचे सूर कधीच जाणार नाहीत. रेडिओवर, मोबाईलवर, एखाद्या जुन्या कॅसेटमध्ये किंवा आठवणींच्या कोपऱ्यातून त्यांचा स्वर पुन्हा पुन्हा भेटत राहील.

कारण काही माणसे जग सोडून जातात, पण त्यांचे स्वर अमर होतात…

सुमनताई, तुमच्या स्वरांना भावपूर्ण श्रद्धांजली!

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
310,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा