पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या झालेल्या पराभवानंतर त्यामागील कारणांची चर्चा होऊ लागली आहे. तृणमूलचे नेते कल्याण बॅनर्जी यांनीही तृणमूलच्या पराभवाची मीमांसा केली आहे. पण यानिमित्ताने उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कल्याण बॅनर्जी यांच्या नथीतून आपले युवा नेते आदित्य ठाकरेंवर तीर मारला आहे. एक्स वरील आपल्या पोस्टमधून राऊत यांनी कल्याण बॅनर्जींचा मुद्दा मांडला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या पराभवास IPAC सारख्या एजन्सी कारणीभूत आहेत असे कल्याण बॅनर्जी यांचे मत आहे, हे राऊत यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये लिहिले आहे. पण आदित्य ठाकरेही अशाच एजन्सीच्या माध्यमातून निवडणूक रणनीती आखत असल्यामुळे संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांनाच कल्याण बॅनर्जींच्या खांद्यावर बंदूक ठेवून वेध घेतला आहे असेच दिसते.
राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांचे नाव परस्पर घोषित केल्यामुळे राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यात शीतयुद्ध झाले. आदित्य ठाकरेंना उबाठाचा उमेदवार उभा करायचा होता तर राऊत यांनी आधीच पवार यांचे नाव घेतल्यावर आदित्य ठाकरे यांचा नाईलाज झाला. उद्धव ठाकरेंनीही उमेदवारी घेतली नाही, अंबादास दानवे त्याठिकाणी उमेदवार झाले. २०२८ला राऊत यांच्या खासदारकीची मुदत संपते आहे, त्यासाठीच त्यांनी पवार यांचे नाव पुढे करत आपला मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते. त्यातून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यात दरी निर्माण झाली.
हे ही वाचा:
हंता व्हायरसच्या भीतीनंतर आता नोरोव्हायरसचा धोका
कान्हा व्याघ्र प्रकल्पात भटक्या कुत्र्यांमुळे ५ वाघ मेले
काश्मीरमध्ये गोल्फ टुरिझमला मोठी चालना
वाद, नोटीस आणि बंदी… तरीही विनेश फोगाट ठाम
आदित्य ठाकरे यांनीही IPAC साधून काही वर्षांपूर्वी पक्षाची रणनीती आखली होती, त्यामुळे राऊत यांचा रोख आदित्य ठाकरेंकडे आहे असाच तर्क लावला जात आहे. कल्याण बॅनर्जी यांनी IPAC कसे तृणमूलच्या नाशास कारणीभूत ठरले यावर टीका केल्यावर राऊत यांनी त्याला दुजोरा दिला आहे.
राऊत आपल्या पोस्टमध्ये लिहितात-
कल्याण बनर्जी हे तृणमूल कॉंग्रेसचे महत्वाचे नेते आणि खासदार आहेत ,प.बंगाल मधील पराभवानंतर त्यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे ते म्हणतात: “IPAC ने तृणमूल काँग्रेसच्या संघटनेवर कब्जा केला आणि तृणमूल ला पूर्णपणे बरबाद केले. IPAC ने संभाव्य उमेदवारांमध्ये भांडण लावले. प्रत्येक विधानसभेत अनेकांना सांगितले होते की ‘तुमचा फीडबॅक सर्वोत्तम आहे, तुम्हालाच तिकिट मिळेल’. ज्यांना तिकिट मिळाले नाही ते नाराज होऊन भाजपाला मदत करू लागले. प्रशांत किशोर हे संधीसाधु आहेत. त्यांनी देशभरातील राजकीय पक्षांना कमकुवत केले आहे.त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे ,, यावर पत्रकार आवेश तिवारी म्हणतात:: आज देशातील जवळपास सर्व प्रादेशिक पक्षांमध्ये एक नवीन ‘पॉवर सेंटर’ तयार झाले आहे — निवडणूक व्यवस्थापन कंपन्या, सर्वे एजन्सी आणि राजकीय सल्लागारांचे नेटवर्क. हळूहळू हे लोक संघटनेपेक्षा मोठे झाले आणि खऱ्या ग्रामीण कार्यकर्ते बाजूला पडत चालले आहेत. कल्याण बनर्जींनी IPAC बद्दल जे सांगितले ते फक्त बंगालची कहाणी नाही. बिहारपासून इतर राज्यांमध्येही अनेक पक्षांच्या आत कार्यकर्त्यांची हीच व्यथा आहे. प्रत्येक मतदारसंघात अनेकांना खोटा विश्वास दिला जातो की ‘तुम्हालाच तिकिट मिळेल’. पण शेवटी दुसऱ्याला तिकिट मिळते, पक्षात अविश्वास वाढतो, कार्यकर्ते तुटतात आणि निवडणूक फक्त ‘डेटा, पॅकेज आणि मॅनेजमेंट’ चा खेळ बनते. सर्वात मोठी समस्या ही आहे की आता राजकारणात कार्यकर्त्यांऐवजी ‘प्रोजेक्ट’ पाहिले जात आहेत. गावोगावी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे, त्यांच्या समस्या ऐकणे, संघटनेला वेळ देणे — हे सगळे कठीण काम आहे. त्यापेक्षा एअरकंडिशन खोलीत बसून सर्वे रिपोर्ट तयार करणे आणि कोट्यवधींचे निवडणूक कंत्राट चालवणे खूप सोपे आहे.(अजीत पवार यांच्या पक्षात यावरून वाद निर्माण झाला) राजकीय पक्षांनी समजून घ्यायला हवे की कोणतीही अॅप, सर्वे किंवा एजन्सी जनता आणि कार्यकर्त्यांमधील खऱ्या विश्वासाची जागा घेऊ शकत नाही. निवडणुका फक्त डेटावर नव्हे, तर विश्वास, संवाद आणि संघटनेच्या आत्म्यावर जिंकल्या जातात.
यावर असंख्य प्रतिक्रिया आल्या असून राऊत यांनी हा सल्ला आपल्या पक्षाला दिला असता तर आज पक्षाची ही स्थिती झाली नसती असे मत लोकांनी व्यक्त केले आहे.







