प्रोजेक्ट कुडनकुलम: आत्मनिर्भर अणुक्रांती

प्रोजेक्ट कुडनकुलम: आत्मनिर्भर अणुक्रांती

भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजांना सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन उत्तर देण्यासाठी अणुऊर्जा हा एक निर्णायक स्तंभ ठरतोय— आणि कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या युनिट ५ आणि ६ संदर्भातील अलीकडील मंजुरी ही त्याच दिशेने टाकलेली ठोस आणि दूरदृष्टीपूर्ण पावले आहेत, असे म्हणता येईल. अणुऊर्जा नियामक मंडळाने (AERB) “प्रमुख उपकरणांच्या उभारणीस” दाखवलेला हिरवा झेंडा म्हणजे केवळ एका प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्याची सुरुवात नाही, तर भारताच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या स्वप्नाला मिळालेली नवी गती आहे.

रिऍक्टर प्रेशर व्हेसल, स्टीम जनरेटर आणि कूलंट पंप यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या घटकांच्या स्थापनेसाठी मिळालेली ही परवानगी प्रकल्पाला नागरी बांधकामाच्या टप्प्यातून बाहेर काढून प्रत्यक्ष अणुऊर्जा निर्मितीच्या केंद्रबिंदूकडे घेऊन जाते. यामुळे केवळ कुडनकुलमच नाही, तर देशभरातील अणुऊर्जा प्रकल्पांसाठी एक सकारात्मक संकेत निर्माण झाला आहे.

पायाभूत सुविधांच्या दृष्टीने पाहिले तर अणुऊर्जा प्रकल्प हे कोणत्याही देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाचे बळकटीकरण करणारे इंजिन असतात. स्थिर आणि अखंडित वीजपुरवठा हा उद्योग, शेती, आरोग्य आणि डिजिटल क्षेत्रांच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. कुडनकुलमसारख्या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर स्वच्छ ऊर्जा निर्माण होते, जी कोळसा किंवा इतर जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करते. परिणामी, कार्बन उत्सर्जनात घट होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो.

याशिवाय, अशा मोठ्या प्रकल्पांमुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होते, पायाभूत सुविधा सुधारतात आणि संबंधित उद्योगांना चालना मिळते. उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य विकसित होऊन भारत जागतिक अणुऊर्जा क्षेत्रात अधिक सक्षम खेळाडू म्हणून उदयास येतो. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनेही अणुऊर्जा प्रकल्प दीर्घकालीन स्थैर्य देतात, कारण त्यांची उत्पादन क्षमता मोठी आणि सातत्यपूर्ण असते.

कुडनकुलम प्रकल्पातील ही प्रगती म्हणजे भारताने “विकसित भारत” या ध्येयाकडे टाकलेले आणखी एक निर्णायक पाऊल आहे. वाढत्या लोकसंख्येला आणि उद्योगांना पुरेल अशी स्वच्छ, विश्वासार्ह आणि परवडणारी ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकल्पांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच ही मंजुरी केवळ तांत्रिक निर्णय नसून, भारताच्या उज्ज्वल आणि ऊर्जा-समृद्ध भविष्यासाठीचा भक्कम पाया आहे. तर याच निमित्ताने या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेऊया.

आजच्या आधुनिक जगात ऊर्जा ही कोणत्याही राष्ट्राच्या विकासाची सर्वात मोठी गरज बनली आहे. औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सेंटर, इलेक्ट्रिक वाहनं आणि शहरीकरण यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढतेय. हवामान बदलाच्या संकटामुळे कोळसा आणि जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जग पर्यायी ऊर्जास्रोतांचा शोध घेतंय. आणि याच पार्श्वभूमीवर अणुऊर्जा पुन्हा एकदा जगाच्या केंद्रस्थानी आली आहे.

एकेकाळी अणुशक्ती म्हणजे युद्ध, अणुबॉम्ब आणि विध्वंस अशी प्रतिमा होती. मात्र आज अणुऊर्जेकडे “स्वच्छ, स्थिर आणि दीर्घकालीन ऊर्जा” म्हणून पाहिलं जातं. जगातील अनेक विकसित आणि विकसनशील देश अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये मोठी गुंतवणूक करतायत. अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि जपान यांसारखे देश अणुऊर्जेच्या माध्यमातून केवळ ऊर्जा नव्हे तर सामरिक आणि आर्थिक वर्चस्वही निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अशावेळी भारताला मागे राहून कसे चालेल आणि म्हणूनच भारतही या स्पर्धेत वेगाने पुढे जातोय.

अणुऊर्जा म्हणजे काय तर… अणूच्या केंद्रकातून निर्माण होणारी ऊर्जा. प्रामुख्याने युरेनियम किंवा प्लुटोनियमसारख्या इंधनांच्या अणूंचे विभाजन म्हणजे Nuclear Fission करून प्रचंड उष्णता निर्माण केली जाते. या उष्णतेपासून वाफ तयार होते आणि त्या वाफेच्या साहाय्याने टर्बाइन फिरवून वीज निर्माण केली जाते. अणुऊर्जेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प इंधनातून प्रचंड ऊर्जा मिळते. कोळशाच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन अत्यंत कमी असल्याने हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठीही अणुऊर्जा महत्त्वाची मानली जाते.

दुसऱ्या महायुद्धानंतर जगात अणुयुगाची सुरुवात झाली. १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यानंतर जगाला अणुशक्तीची ताकद समजली. त्यानंतर “Atoms for Peace” या संकल्पनेतून अणुऊर्जेचा शांततामय वापर सुरू झाला. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यातील स्पर्धेमुळे अणुशक्ती आणि अणुऊर्जा क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला.

आज अमेरिका हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा उत्पादक देश आहे. अमेरिकेत ९० पेक्षा अधिक अणुभट्ट्या कार्यरत आहेत आणि देशाच्या विजेच्या उत्पादनात अणुऊर्जेचा मोठा वाटा आहे. फ्रान्स हा अणुऊर्जेवर सर्वाधिक अवलंबून असलेला देश मानला जातो. फ्रान्सच्या एकूण विजेपैकी जवळपास ७० टक्के वीज अणुऊर्जेतून निर्माण होते. १९७० च्या दशकातील तेल संकटानंतर फ्रान्सने अणुऊर्जेला प्राधान्य दिलं आणि त्यामुळे देशाला ऊर्जा स्वावलंबन मिळालं. त्यामुळेच फ्रान्स आज कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या विकसित देशांपैकी एक आहे.

रशिया अणुऊर्जेला भू-राजकीय प्रभावाचं साधन म्हणून वापरत आहे. भारत, बांगलादेश, तुर्की आणि इजिप्त यांसारख्या देशांमध्ये रशियाने अणुभट्ट्या उभारल्या आहेत. रशिया केवळ तंत्रज्ञानच नाही तर इंधन पुरवठा आणि आर्थिक मदतही देतो. त्यामुळे अणुऊर्जा ही रशियासाठी परराष्ट्र धोरणाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. चीनने गेल्या दोन दशकांत अणुऊर्जा क्षेत्रात प्रचंड वेगाने प्रगती केली आहे. कोळशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी चीन मोठ्या प्रमाणावर नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारत आहे. स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून चीन भविष्यात अणुऊर्जा क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. जपानमध्ये २०११ मध्ये फुकुशिमा अणुदुर्घटना घडल्यानंतर जगभर अणुऊर्जेबद्दल भीती निर्माण झाली. अनेक देशांनी अणुऊर्जा प्रकल्पांबाबत पुनर्विचार केला. जपानने अनेक अणुभट्ट्या बंद केल्या. मात्र वाढती ऊर्जा गरज आणि इंधन आयातीचा खर्च पाहता जपान पुन्हा अणुऊर्जेकडे वळत आहे. हे झालं जागतिक पटलावरचं चित्र… आता जरा आपण भारतात काय परिस्थिती आहे हे बघुया.

भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम स्वतंत्र भारताच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकसित झाला. डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाची पायाभरणी केली. भारताने तीन टप्प्यांचा अणुऊर्जा कार्यक्रम तयार केला. पहिल्या टप्प्यात नैसर्गिक युरेनियमवर आधारित PHWR प्रकारच्या अणुभट्ट्या विकसित करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात Fast Breeder Reactor तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात भारताच्या मोठ्या थोरियम साठ्यांचा वापर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज भारतामध्ये अनेक महत्त्वाचे अणुऊर्जा प्रकल्प आहेत. तामिळनाडूमधील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा भारतातील सर्वात महत्त्वाच्या अणुऊर्जा प्रकल्पांपैकी एक आहे. रशियाच्या सहकार्याने उभारलेल्या या प्रकल्पात आधुनिक VVER तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तर, महाराष्ट्रातील तारापूर अणुऊर्जा केंद्र हे भारतातील पाहिलं अणुऊर्जा केंद्र आहे. याशिवाय राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकमध्येही महत्त्वाचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

भारतासाठी अणुऊर्जा अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, कारण देश मोठ्या प्रमाणात तेल आणि नैसर्गिक वायू आयात करतो. मध्य पूर्वेतील संघर्ष, होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव किंवा जागतिक युद्धसदृश परिस्थिती यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होतो हे आपण सध्या अनुभवलं. अशा परिस्थितीत अणुऊर्जा देशासाठी स्थिर आणि दीर्घकालीन पर्याय ठरू शकते. अणुऊर्जेचे अनेक फायदे आहेत. ती स्वच्छ ऊर्जा मानली जाते. कार्बन उत्सर्जन अत्यल्प असल्याने हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी ती उपयुक्त ठरते. अणुऊर्जा प्रकल्प २४ तास सातत्याने वीज निर्माण करू शकतात. सौर आणि पवन ऊर्जेप्रमाणे हवामानावर त्यांचे उत्पादन अवलंबून नसते.

जसे एखाद्या प्रकल्पाचे फायदे असतात तसेच त्याचे तोटेही असतात. अणुऊर्जा प्रकल्पांचेही तसेच आहे. चेरनोबिल आणि फुकुशिमासारख्या दुर्घटनांनी अणुऊर्जेच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण केले. रेडिओधर्मी अणुकचऱ्याचे व्यवस्थापन हा मोठा प्रश्न आहे. अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक लागते. तसेच अनेक ठिकाणी पर्यावरणीय परिणाम आणि विस्थापनाच्या मुद्द्यांवरून स्थानिक विरोधही होतो.

भविष्यात अणुऊर्जा क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. Small Modular Reactors हे भविष्यातील महत्त्वाचे तंत्रज्ञान मानले जातेय. तसेच भारतासाठी थोरियम आधारित अणुऊर्जा मोठी संधी ठरू शकते. भविष्यात Nuclear Fusion तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास जगाच्या ऊर्जा क्षेत्रात क्रांती होऊ शकते. एकूणच काय तर, अणुऊर्जा ही भविष्यातील जागतिक ऊर्जा राजकारणाचा केंद्रबिंदू बनतेय. ऊर्जा सुरक्षितता, हवामान बदल, औद्योगिक विकास आणि भू-राजकीय स्पर्धा या सर्व गोष्टींमध्ये अणुऊर्जेची भूमिका वाढताना दिसतेय.

आता वळूया भारतातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाकडे…

अणुऊर्जा नियामक मंडळाने कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या युनिट ५ आणि ६ मध्ये प्रमुख उपकरणांच्या उभारणीला मंजुरी दिली आणि पुन्हा एकदा हा प्रकल्प चर्चेत आला. भारताच्या अणुऊर्जा क्षेत्रात कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि भव्य प्रकल्प मानला जातो. तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात उभारलेला हा प्रकल्प केवळ आकारानेच मोठा नाही, तर तंत्रज्ञान आणि क्षमतेच्या दृष्टीनेही देशासाठी एक मैलाचा दगड आहे. रशियाच्या सहकार्याने विकसित केलेल्या VVER (वॉटर-वॉटर पॉवर रिॲक्टर) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर येथे करण्यात आलाय. या तंत्रज्ञानात पाण्याचाच वापर रिऍक्टर थंड ठेवण्यासाठी आणि वाफ तयार करण्यासाठी केला जातो, ज्यामुळे सुरक्षितता आणि कार्यक्षमता दोन्ही वाढतात.

या प्रकल्पात एकूण सहा अणुभट्ट्या बसवण्याची योजना आहे आणि प्रत्येक युनिटची क्षमता तब्बल १,००० मेगावॅट आहे. म्हणजेच सर्व युनिट्स कार्यान्वित झाल्यावर हा प्रकल्प एकूण ६,००० मेगावॅट वीज निर्माण करू शकतो— जे एका मोठ्या राज्याच्या वीज गरजा पूर्ण करण्याइतके आहे. उदाहरणार्थ, इतकी वीज लाखो घरांना सतत वीजपुरवठा करू शकते, तसेच उद्योग, रुग्णालये आणि रेल्वेसारख्या महत्त्वाच्या सेवांना स्थिर ऊर्जा पुरवू शकते.

या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ₹१.११ ट्रिलियन (अंदाजे $१६.३ अब्ज) इतका आहे, तर युनिट ५ आणि ६ साठीच जवळपास ५०,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एवढा मोठा खर्च असला तरी, दीर्घकालीन दृष्टीने हा प्रकल्प फायदेशीर ठरतो, कारण अणुऊर्जा स्वच्छ, सातत्यपूर्ण आणि मोठ्या प्रमाणात वीज निर्माण करते.

सध्या या प्रकल्पातील युनिट १ आणि २ हे २०१३ आणि २०१५ पासून यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांनी मिळून १२१ अब्ज युनिट्सपेक्षा जास्त वीज निर्माण केली आहे. याचबरोबर, या उत्पादनामुळे सुमारे १०४ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन टळले आहे. म्हणजेच, पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प मोठा हातभार लावतोय.

युनिट ३ आणि ४ सध्या बांधकामाच्या अंतिम टप्प्यात आहेत. नुकतीच ‘स्पिलेज टू ओपन रिॲक्टर’ ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, जी रिऍक्टर सुरू करण्याआधीची एक महत्त्वाची चाचणी असते. या प्रक्रियेत शीतलक प्रणाली स्वच्छ केली जाते, जेणेकरून रिऍक्टर सुरक्षितपणे चालू करता येईल. त्यामुळे युनिट ३ लवकरच कार्यान्वित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान, युनिट ५ आणि ६ आता सर्वात महत्त्वाच्या आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक टप्प्यात प्रवेश करत आहेत. या टप्प्यात रिऍक्टरमधील मुख्य उपकरणांची बसवणी केली जाते, जी संपूर्ण प्रकल्पाच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत निर्णायक असते.

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाबाबतचा हा निर्णय केवळ बांधकाम किंवा वीज निर्मितीपुरता मर्यादित नाही, तर तो भारताच्या ऊर्जा धोरणात मोठा बदल घडवणारा टप्पा आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर तब्बल ६,००० मेगावॅट इतकी स्थिर आणि सातत्यपूर्ण वीज उपलब्ध होणार आहे. वाढत्या उद्योग, शहरे आणि तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेसाठी असा भरोसेमंद वीजपुरवठा अत्यंत आवश्यक आहे.

सौर आणि पवन ऊर्जेसारख्या नवीकरणीय स्रोतांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असला, तरी त्यांची निर्मिती हवामानावर अवलंबून असते. याउलट अणुऊर्जा २४ तास अखंड वीज निर्माण करते. त्यामुळे संपूर्ण वीजप्रणाली अधिक स्थिर राहते आणि वीजपुरवठ्यात खंड पडण्याची शक्यता कमी होते. याचबरोबर, अणुऊर्जा ही कमी-कार्बन पर्याय असल्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीनेही ती महत्त्वाची ठरते. भारताने २०७० पर्यंत ‘नेट-झिरो’ उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले आहे, आणि अशा प्रकल्पांमुळे त्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत.

भारतासमोर एक मोठे आव्हान म्हणजे वाढती वीज मागणी आणि त्यासाठी कोळशावर असलेले अवलंबित्व. कुडनकुलमसारखे प्रकल्प या अवलंबित्वात हळूहळू घट घडवू शकतात. यामुळे केवळ प्रदूषण कमी होणार नाही, तर जागतिक इंधन किमतींच्या चढ-उतारांपासूनही देशाची अर्थव्यवस्था अधिक सुरक्षित राहील.

तंत्रज्ञानाच्या बाबतीतही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत-रशिया सहकार्यामुळे आधुनिक अणुभट्टी तंत्रज्ञान देशात येत आहे. यामुळे देशांतर्गत उत्पादन, अभियांत्रिकी कौशल्य आणि तांत्रिक क्षमता यांना चालना मिळते. भविष्यात भारत स्वतःही अशा प्रकल्पांमध्ये अधिक आत्मनिर्भर होऊ शकतो. राजनैतिक पातळीवरही हा प्रकल्प दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचे प्रतीक आहे. अणुऊर्जेसारख्या संवेदनशील आणि उच्च तांत्रिक क्षेत्रात विश्वासार्ह भागीदारी असणे ही भारतासाठी मोठी बाब आहे. पुढील काही दशकांत भारताची अणुऊर्जा क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे उद्दिष्ट आहे, आणि त्यासाठी अशा सहकार्याची गरज भासणार आहे. याशिवाय, या प्रकल्पामुळे दक्षिण भारतात रोजगाराच्या संधी वाढतील, स्थानिक उद्योगांना चालना मिळेल आणि संपूर्ण प्रदेशाच्या विकासाला गती मिळेल. पायाभूत सुविधा, शिक्षण आणि कौशल्यविकास यामध्येही सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.

हे ही वाचा:

अखेर ममतांनी पराभव स्वीकारलाच!

शुभेंदू अधिकारी बनले भाजपचे पहिले मुख्यमंत्री!

९८ वर्षीय माखनलाल यांच्या पायाला मोदींनी केला स्पर्श, दिले आलिंगन…

ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनी एव्हिएशन अभियंते पाकिस्तानमध्ये उपस्थित!

जागतिक ऊर्जा राजकारणाचा विचार केल्यास सध्या दक्षिण भारतातील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचा विचार नक्कीच करावा लागेल. सध्याचं जागतिक ऊर्जा राजकारण घुटमळतय ते पश्चिम आशियातील होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये. पहिल्या दृष्टीक्षेपात हे दोन विषय वेगळे वाटले तरी, भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा संबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक मार्गांपैकी एक आहे. भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करतो, आणि त्यातील मोठा हिस्सा या मार्गानेच येतो. त्यामुळे या परिसरात निर्माण होणारे कोणतेही संकट—ते राजकीय असो वा लष्करी—भारतासाठी थेट धोक्याचे ठरते. तेलाच्या किमतीत अचानक वाढ, पुरवठ्यात अडथळे आणि आर्थिक अस्थिरता यांचे परिणाम देशाच्या प्रत्येक क्षेत्रावर होतात.

अशा परिस्थितीत, कुडनकुलमसारखे अणुऊर्जा प्रकल्प भारतासाठी केवळ वीज निर्मिती केंद्र नसून एक धोरणात्मक सुरक्षा कवच ठरतात. जागतिक बाजारातील चढ-उतारांचा अशा प्रकल्पांवर परिणाम होत नाही. होर्मुझमधील तणावाने भारताला एक स्पष्ट संदेश दिलाय तो म्हणजे —ऊर्जा स्वावलंबन ही आता पर्याय नसून गरज आहे.

कुडनकुलमसारखे प्रकल्प या दिशेने भारताची वाटचाल अधिक वेगवान करतात. कोळसा आणि आयातीत तेलावरील अवलंबित्व कमी करून, भारत अधिक स्थिर आणि सुरक्षित ऊर्जा संरचना उभी करू शकतो. आर्थिक दृष्टीनेही याचा मोठा फायदा आहे. जर होर्मुझमधील संकटामुळे तेलाच्या किमती वाढल्या, तर अणुऊर्जेवर आधारित वीज निर्मिती भारताला त्या धक्क्यापासून काही प्रमाणात वाचवू शकते. उद्योग, वाहतूक आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी ही एक महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा आहे. एकंदरीत, जागतिक अनिश्चिततेच्या काळात, देशांतर्गत स्थिर आणि स्वच्छ ऊर्जा स्रोत उभारणे हीच भारतासाठी सर्वात मोठी ताकद ठरते. कुडनकुलम हा त्या दिशेने टाकलेला एक ठोस आणि दूरदर्शी पाऊल आहे.

एकेकाळी अणुशक्ती म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहायचा तो विनाश, युद्ध आणि भीतीचा चेहरा. पण काळ बदलला… आणि त्याच अणुशक्तीने आता विकास, ऊर्जा सुरक्षितता आणि आत्मनिर्भरता अशी नवी ओळख निर्माण केलीये. कुडनकुलमसारखे अणुऊर्जा प्रकल्प हे केवळ वीज निर्मितीचे केंद्र नाहीत, तर भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे, वैज्ञानिक प्रगतीचे आणि दूरदृष्टीपूर्ण ऊर्जा धोरणाचे प्रतीक बनतायत. वाढत्या लोकसंख्येला, वेगाने धावणाऱ्या उद्योगांना आणि डिजिटल भारताच्या स्वप्नांना अखंड ऊर्जा पुरवण्याची ताकद या प्रकल्पांमध्ये आहे.

जागतिक स्तरावर युद्ध, तेलसंकट आणि ऊर्जा अस्थिरतेचे ढग दाटत असताना, स्वतःच्या बळावर उभी राहणारी आणि जगाच्या दबावापुढे न झुकणारी ऊर्जा व्यवस्था उभारणे हीच भारताची खरी ताकद ठरणार आहे. आणि म्हणूनच, कुडनकुलम हा केवळ एक प्रकल्प नाही… तर विकसित, सक्षम आणि ऊर्जा-सुरक्षित भारताच्या भविष्याचा भक्कम पाया आहे.

Exit mobile version