मौनी अमावस्येनिमित्त दुसऱ्या अमृतस्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. दरम्यान, सकाळपासून एकूण ३.६१ कोटी भाविकांनी अमृतस्नान केले आहे. आज (२९ जानेवारी) ८ ते १० कोटी भाविक अमृत स्नान करणार असल्याचा अंदाज प्रशासनाचा आहे. महाकुंभात आतापर्यंत एकूण १९.९४ कोटींनी स्नान केले आहे. याच दरम्यान, मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभ परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच भाविक ज्या ठिकाणी असतील त्यांनी तेथील जवळच्या घाटावर स्नान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केले आहे.
सध्या महाकुंभात सर्व काही ठीक आहे. महाकुंभाच्या घटनेनंतर, संगमच्या सर्व घाटांवर शांततेत स्नान करतानाचा ड्रोन व्हिडिओ समोर आला आहे. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, वृत्तसंस्था पीटीआय आणि डीडी न्यूजने मौनी अमावस्येच्या दिवशीचा संगमात स्नान करणाऱ्या भाविकांचा ड्रोन व्हिडिओ शेअर केला आणि परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. एका महिला भक्ताने सांगितले, “आज मी संगमात १०८ डुबकी मारली आहेत, मला काहीच अडचण नाही.”
हे ही वाचा :
निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप करणाऱ्या कॅनडाला भारताने सुनावले
झारखंडमध्ये सुरक्षा दल, नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एकाचा मृतदेह सापडला
मौनी अमावस्येपूर्वी संगम परिसरात चेंगराचेंगरी; १० भाविकांचा मृत्यू
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाविकांना संगम घाटावर जाण्याचे टाळून जवळच्या घाटांवरच स्नान करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री योगी म्हणाले की, महाकुंभ परिसरात स्नानासाठी अनेक घाट बांधण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी मोठी गर्दी जमवणे टाळा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री योगी यांनी असेही सांगितले की, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि भाजप अध्यक्ष नड्डा देखील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. माझे फोनवरही बोलणे झाले आहे. पंतप्रधान मोदींनी ४ वेळा फोन करून परिस्थिती जाणून घेतली. त्यांच्या सूचनेनुसार आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात आली आहेत.