भारत आज ७६ वा दिन प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर परेड दरम्यान भारताचे सामर्थ्य जगाने पाहिले. क्षेपणास्त्रे, रणगाडे आणि लढाऊ विमानांचे प्रदर्शन पाहून सार्वजन दंग राहिले. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
परेडमध्ये लष्कराने युद्ध रणगाडे, क्षेपणास्त्र प्रणाली आणि आधुनिक लष्करी वाहने प्रदर्शित केली. लष्कराचे T-९० भीष्म रणगाडे, नाग क्षेपणास्त्र प्रणाली, ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि पिनाका मल्टी रॉकेट लाँचर, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि आधुनिक लष्करी वाहने प्रदर्शित केली.
लष्कराच्या परेड तुकडीमध्ये ब्रिगेड ऑफ द गार्ड्स, जाट रेजिमेंट, गढवाल रायफल्स, महार रेजिमेंट, जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंट आणि सिग्नल कॉर्प्सचा समावेश होता. लेफ्टनंट कमांडर साहिल अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखाली १४४ जवानांचा समावेश असलेल्या भारतीय नौदल तुकडीमध्ये लेफ्टनंट कमांडर इंद्रेश चौधरी, लेफ्टनंट कमांडर काजल अनिल भरणी आणि लेफ्टनंट देवेंद्र प्लाटून कमांडर यांचा समावेश होता. नौदलाकडून आयएनएस सुरत, फ्रिगेट आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीसह अलीकडेच अंतर्भूत केलेल्या स्वदेशी अत्याधुनिक लढाऊ जहाजांचे प्रदर्शन करण्यात आले.
हे ही वाचा :
पॅलेस्टिनींना शांततेत राहण्यासाठी इतरत्र घरे बांधावीत
विवाहित हिंदू महिलेवर बलात्कार करून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पडले
उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता २७ जानेवारीला लागू होणार
ठाकरेंच्या स्वबळावर पवारांची बत्ती !
भारतीय हवाई दलाच्या तुकडीमध्ये चार अधिकारी आणि १४४ सैनिकांचा समावेश होता. हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व स्क्वॉड्रन लीडर महेंद्रसिंग गराटी यांनी केले. यानंतर हवाई दलाच्या लढाऊ विमान मिग-२९ ने फ्लायपास्ट करत ‘बाज फॉर्मेशन’चे प्रात्यक्षिक दाखवले.
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने आपल्या चित्ररथमध्ये देशात विकसित केलेल्या अनेक स्वदेशी लष्करी यंत्रणा आणि तंत्रज्ञान प्रदर्शित केले. डीआरडीओच्या चित्ररथामध्ये विमानविरोधी क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन, पूर्व चेतावणी आणि नियंत्रण प्रणाली, तोफखाना गन सिस्टीम आणि ड्रोन डिटेक्शन, इंटरसेप्शन आणि डिस्ट्रक्शन सिस्टम यांचा समावेश होता.
उपग्रहावर आधारित निगराणी यंत्रणा, मध्यम शक्तीचे रडार अरुद्रा, प्रगत हलके वजनाचे टॉर्पेडो, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली धाराशक्ती, लेझर आधारित शस्त्रे, हवाई संरक्षण यंत्रणा आणि मानवरहित हवाई यंत्रणाही परेडदरम्यान प्रदर्शित करण्यात आली. यावेळी स्वदेशी बनावटीच्या प्रलय क्षेपणास्त्र प्रणालीचे प्रथमच प्रात्यक्षिक करण्यात आले.
या परेडमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) १४८ सदस्यीय सर्व महिला तुकडीचा समावेश होता, ज्याचे नेतृत्व असिस्टंट कमांडंट ऐश्वर्या जॉय एम यांनी केले. आसाम रायफल्सच्या तुकडीचे नेतृत्व २९ आसाम रायफल्सचे कॅप्टन करणवीर सिंग कुंभवत करत होते. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) उंटांच्या तुकडीचे नेतृत्व डेप्युटी कमांडंट मनोहर सिंग खिची यांच्याकडे होते.







