NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील तज्ज्ञ अटकेत

CBI चा तपास अधिक तीव्र

NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील तज्ज्ञ अटकेत

देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षांपैकी एक असलेल्या NEET-UG 2026 परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात मोठी कारवाई करत पुण्यातील राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) नियुक्त केलेल्या एका तज्ज्ञ महिलेला अटक केली आहे. भौतिकशास्त्राचा प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच बाहेर गेल्याचा आरोप तिच्यावर असून, या प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, आरोपीला प्रश्नपत्रिकांपर्यंत थेट प्रवेश होता. त्या अधिकाराचा गैरवापर करून काही निवडक विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न आणि उत्तरं पोहोचवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या बदल्यात मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण झाल्याचाही तपास सुरू आहे. CBI च्या प्राथमिक तपासात हे संपूर्ण रॅकेट अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालवलं जात असल्याचे समोर आले आहे. यात काही शिक्षक, एजंट, कोचिंग क्लासेसशी संबंधित व्यक्ती आणि मध्यस्थांचा सहभाग असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
आता न्यायालय नाही, बांगलादेशींना बीएसएफकडे सोपवणार!

भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठी घट

‘प्रत्येक घुसखोराला एक-एक करून बाहेर काढले जाईल’

कोलकात्यात छापेमारी; माजी पोलिस उपायु्क्त बिस्वास, गुन्हेगार सोना पप्पू लक्ष्य

या प्रकरणात यापूर्वीही अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती. काही आरोपींनी विद्यार्थ्यांना गुप्तपणे संभाव्य प्रश्न शिकवले होते. विशेष म्हणजे, त्यांनी दिलेले अनेक प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पेपरफुटीचं जाळं केवळ एका शहरापुरतं मर्यादित नसून अनेक राज्यांमध्ये पसरल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

दरम्यान, CBI ने देशातील विविध ठिकाणी छापेमारी करत मोबाईल फोन, लॅपटॉप, पेनड्राइव्ह आणि महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत. या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून, तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील अटकांची संख्या सातत्याने वाढत असून, आणखी काही मोठी नावं तपासाच्या रडारवर असल्याचं सांगितलं जात आहे.

या संपूर्ण घडामोडींमुळे NEET परीक्षेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन परीक्षा देतात, मात्र अशा प्रकारच्या गैरप्रकारांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विरोधकांनीही केंद्र सरकार आणि NTA वर जोरदार टीका करत परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याची मागणी केली आहे.

पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील स्पर्धा परीक्षांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचं मोठं आव्हान आता यंत्रणांसमोर उभं राहिलं आहे.

Exit mobile version