NEET 2026 पेपर लीक? ‘अपेक्षित प्रश्नसंच’मधील १४० प्रश्न मूळ परीक्षेशी जुळले

राजस्थान SOG च्या तपासात धक्कादायक खुलासा

NEET 2026 पेपर लीक? ‘अपेक्षित प्रश्नसंच’मधील १४० प्रश्न मूळ परीक्षेशी जुळले

देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2026 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसत आहे. राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) च्या तपासात एक हस्तलिखित अपेक्षित प्रश्नसंच समोर आला असून, त्यातील सुमारे १४० प्रश्न ३ मे रोजी झालेल्या प्रत्यक्ष NEET परीक्षेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे आढळले आहे. या प्रश्नांचे एकूण मूल्यांकन सुमारे ६०० गुणांचे असल्याचे सांगितले जात असून, संभाव्य पेपर लीकच्या संशयाला आणखी बळ मिळाले आहे.

माहितीनुसार, हा अपेक्षित प्रश्नसंच राजस्थानातील सीकर येथे १ मेपासून विद्यार्थ्यांमध्ये फिरू लागला होता. तपास यंत्रणा आता हे शोधत आहेत की हा फक्त अत्यंत अचूक सराव संच होता की परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण आहे. National Testing Agency (NTA) ने १० मे रोजी जारी केलेल्या निवेदनात NEET-UG 2026 मधील कथित अनियमिततेबाबत माहिती मिळाल्याची कबुली दिली. एजन्सीने सांगितले की, परीक्षेनंतर चार दिवसांनी संभाव्य गोंधळाबाबत माहिती मिळाली होती, जी संबंधित तपास यंत्रणांकडे पाठवण्यात आली आहे. NTA ने आपल्या निवेदनात म्हटले, “तपास यंत्रणा जे निष्कर्ष काढतील आणि ज्या प्रकरणांत पुढील कारवाईची आवश्यकता असेल, ती निश्चित प्रक्रियेनुसार पारदर्शकपणे सार्वजनिक केली जाईल.”

राजस्थान SOG च्या तपासात असा दावा करण्यात आला आहे की अनेक प्रश्नांच्या उत्तर पर्यायांचा क्रमसुद्धा अपेक्षित प्रश्नसंचशी हुबेहुब जुळतो. माहितीनुसार, ही सामग्री सुरुवातीला सीकरमध्ये विद्यार्थ्यांना २० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत विकली जात होती. परीक्षेच्या आदल्या रात्री याच्या प्रती सुमारे ३० हजार रुपयांत मोठ्या प्रमाणावर फिरत होत्या. तपासात असेही समोर आले आहे की या दस्तावेजाचा संबंध चुरू येथील एका MBBS विद्यार्थ्याशी असू शकतो, जो सध्या केरळमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोप आहे की, त्याने १ मे रोजी ही सामग्री सीकरमधील आपल्या एका मित्राला पाठवली आणि त्यानंतर ती कोचिंग नेटवर्क, PG हॉस्टेल्स, करिअर काउंसिलर्स आणि NEET उमेदवारांमध्ये वेगाने पसरली.

SOG च्या माहितीनुसार, या हस्तलिखित दस्तावेजात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे ३०० हून अधिक प्रश्न होते आणि संपूर्ण दस्तावेजात एकाच प्रकारचे हस्ताक्षर दिसून येत आहे. यापैकी सुमारे १४० प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी पूर्णपणे जुळत असल्याचे सांगितले जात आहे. NEET मध्ये प्रत्येक प्रश्नाला ४ गुण असल्यामुळे, आरोप खरे ठरल्यास रँकिंग आणि वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे तपास यंत्रणांचे मत आहे.

हे ही वाचा:

मालदा हिंसाचार प्रकरणी तृणमूलच्या दोन नेत्यांना अटक

तृणमूलचा प्रवक्ताच म्हणतोय, कार्यकर्त्यांनी हिंदू महिलांवर अत्याचार केले!

शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या करणारे तीन शूटर्स अटकेत

आयफोन 18 प्रो मॅक्स येतोय! काय असतील वैशिष्ट्ये?

तपास यंत्रणांना असेही आढळले आहे की ही सामग्री एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात आली. अनेक मोबाईल चॅट्समध्ये ‘forwarded many times’ असा टॅग आढळला असून, परीक्षेपूर्वीच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत हा मजकूर पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. अधिकाऱ्यांना ऑफलाइन छापील प्रतीही वितरित करण्यात आल्याचा संशय आहे.

सीकरमधील एका PG संचालकाची भूमिकाही तपासाच्या कक्षेत आली आहे. तपास अधिकाऱ्यांचा दावा आहे की, त्याने सुरुवातीला ही सामग्री मिळवून पुढे शेअर केली, मात्र परीक्षेनंतर स्वतःवर संशय येऊ नये म्हणून पोलिस आणि NTA कडे तक्रार दाखल केली. हे प्रकरण समोर आल्यानंतर २०२४ मधील NEET-UG 2024 वादाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. त्यावेळी पेपर लीक, वाढीव गुण आणि अनियमिततेच्या आरोपांमुळे देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते.

Exit mobile version