ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथांच्या ऐतिहासिक रथयात्रेदरम्यान गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. रथयात्रेसाठी लाखो भाविकांनी गर्दी केल्याने अचानक चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात गुदमरल्याने एका भाविकाचा मृत्यू झाला असून सुमारे १०० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने पुरी जिल्हा रुग्णालयासह अन्य वैद्यकीय केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले असून अनेकांवर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रथ ओढण्याच्या वेळी आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने एकाच दिशेने धाव घेतल्यामुळे अचानक गर्दीचा ताण वाढला. काही भाविकांचा तोल गेल्यानंतर गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर काही जण बेशुद्ध पडले. घटनास्थळी तैनात पोलिस, स्वयंसेवक आणि आपत्कालीन पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात हलवले.
हे ही वाचा:
न्यायाधीश असतानाच एलपीजी एजन्सी चालवली? वितरण अधिकार निलंबित
राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत पश्चिम रेल्वेचा दबदबा
‘नो एंट्री’ पुलावर बर्थडे पार्टी! २६ कोटींच्या पुलावर वाढदिवसाचा धुमाकूळ
अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर चार अल्पवयीन मुले बुडाली; दोघं सुखरूप
या घटनेनंतर प्रशासनाने रथयात्रा मार्गावरील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस आणि सुरक्षा दल तैनात केले. तसेच भाविकांना संयम बाळगण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पुरी रथयात्रेसाठी यंदा लाखो भाविक देशभरातून दाखल झाले होते. एवढ्या मोठ्या गर्दीमुळे सुरक्षा यंत्रणांवर मोठा ताण आला असून या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. नेमकी चेंगराचेंगरी कशी झाली, गर्दी नियंत्रणात कुठे त्रुटी राहिल्या आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करावी, याचा प्रशासनाकडून सविस्तर आढावा घेतला जात आहे.
