मुंबईहून पुण्याकडे निघालेली गाडी जेव्हा घाटात शिरते, तेव्हा प्रवास केवळ अंतर कापण्यापुरता राहत नाही- तो एक अनुभव बनतो. दुतर्फा पसरलेले सह्याद्रीचे डोंगर, वळणावळणाचा रस्ता, कधी चढ तर कधी उतार, ढगांची सावली आणि हिरव्यागार दऱ्या… सगळं काही निसर्गरम्य. पण याच सुंदर प्रवासाला अचानक एक ब्रेक लागतो. समोर अचानक थांबलेली वाहतूक, मागे पाहिलं तर शेकडो नाही तर हजारो वाहनांची अखंड रांग. हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, गाड्यांमध्ये अडकलेली लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, वेळेच्या गणितात अडकलेले प्रवासी आणि वाढत चाललेली अस्वस्थता. असा अनुभव मुंबई- पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी अनेकदा घेतला आहे. शनिवार- रविवारी तर हमखास हे चित्र दिसून येते. कधी रस्त्याचे काम तर कधी अपघात, बंद पडलेली गाडी आणि सुट्ट्यांच्या दिवशी वाढलेली प्रवासी संख्या या अशा कैक कारणांनी या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते.
अगदी काही दिवसांपूर्वीच हाच भयावह अनुभव मुंबई– पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांनी घेतला. याचं कारण होतं ते म्हणजे खंडाळा घाट परिसरात अत्यंत ज्वलनशील असा प्रोपीलीन वायू वाहून नेणारा टँकर भीषण अपघातात उलटला. अपघातानंतर टँकरमधून वायूची गळती सुरू झाली आणि संपूर्ण परिसरात मोठ्या संकटाची चाहूल लागली. क्षणभराची चूक म्हणजे संभाव्य स्फोट, आग आणि जीवितहानीचा धोका- हे लक्षात घेत प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता तातडीने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाचे परिणाम काही तासांतच दिसून आले. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि तब्बल ३० तासांहून अधिक काळ मुंबई– पुणे एक्सप्रेस वे ठप्प राहिला. ही कोंडी इतकी गंभीर होती की केवळ राज्यभरातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील या घटनेची दखल घेतली गेली. चर्चा रंगल्या, प्रशासन आणि सरकारवर टीका झाली, प्रश्न उपस्थित झाले आणि अडकलेल्या प्रवाशांसाठी हळहळही व्यक्त झाली.
पण या घटनेनंतर एक महत्त्वाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला- राज्याची स्वप्ननगरी असलेली मुंबई आणि विद्येचे माहेरघर मानले जाणारे पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या या जीवनवाहिनी मार्गाची नेमकी स्थिती काय? इतक्या वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमागचं कारण काय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे- जर हा मार्ग पूर्णपणे बंद पडला, तर पर्याय काय? याच प्रश्नाचं उत्तर शोधताना समोर येतं एक नाव ते म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित प्रकल्प, म्हणजे ‘मिसिंग लिंक’.
हा मिसिंग लिंक नेमका काय आहे? तो मुंबई- पुणे प्रवास कसा बदलणार आहे? भविष्यात अशा वाहतूक कोंडीवर तो कितपत तोडगा ठरू शकतो? आणि या प्रकल्पामागची संकल्पना, आव्हानं आणि वास्तव काय आहे? हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊया.
मुंबई- पुणे महामार्ग हा केवळ रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक हालचालींची एक जीवनरेखा आहे. दररोज हजारो प्रवासी, कार्यालयीन कर्मचारी, मालवाहतूक करणारी अवजड वाहने, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवा याच मार्गावरून धाव घेत असतात. त्यामुळे या महामार्गावर घडणारी कोणतीही घटना थेट लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करते.
अशाच एका गंभीर घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. रायगड जिल्ह्यातील आडोशी बोगद्यात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर अत्यंत ज्वलनशील असा प्रोपीलीन वायू वाहून नेणारा टँकर अचानक उलटला. अपघातानंतर टँकरमधून वायूची गळती सुरू झाली आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसर धोक्याच्या छायेत गेला. प्रोपीलीन हा पेट्रोकेमिकल उद्योगात वापरला जाणारा अतिशय ज्वलनशील वायू असल्याने संभाव्य स्फोट किंवा भीषण आग लागण्याची शक्यता निर्माण झाली. ही बाब लक्षात घेत प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता तातडीने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम असा झाला की मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर तब्बल ३० तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली. २५ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या अपघाताचा सर्वात मोठा फटका बसला तो सामान्य प्रवाशांना. कुटुंबांसह प्रवास करणारे नागरिक, लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्ती तब्बल ३२ तास महामार्गावर अडकून पडले. अन्न, पाणी, शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. काही रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, तर अनेकांना रात्र गाडीतच काढावी लागली.
महामार्ग बंद झाल्यामुळे पर्यायी जुन्या मुंबई–पुणे रस्त्यावर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला. त्या मार्गावरही मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आणि संपूर्ण परिसरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. एसटी महामंडळाच्या अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, तर औद्योगिक मालवाहतुकीवरही त्याचा गंभीर परिणाम झाला. “एक टँकर हटवायला एवढे तास का लागले?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. मात्र, हा काही साधा अपघात नव्हता. प्रोपीलीन वायू हवेत मिसळल्यास तो वेगाने पसरतो आणि वाहनांचे इंजिन, विजेची उपकरणे किंवा अगदी मोबाइल फोनमधून निर्माण होणारी ठिणगीही स्फोटासाठी कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण रस्ता बंद ठेवणे अत्यावश्यक होते. नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवणे आणि आपत्कालीन यंत्रणांना गळती नियंत्रणात आणण्यासाठी वेळ देणे गरजेचे होते.
आपत्ती व्यवस्थापन पथके, अग्निशमन दल आणि तांत्रिक तज्ज्ञांनी सलग अनेक तास अथक प्रयत्न करून परिस्थिती नियंत्रणात आणली. टँकर सुरक्षितरीत्या हटवून गॅस गळती थांबवल्यानंतरच महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला तो मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्प, जो भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई आणि पुणे- महाराष्ट्राची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी- यांना जोडणारा रस्ता हा केवळ प्रवासाचा मार्ग नाही, तर राज्याच्या विकासाची धमनिच आहे. सध्या या दोन शहरांदरम्यान प्रवासासाठी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना मुंबई- पुणे महामार्ग हे दोन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. मात्र आजच्या सोयीसुविधांपूर्वी, म्हणजेच २००० सालच्या दशकाच्या सुरुवातीला सहा पदरी द्रुतगती महामार्ग कार्यान्वित होण्यापूर्वी, जुना मुंबई- पुणे महामार्ग हाच दोन्ही महानगरांना जोडणारा एकमेव थेट रस्ता होता. घाट वळणांनी भरलेला, अरुंद आणि धोकादायक असा हा मार्ग त्या काळी प्रवाशांसाठी मोठे आव्हान ठरत असे. साधारण ९४ किलोमीटर लांबीच्या मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाने प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर केला असला, तरी काळानुसार वाढलेली वाहनसंख्या, जड वाहनांची सततची ये- जा आणि पर्यटनामुळे लोणावळा– खंडाळा घाट विभागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. विशेषतः पावसाळ्यात किंवा सुट्टीच्या दिवसांत हा घाट विभाग वाहनचालकांच्या संयमाची परीक्षा पाहतो. अपघातांचे प्रमाण वाढते, प्रवासाचा वेळ वाढतो आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनतो. याच समस्येवर प्रभावी तोडगा म्हणून पुणे आणि मुंबई दरम्यान ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प उभारण्यात येत आहे.
जून २०१७ मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळालेला हा महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प EPC तत्त्वावर राबविला जात आहे. सुमारे ६,६०० कोटी रुपयांच्या भरीव अंदाजित खर्चाचा हा प्रकल्प राज्याच्या दळणवळण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा ठरणार आहे.
प्रकल्पाची सुरुवातीची आखणी मार्च २०२४ पर्यंत काम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याची होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीदरम्यान अनेक अनपेक्षित आणि आव्हानात्मक अडथळे समोर आले. सातत्याने झालेला मुसळधार पाऊस, समुद्रकिनारी भागातील जोरदार वारे, तसेच अत्यंत गुंतागुंतीचे भूगर्भशास्त्र यामुळे कामाचा वेग वेळोवेळी मंदावला. त्यातच जगभरासह देशाला ठप्प करणाऱ्या कोविड-१९ महामारीच्या काळात कामकाजावर मोठा परिणाम झाला.
या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्याने पुढे नेण्यात आले. २०२६ च्या सुरुवातीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाचे ९६ ते ९८ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित अत्यंत महत्त्वाच्या आणि तांत्रिक बाबींवर सध्या अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे. आता येत्या मे २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ प्रवासाचा वेळ कमी होणार नाही, तर मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुकर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हा प्रकल्प म्हणजे द्रुतगती महामार्गावरील गर्दीच्या लोणावळा- खंडाळा घाट विभागाला थेट बायपास करणारा आधुनिक एक्सप्रेसवे कॉरिडॉर आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ सुमारे २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार असून, प्रवाशांना अधिक सुरळीत, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. १३.३ किलोमीटर लांबीचा हा मिसिंग लिंक प्रकल्प भारतातील दोन सर्वात मोठ्या शहरी केंद्रांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या कॉरिडॉरचा भाग आहे.
उंचावलेला कॉरिडॉर आणि अत्याधुनिक बोगद्यांच्या साहाय्याने हा मार्ग उभारला जात असून, यामुळे घाट विभागातील तीव्र वळणांचा आणि चढ- उतारांचा ताण पूर्णपणे टाळता येणार आहे. सध्याचा खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यानचा १९.८ किलोमीटरचा वळणावळणाचा घाट मार्ग थेट १३.३ किलोमीटरच्या सरळ आणि वेगवान मार्गाने बदलण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्र सरकारचा हा मोठा आणि महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प असून, यासाठी अंदाजे ६६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. सध्याच्या घाट विभागात असलेली तीव्र वळणे, वेगवेगळ्या लेनमधून येणारी वाहतूक एकत्र येण्याचे ठिकाण आणि मर्यादित दृश्यमानता यांमुळे वारंवार वाहतूक कोंडी आणि अपघात घडतात. मिसिंग लिंक प्रकल्पाचा मुख्य उद्देश हाच धोका कमी करणे, वाहतुकीचा ताण विभागणे आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे हा आहे.
एकदा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, मुंबई- पुणे प्रवास केवळ जलदच नाही तर अधिक सुरक्षित आणि सुकर होईल. अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होईल, प्रवासाचा वेळ ३० मिनिटांपेक्षा अधिक घटेल आणि द्रुतगती महामार्गावरील घाट विभाग कायमस्वरूपी ताणमुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विकासाच्या वेगाला नवी दिशा देणारा हा मिसिंग लिंक प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये एक मैलाचा दगड ठरणार आहे.
मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प हा केवळ रस्ते बांधकामाचा उपक्रम नसून, आधुनिक अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना ठरणार आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे १३.३ किलोमीटर असून यात दोन अत्याधुनिक जुळे बोगदे (Twin Tunnels) आणि एक भव्य केबल-स्टेड व्हॅली ब्रिज समाविष्ट आहे. या प्रकल्पामुळे सह्याद्री पर्वतरांगांमधील कठीण आणि धोकादायक घाटमार्ग कायमचा इतिहासजमा होणार आहे.
या प्रकल्पातील बोगदे सहा पदरी आणि अतिविशाल रुंदीचे असणार असून, त्यामध्ये आपत्कालीन मार्ग, अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था, उच्च-तंत्रज्ञान व्हेंटिलेशन सिस्टीम आणि सीसीटीव्ही आधारित निगराणी व्यवस्था उपलब्ध असेल. अभियांत्रिकी दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक मानला जातो. दोन मोठे जुळे बोगदे डोंगरांच्या पोटातून खोदण्यात आले असून, यामुळे एक्सप्रेसवेवर कुठेही तीव्र चढ-उतार किंवा धोकादायक वळणे राहणार नाहीत. परिणामी वाहनचालकांचा प्रवास अधिक सहज, सुरक्षित आणि आरामदायी ठरणार आहे.
पहिला बोगदा खोपोली एक्झिटजवळ असून त्याची लांबी सुमारे १.६ ते १.७५ किलोमीटर आहे. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा बोगदा सुमारे ८.९ किलोमीटर लांबीचा असून तो जगातील सर्वात लांब आणि रुंद महामार्ग बोगद्यांपैकी एक ठरणार आहे. या बोगद्यात प्रत्येक दिशेने ४ ते ५ लेन, म्हणजेच एकूण ८ ते १० लेन असतील. सुमारे २३ मीटर रुंदी असलेले हे बोगदे आशियातील सर्वात रुंद बोगद्यांमध्ये गणले जाणार आहेत.
या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लोणावळा–खंडाळा परिसरातील टायगर व्हॅलीवर उभारण्यात येणारा ६५० मीटर लांबीचा केबल-स्टेड व्हॅली ब्रिज. हा पूल भारतातील सर्वात उंच पुलांपैकी एक असून, त्यावर १८२ मीटर उंचीचे चार हिऱ्याच्या आकाराचे खांब उभारले जात आहेत. हे खांब वांद्रे–वरळी सी लिंकलाही उंचीच्या बाबतीत मागे टाकणारे आहेत. पुलाचा डेक दरीच्या तळापासून सुमारे १८० मीटर उंचीवर असून, हा पूल अभियांत्रिकी कौशल्याचा अभिमानास्पद नमुना ठरणार आहे.
मुख्य पुलाव्यतिरिक्त, या प्रकल्पात खोल दऱ्यांवरून जाण्यासाठी सुमारे ९०० मीटर लांबीचा अतिरिक्त व्हायाडक्ट, तसेच अनेक छोटे पूल उभारण्यात येत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने दर ३०० मीटर अंतरावर आपत्कालीन क्रॉस-पॅसेज, अत्याधुनिक अग्निशमन प्रणाली, स्वयंचलित धूरनियंत्रण यंत्रणा आणि मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी थेट संपर्क व्यवस्था असणार आहे. एकूणच, मिसिंग लिंक प्रकल्प हा महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेत नवे पर्व सुरू करणारा, वेग, सुरक्षितता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेचा संगम ठरणार आहे.
या महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पामुळे सह्याद्रीतील घाट विभागातील अपघातप्रवण, अरुंद आणि धोकादायक वळणांना पूर्णपणे बायपास देण्यात येणार आहे. आजवर खंडाळा–लोणावळा घाटात तीव्र वळणे, अचानक उतार-चढ, निसरडे रस्ते आणि पावसाळ्यात कोसळणाऱ्या दरडी यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मुसळधार पावसात दृश्यता कमी होणे, अवजड वाहनांमुळे वाहतूक ठप्प होणे आणि तासन्तास लागणारी कोंडी ही नेहमीचीच समस्या बनली होती. मात्र मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे संकट मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि विश्वासार्ह ठरणार आहे.
हे ही वाचा:
तारिक रहमान यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान मोदींना मिळणार आमंत्रण?
अभिनेता धनुषकडून ‘या’ कारणासाठी २० कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी
मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू
ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश; दिल्लीतील शाळांना बॉम्बच्या धमक्यांबाबतचेही मिळाले पुरावे
या प्रकल्पाचा सर्वात ठळक फायदा म्हणजे प्रवासाच्या वेळेत होणारी लक्षणीय घट. सध्या मुंबई ते पुणे प्रवासासाठी साधारण साडेतीन ते चार तासांचा कालावधी लागतो. सणासुदीच्या काळात, पावसाळ्यात किंवा अपघातांच्या वेळी हा वेळ आणखी वाढतो. मिसिंग लिंक कार्यान्वित झाल्यानंतर हा प्रवास ३० ते ४५ मिनिटांनी कमी होणार असून, प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाचणार आहे. व्यावसायिक वाहतूक, दैनंदिन प्रवासी, तसेच आपत्कालीन सेवांसाठी ही वेळेची बचत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
या प्रकल्पात विकासाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात आले आहेत. अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून निसर्गावर होणारा परिणाम कमीत कमी ठेवण्यात आला आहे. सलग आणि वेगवान वाहतुकीमुळे वाहनांची अनावश्यक थांबणे टळणार असून, त्यामुळे इंधनाचा अपव्यय कमी होईल. परिणामी इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून, कार्बन उत्सर्जनात घट येण्यास मदत होईल. एकूणच, मिसिंग लिंक प्रकल्प हा केवळ अंतर कमी करणारा मार्ग नसून, सुरक्षितता, वेळेची बचत आणि पर्यावरणपूरक विकास यांचा समतोल साधणारा भविष्यातील दळणवळणाचा मैलाचा दगड ठरणार आहे.
एकूण पाहता, मुंबई–पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा केवळ द्रुतगती महामार्गावरील एक जोडमार्ग नसून, महाराष्ट्राच्या बदलत्या गरजा आणि वाढत्या वाहतुकीचा विचार करून उभारलेला दूरदृष्टीपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. अलीकडे घडलेल्या टँकर अपघातासारख्या घटनांनी हे स्पष्ट केले आहे की, एकाच मार्गावर अवलंबून राहणे किती धोकादायक ठरू शकते. अशा आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम मार्ग उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. मिसिंग लिंक पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ कमी होईलच, पण अपघातांचे प्रमाण घटेल, आपत्कालीन सेवांना वेग मिळेल आणि आर्थिक हालचाली अधिक सुरळीत होतील. सह्याद्रीच्या कठीण भूभागावर उभारलेला हा प्रकल्प महाराष्ट्राच्या अभियांत्रिकी क्षमतेचे प्रतीक ठरणार असून, भविष्यातील वाहतूक कोंडी, अपघात आणि संकटांवर प्रभावी तोडगा देणारा ‘गेम चेंजर’ म्हणून ओळखला जाईल.







