पश्चिम बंगालमध्ये शनिवार, ९ मे रोजी या दिवसाची नोंद सुवर्णाक्षरांनी झाली. राज्यात पाहिल्यांदाच भाजपएन सत्ता स्थापन केली. एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे ‘उजवे हात’ मानले जाणारे शुभेंदू अधिकारी यांनी शनिवारी पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कोलकात्यातील ऐतिहासिक ब्रिगेड परेड ग्राउंडवर हा भव्य सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्र सरकारमधील अनेक मंत्री उपस्थित होते.
भाजपने शपथविधीसाठी ९ मे ही तारीख निवडली, जी नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त ‘रवींद्र जयंती’ म्हणून साजरी केली जाते. तृणमूल काँग्रेसकडून भाजपवर ‘बाहेरील’ आणि ‘उत्तर भारतीय पक्ष’ असल्याचा आरोप केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर बंगालच्या संस्कृतीचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. सुवेंदू अधिकारी यांनी संपूर्ण शपथ बंगाली भाषेत घेत स्थानिक अस्मितेला अधिक बळ दिले. शपथविधीदरम्यान सुवेंदू अधिकारी साध्या भगव्या कुर्त्यात दिसले. त्यांची ही साधी प्रतिमा ममता बॅनर्जी यांच्या पांढऱ्या साडी आणि साध्या चप्पलांच्या शैलीला उत्तर देणारी भाजपची नवी ‘माटी-मानुष’ प्रतिमा म्हणून पाहिली जात आहे.
सुवेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळात उत्तर बंगाल आणि आदिवासी भागांना विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. पश्चिम बंगाल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, आक्रमक नेत्या अग्निमित्रा पॉल, उत्तर बंगालचे प्रमुख नेते आणि माजी केंद्रीय मंत्री निसिथ प्रमाणिक, राणीबांधचे आमदार व आदिवासी समाजाचे प्रतिनिधी क्षुदिराम टुडू तसेच भाजप संघटनेतील महत्त्वाचे नेते अशोक कीर्तनिया आणि शंकर घोष यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
हे ही वाचा:
९८ वर्षीय माखनलाल यांच्या पायाला मोदींनी केला स्पर्श, दिले आलिंगन…
ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनी एव्हिएशन अभियंते पाकिस्तानमध्ये उपस्थित!
वसई-विरार महापालिकेच्या ‘लाभकरा’वरून भाजप आक्रमक
अमेरिकेकडून ‘UFO FILES’ प्रसिद्ध! काय आहे अहवालात?
बंगालच्या संस्कृतीला मान देण्यासाठी कार्यक्रमस्थळी ‘मिष्टी दोई’ आणि प्रसिद्ध बंगाली स्नॅक ‘झालमुडी’चे २० स्टॉल उभारण्यात आले होते. एप्रिल महिन्यात झारग्राममधील सभेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अचानक थांबून झालमुडीचा आस्वाद घेतला होता, ज्याची मोठी चर्चा झाली होती.
जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत भाजपचा हा विजय पक्षासाठी वैचारिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शपथविधी सोहळ्यात भाजपशासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती पाहता केंद्रासाठी बंगालमधील हा विजय किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट झाले.







