राजस्थानच्या जयपूरमध्ये सरकारी शाळेच्या पाहणीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या कार्यकर्त्यांना स्थानिक नागरिकांनी विरोध करत घटनास्थळावरून हुसकावून लावल्याची घटना घडली. बगरू परिसरातील रामपुरा-कंवरपुरा गावातील सरकारी प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते पोहोचले होते. मात्र, त्यांच्या उपस्थितीला स्थानिकांनी विरोध केला आणि शाळेबाहेर आंदोलन केले.
राजस्थानातील सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांची स्थिती आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीकडून ‘स्कूल ठीक करो’ अभियान राबवले जात आहे. याच अभियानाचा भाग म्हणून कॉकरोच जनता पार्टीची टीम रामपुरा-कंवरपुरा येथील सरकारी प्राथमिक शाळेत पाहणीसाठी पोहोचली होती. कॉकरोच जनता पार्टीचे सहसंयोजक आशुतोष रांका हेही या शाळेला भेट देणार होते. मात्र, टीम गावात पोहोचताच काही स्थानिक नागरिकांनी त्यांच्या उपस्थितीला विरोध केला. त्यानंतर वाद वाढला आणि कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना शाळेच्या परिसरातून बाहेर जाण्यास भाग पाडण्यात आले. घटनास्थळी स्थानिकांनी आंदोलनही केले. तसेच धक्काबुक्की करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.
या घटनेनंतर आशुतोष रांका यांनी भाजपवर गंभीर आरोप केला. विरोध करणारे लोक स्थानिक गावकरी नसून भाजपने पाठवलेले ‘गुंड’ असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या पक्षाच्या सरकारी शाळांच्या पाहणीच्या अभियानात अडथळा आणण्यासाठी हा विरोध घडवून आणल्याचे रांका यांनी म्हटले. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आशुतोष रांका आणि इतर काही कार्यकर्त्यांना मारहाण झाली असून त्यांना दुखापत झाली. काही वृत्तांनुसार, कॉकरोच जनता पार्टीच्या वाहनाच्या काचेचे नुकसान झाल्याचाही पक्षाकडून आरोप करण्यात आला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
हे ही वाचा:
मस्क यांनी पुन्हा ठोठावले भारताचे दार; स्टारलिंकच्या ‘जेन-२’ साठी नव्याने अर्ज
अभ्यास न केल्याने शिक्षिकेने थप्पड मारली; ६ वर्षांचा मुलगा तिथेच गतप्राण
इम्रान खान तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात रवाना
मुंबईत पाडकामादरम्यान क्रेन रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळली
स्थानिक नागरिकांनी कॉकरोच जनता पार्टीच्या अचानक केलेल्या शाळा पाहणीला आक्षेप घेतला. शाळेची स्थिती खराब असली तरी स्थानिक पातळीवर त्यावर तोडगा काढण्याऐवजी बाहेरून येऊन या प्रश्नाला राजकीय रंग दिला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या टीमला शाळेत प्रवेश देण्यास त्यांनी विरोध केला.
