उत्तर प्रदेशात १०० हून अधिक कोचिंग सेंटर्स सील; खान सरांचे सेंटरही बंद

लखनौ आगीच्या घटनेनंतर कारवाई

उत्तर प्रदेशात १०० हून अधिक कोचिंग सेंटर्स सील; खान सरांचे सेंटरही बंद

लखनौमधील एका कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने राज्यभरातील कोचिंग संस्थांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये सुरक्षा मानकांची तपासणी सुरू करण्यात आली असून आतापर्यंत १०० हून अधिक कोचिंग सेंटर्स सील करण्यात आली आहेत. अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन, अनधिकृत बांधकामे आणि आवश्यक परवानग्यांचा अभाव या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्यभरात पोलीस, प्रशासन, अग्निशमन विभाग आणि विद्युत सुरक्षा अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकांकडून तपासणी मोहीम राबवली जात आहे. लखनौ, कानपूर, प्रयागराज, मेरठ, आग्रा, गोरखपूर, वाराणसी यांसारख्या प्रमुख शहरांसह इतर जिल्ह्यांमध्येही कोचिंग संस्थांची पाहणी करण्यात येत आहे.

या कारवाईदरम्यान प्रयागराजमधील प्रसिद्ध शिक्षक खान सर यांच्या ‘खान ग्लोबल स्टडीज’ या कोचिंग संस्थेलाही सील करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या तपासणीत अनेक गंभीर सुरक्षा त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. प्रयागराज विकास प्राधिकरण आणि अग्निशमन विभागाच्या संयुक्त तपासणीनंतर संस्थेला कुलूप ठोकण्यात आले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोचिंग सेंटर्स आणि रुग्णालयांसारख्या सार्वजनिक संस्थांनी तळघरांमध्ये (बेसमेंट) कार्य करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कोचिंग संस्थाचालकांची बैठक बोलावून सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. तपासणीदरम्यान अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, इमारतींची रचना, विद्युत सुरक्षा व्यवस्था आणि अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) यांची पडताळणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी अग्निशमन उपकरणे नसल्याचे किंवा ती निकामी अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे.

प्रयागराजचे मुख्य अग्निशमन अधिकारी चंद्रमोहन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ९७ नोंदणीकृत कोचिंग संस्थांपैकी केवळ १५ संस्थांकडेच वैध एनओसी आहे. उर्वरित संस्थांची तपासणी करण्यासाठी अग्निशमन विभागाने १० स्वतंत्र पथके नियुक्त केली आहेत. कानपूरमधील काकादेव परिसरात, जो राज्यातील सर्वात मोठा शैक्षणिक हब मानला जातो, तेथे ३० हून अधिक कोचिंग सेंटर्स सील करण्यात आली आहेत. तपासणीदरम्यान अनेक संस्थांनी पार्किंगसाठी राखीव असलेल्या तळघरांचे बेकायदेशीरपणे वर्गखोल्यांमध्ये रूपांतर केल्याचे उघड झाले. या ठिकाणी शेकडो विद्यार्थी शिकत असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

हे ही वाचा:

बँक ऑफ इंडियाने नीरव मोदीविरुद्धचा १०० कोटींचा खटला जिंकला

मुंबईचे तलाव भरू लागले!

मान्सूनची दमदार हजेरी; मुंबईत २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद

आरोग्य खर्च वाटपाचा ३०-३०-३०-१० फॉर्म्युला; परवडणाऱ्या आरोग्यसेवेसाठी प्रस्ताव

वाराणसीमध्येही विकास प्राधिकरण आणि अग्निशमन विभागाच्या संयुक्त कारवाईत अनेक कोचिंग सेंटर्स आणि ग्रंथालये सील करण्यात आली. तपासणीदरम्यान मंजूर नकाशांशिवाय सुरू असलेल्या संस्था तसेच अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांवर कारवाई करण्यात आली. जौनपूर, चंदौली आणि मिर्झापूर जिल्ह्यांतही अशीच मोहीम राबवण्यात आली असून अनेक संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे.

लखनौतील आगीच्या घटनेनंतर सुरू झालेली ही मोहीम पुढील काही दिवस अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही संस्थेला सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील हजारो कोचिंग संस्थांमध्ये सध्या प्रशासनाच्या तपासणीची धास्ती निर्माण झाली आहे.

Exit mobile version