मणिपूरमध्ये हिंसाचार थांबला असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा दल आणि पोलिसांकडून छापेमारी सुरू आहे. या कारवाई दरम्यान शस्त्रसाठा जप्त करण्यात येत असून काही प्रतिबंधित संघटनांच्या सक्रीय सदस्यांना अटक करण्यात येत आहे. अशातच बुधवार, २९ जानेवारी रोजी चुराचंदपूर जिल्ह्यातून शोध मोहिमेदरम्यान रॉकेट्स जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शोध मोहिमेदरम्यान सहा रॉकेट्स जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. मंगळवारी सहा रॉकेटसह एक लाँचर, एक देशी मोर्टार (पॉम्पी), प्रत्येकी ७.६२ मिमी स्निपर राउंड, स्निपर मॅगझिन आणि इतर साहित्य जप्त केले आहे. हेंगलेप पोलीस ठाण्याच्या अखत्यारीतील लॉयलमकोट आणि नालोन परिसरातून कारवाई दरम्यान सुरक्षा दलाने हे साहित्य जप्त केले.
दरम्यान, प्रतिबंधित प्रतिबंधित कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीच्या (PWG) दोन कार्यकर्त्यांना मंगळवारी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील मोरोक इंखोल गावातून अटक करण्यात आली. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. इम्फाळच्या वेगवेगळ्या भागात सामान्य जनता, सरकारी अधिकारी आणि दुकानांमधून खंडणी उकळण्यात त्यांचा सहभाग होता. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्या ताब्यातून एक ९ मिमी पिस्तूल, मॅगझिनसह सात ९ मिमी जिवंत राउंड जप्त करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप करणाऱ्या कॅनडाला भारताने सुनावले
झारखंडमध्ये सुरक्षा दल, नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एकाचा मृतदेह सापडला
मौनी अमावस्येपूर्वी संगम परिसरात चेंगराचेंगरी; १० भाविकांचा मृत्यू
यापूर्वी मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. टोप खोंगनांगखोंग येथून बंदी घातलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) एका सक्रिय सदस्याला अटक करण्यात आली. येंगखोम भोगेन सिंग (वय ५० वर्षे) असे त्याचे नाव आहे. तर, बंदी घातलेल्या कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टीच्या (एमएफएल) एका सदस्याला मंत्रीपुखरी बाजार येथून अटक करण्यात आली आहे. पुखरामबम थोइबा सिंग (वय ३८ वर्षे) असे त्याचे नाव आहे.