31 C
Mumbai
Wednesday, September 9, 2026
घरविशेषहिमालयाच्या पोटातून; ऋषिकेश - कर्णप्रयाग

हिमालयाच्या पोटातून; ऋषिकेश – कर्णप्रयाग

Google News Follow

Related

हिमालय हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं… उंचच उंच पर्वत, खोल दऱ्या, खडकाळ जमीन आणि प्रत्येक वळणावर निसर्गाचं आव्हान. या पर्वतरांगांमध्ये प्रवास करणं म्हणजे एक वेगळा अनुभव. रस्ते असोत किंवा इतर कोणतीही वाहतूक व्यवस्था… इथल्या भौगोलिक परिस्थितीचा प्रत्येक पावलावर विचार करावा लागतो. आणि याच पर्वतीय भागात आता रेल्वे पोहोचवण्याचं मोठं काम सुरू आहे. तब्बल ३७ हजार कोटी रुपयांचा ऋषिकेश–कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प हिमालयाच्या या कठीण भूभागातून आकार घेतोय. या प्रकल्पामुळे उत्तराखंडच्या पर्वतीय भागाला रेल्वे नेटवर्कशी जोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पण ही रेल्वे नेमकी कुठून आणि कशी जाणार? कारण इथे फक्त रेल्वे रुळ टाकायचे नाहीत… तर उंच पर्वतांना छेद देत, खोल दऱ्या ओलांडत आणि आव्हानात्मक भूगर्भरचनेतून संपूर्ण रेल्वे कॉरिडॉर उभा करायचा आहे.

सुमारे १२५ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग उत्तराखंडच्या पर्वतीय भागाला देशाच्या रेल्वे नेटवर्कशी जोडणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ऋषिकेश ते कर्णप्रयागचा प्रवास दोन तासांपेक्षा थोड्या अधिक वेळात करण्याचं उद्दिष्ट आहे. पण या प्रकल्पाची खरी गोष्ट प्रवासाचा वेळ कमी करण्यापेक्षा खूप मोठी आहे. कारण हा रेल्वे मार्ग अशा भूभागातून तयार केला जातोय, जिथे प्रत्येक किलोमीटरचं बांधकाम हे स्वतःमध्ये एक अभियांत्रिकी आव्हान आहे. तर हा रेल्वे मार्ग नेमका कुठून जाणार? एवढ्या आव्हानात्मक भूभागातून रेल्वेचा मार्ग तयार करणं कसं शक्य होणार आहे? बांधकामासाठी नेमकं कोणतं अभियांत्रिकी वापरलं जातंय? हे सर्व जाणून घेऊया.

ऋषिकेश आणि कर्णप्रयागचे भौगोलिक स्थान आणि रेल्वे प्रकल्पाचं महत्त्व

ऋषिकेश हे उत्तराखंडच्या देहरादून जिल्ह्यात, गंगेच्या खोऱ्यात वसलेलं महत्त्वाचं शहर आहे. हरिद्वार आणि देहरादूनच्या जवळ असल्यामुळे ऋषिकेश हे उत्तराखंडच्या पर्वतीय भागात प्रवेश करण्याचं एक महत्त्वाचं गेटवे मानलं जातं. धार्मिकदृष्ट्याही ऋषिकेशचं महत्त्व मोठं आहे. गंगेच्या काठावर वसलेलं हे शहर योग, अध्यात्म आणि तीर्थक्षेत्र म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागांतून भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने ऋषिकेशमध्ये येतात.

या मार्गाचं दुसरं टोक म्हणजे कर्णप्रयाग. कर्णप्रयाग हे उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील महत्त्वाचं ठिकाण आहे. इथे अलकनंदा आणि पिंडर नद्यांचा संगम होतो. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या कर्णप्रयागाचं महत्त्व मोठं आहेच; शिवाय चमोली आणि त्यापुढील हिमालयीन भागाकडे जाण्यासाठीही हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे. धार्मिकदृष्ट्याही कर्णप्रयागाला विशेष स्थान आहे. कर्णप्रयागच्या पुढे बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिबसारखी महत्त्वाची धार्मिक स्थळं, तसेच हिमालयातील अनेक पर्यटनस्थळं आहेत. त्यामुळे या संपूर्ण पर्वतीय पट्ट्यात भाविक आणि पर्यटकांची मोठी ये-जा असते. अशा परिस्थितीत ऋषिकेश–कर्णप्रयाग रेल्वेचा उद्देश केवळ दोन ठिकाणांना जोडणं नाही… तर पर्वतीय भागातील प्रवास अधिक सोपा, जलद आणि विश्वासार्ह करण्यासाठी एक मजबूत रेल्वे नेटवर्क उभं करणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

आज या भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर रस्ते मार्गावर अवलंबून आहे. डोंगराळ रस्ते, तीव्र वळणं, चढ-उतार आणि काही ठिकाणी दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक घटनांमुळे प्रवास आव्हानात्मक ठरतो. अशा परिस्थितीत रेल्वे हा या प्रदेशासाठी पर्यायी आणि अधिक विश्वासार्ह वाहतूक मार्ग ठरू शकतो.

यासोबतच, हा मार्ग व्यापक चारधाम रेल्वे कनेक्टिव्हिटीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ऋषिकेश–कर्णप्रयाग रेल्वेमुळे देवप्रयाग आणि कर्णप्रयागसारखी महत्त्वाची धार्मिक आणि पर्यटनस्थळं रेल्वे नेटवर्कशी जोडली जाणार आहेत. पुढे या व्यापक कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चारधामांपर्यंत पोहोच अधिक सुलभ करण्याचं उद्दिष्ट आहे.

रेल्वे प्रकल्प नेमका कुठून कुठपर्यंत विस्तारला आहे?

ऋषिकेशपासून सुरू होणारा हा रेल्वे कॉरिडॉर देवप्रयाग, श्रीनगर, रुद्रप्रयाग आणि गौचरमार्गे कर्णप्रयागपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजेच, गंगेच्या खोऱ्यातील ऋषिकेशपासून सुरू होणारा हा मार्ग पुढे हिमालयाच्या पर्वतीय पट्ट्यात प्रवेश करत कर्णप्रयागपर्यंत जाणार आहे. मैदानी भागातून पर्वतीय भूभागाकडे जाणारी ही रेल्वे जोडणी उत्तराखंडच्या वाहतूक व्यवस्थेला एक नवी दिशा देणार आहे.

या १२५ किलोमीटरच्या संपूर्ण मार्गावर एकूण १२ स्थानकांची योजना आहे. हा रेल्वेमार्ग देहराडून, टिहरी गढवाल, पौरी गढवाल, रुद्रप्रयाग आणि चमोली या पाच जिल्ह्यांमधून जाणार आहे. या मार्गामुळे देवप्रयाग आणि कर्णप्रयागसारखी महत्त्वाची धार्मिक आणि पर्यटनस्थळं रेल्वे नेटवर्कशी जोडली जातील. त्याचबरोबर ऋषिकेशमार्गे या संपूर्ण पर्वतीय प्रदेशाची देशातील प्रमुख शहरांशी कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.

आज ऋषिकेश ते कर्णप्रयाग हा प्रवास प्रामुख्याने रस्ते मार्गावर अवलंबून आहे. सध्या रस्त्याने हा प्रवास साधारण ७ तासांचा आहे. मात्र, रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास २ तासांपेक्षा थोड्या अधिक वेळात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजेच, या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होण्यासोबतच पर्वतीय भागातील वाहतुकीची क्षमता आणि कनेक्टिव्हिटीही मजबूत होणार आहे.

१२५ किलोमीटरचा रेल्वे कॉरिडॉर प्रत्यक्षात उभा कसा राहणार?

हा मार्ग पारंपरिक सपाट भूभागावरून जाणारा नाही. समोर आहे आव्हानात्मक हिमालयीन भूभाग—उंच पर्वत, खोल दऱ्या, नद्या आणि गुंतागुंतीची भूगर्भरचना. अशा भूभागातून रेल्वेचा मार्ग सुरक्षितपणे नेण्यासाठी केवळ पारंपरिक रेल्वे बांधकाम पुरेसं नाही. त्यासाठी बोगदे, पूल, व्हायाडक्ट्स आणि अत्याधुनिक भू-अभियांत्रिकी तंत्रांचा व्यापक वापर करावा लागतो. म्हणूनच ऋषिकेश–कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प हा केवळ वाहतूक प्रकल्प नाही… तर अत्यंत आव्हानात्मक हिमालयीन भूभागावर आधुनिक अभियांत्रिकीची क्षमता सिद्ध करणारा एक मोठा प्रकल्प आहे.

ऋषिकेश–कर्णप्रयाग रेल्वे मार्गाची लांबी सुमारे १२५ किलोमीटर आहे. पण या मार्गाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे—या प्रकल्पातील मुख्य रेल्वे बोगद्यांची एकत्रित लांबी सुमारे १०५ किलोमीटर आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर प्रत्येक १० किलोमीटरच्या रेल्वेमार्गापैकी जवळपास ८.५ किलोमीटर मार्ग डोंगराच्या आतून जाणार आहे. ही आकडेवारी केवळ मोठी नाही… तर हिमालयाच्या भूगोलावर मात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अभियांत्रिकीची व्याप्ती दाखवणारी आहे. कारण हिमालयात रेल्वेचा मार्ग जमिनीवरून नेणं म्हणजे मोठे उतार, तीव्र वळणं आणि अस्थिर भूभागाशी सतत सामना. रेल्वेच्या सुरक्षित आणि कार्यक्षम संचालनासाठी मार्गाचा उतार आणि वळणं नियंत्रित मर्यादेत ठेवावी लागतात. त्यामुळे अनेक ठिकाणी डोंगराला बाहेरून वळसा घालण्याऐवजी पर्वताच्या आतून मार्ग तयार करणं अधिक व्यवहार्य ठरतं. बोगद्यांमुळे रेल्वेला तुलनेने नियंत्रित उतार आणि वळणांसह पुढे नेता येतं आणि हिमालयाच्या कठीण भूभागातून थेट मार्ग काढता येतो. आणि यासाठी उभं राहतय एक विशाल टनेल नेटवर्क.

या प्रकल्पात सुमारे १६ मुख्य बोगद्यांचं बांधकाम करण्यात येत आहे. यातील सर्वात लहान बोगदा सुमारे २०० मीटरचा आहे, तर सर्वात लांब बोगदा तब्बल १४.८ किलोमीटर लांबीचा आहे. देवप्रयाग आणि जनासू दरम्यान बांधला जाणारा हा बोगदा या संपूर्ण प्रकल्पातील सर्वात महत्त्वाच्या अभियांत्रिकी घटकांपैकी एक आहे.

पण एवढ्यावर हे टनेलिंग थांबत नाही. रेल्वे बोगदा तयार करणं जितकं महत्त्वाचं, तितकंच महत्त्वाचं आहे—आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची व्यवस्था. यासाठी मुख्य रेल्वे बोगद्यांसोबत समांतर एस्केप आणि अॅक्सेस टनेल्सचं स्वतंत्र नेटवर्क उभारलं जात आहे. या अतिरिक्त बोगद्यांची एकत्रित लांबी सुमारे ९८ किलोमीटर आहे.

समजा, मुख्य बोगद्यात आग लागली, तांत्रिक बिघाड झाला किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली… तर या समांतर मार्गांमधून प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढता येईल. त्याचबरोबर बचाव पथकांना, आवश्यक उपकरणांना आणि यंत्रसामग्रीला घटनास्थळी पोहोचण्यासाठीही हे मार्ग महत्त्वाची भूमिका बजावतील. म्हणजेच, इथे फक्त रेल्वे धावण्यासाठी बोगदे खोदले जात नाहीत… तर मुख्य रेल्वे बोगदे, एस्केप-अॅक्सेस बोगदे आणि सुरक्षा व्यवस्थेचं एक संपूर्ण भूमिगत नेटवर्क उभं राहत आहे.

एका बाजूला अवघ्या काहीशे मीटरचे बोगदे… आणि दुसऱ्या बाजूला जवळपास १५ किलोमीटर लांबीचा बोगदा. ही व्याप्तीच या प्रकल्पाच्या अभियांत्रिकीची कल्पना देण्यासाठी पुरेशी आहे. मात्र, हिमालयाच्या आत एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोगदे खोदणं म्हणजे केवळ खोदकामाचं काम नाही. खरं आव्हान सुरू होतं ते डोंगराच्या आत गेल्यानंतर.

बाहेरून एकसारखा दिसणारा डोंगर आतून तसाच असेलच असं नाही. काही ठिकाणी मजबूत खडक असू शकतो, तर काही ठिकाणी कमकुवत भूस्तर. कुठे पाण्याचे प्रवाह आढळू शकतात, तर कुठे भूगर्भरचनेत अचानक बदल होऊ शकतो. म्हणूनच या प्रकल्पात भूगर्भाचा अभ्यास हा बांधकामाइतकाच महत्त्वाचा टप्पा आहे. बोगदा खोदण्यापूर्वी भूगर्भरचनेचा सखोल अभ्यास केला जातो. आणि प्रत्यक्ष खोदकाम सुरू झाल्यानंतरही खडकांची स्थिती, पाण्याचा प्रवाह आणि बोगद्याची स्थिरता सतत तपासली जाते. भूगर्भानुसार खोदकामाची पद्धत बदलली जाते आणि आवश्यकतेनुसार बोगद्याला संरचनात्मक आधार दिला जातो.

म्हणजेच, हिमालयात बोगदा खोदणं म्हणजे डोंगर फक्त फोडणं नाही… तर प्रत्येक मीटरवर बदलणाऱ्या भूगर्भाला समजून घेत, त्यानुसार अभियांत्रिकीचा निर्णय घेणं आहे. आणि याच कारणामुळे ऋषिकेश–कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पातील प्रत्येक बोगदा हा केवळ पायाभूत सुविधांचा भाग नाही… तर हिमालयाच्या आव्हानात्मक भूभागाशी जुळवून घेत उभं राहणारं आधुनिक अभियांत्रिकीचं उदाहरण आहे.

बोगदे प्रत्यक्षात खोदले कसे जातात?

याच ठिकाणी या संपूर्ण प्रकल्पातील सर्वात महत्त्वाच्या तंत्रज्ञानांपैकी एक समोर येतं… Tunnel Boring Machine, म्हणजेच TBM. TBM म्हणजे केवळ डोंगर फोडणारी मोठी मशीन नाही. ही प्रत्यक्षात बोगदा खोदणे, मलबा बाहेर काढणे आणि बोगद्याच्या भिंतींना संरचनात्मक आधार देण्याची एक एकात्मिक टनेलिंग प्रणाली आहे. मशीनच्या पुढच्या भागावरील फिरणारं Cutting Head खडक कापत पुढे सरकतं. खोदकामातून निघणारा मलबा कन्व्हेयरसारख्या यंत्रणेद्वारे मागे आणि त्यानंतर बोगद्याबाहेर नेला जातो. त्याचवेळी TBMच्या मागील भागात बोगद्याच्या भिंतींसाठी Precast Concrete Segments बसवले जातात. म्हणजेच खोदकाम आणि बोगद्याला संरचनात्मक अस्तर देण्याची प्रक्रिया एकाच बांधकाम प्रणालीचा भाग बनते.

आणि ऋषिकेश–कर्णप्रयाग प्रकल्पात या तंत्रज्ञानाला मिळालेलं महत्त्व आणखी मोठं आहे. कारण भारतीय रेल्वेने हिमालयीन भूगर्भात TBMचा वापर प्रथमच या प्रकल्पात केला. सुमारे 14.8 किलोमीटर लांबीच्या T-8 या बोगद्यासाठी TBM तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आणि या बोगद्याचं TBMच्या माध्यमातून यशस्वी ब्रेकथ्रूही पूर्ण झालं.

बोगद्यांमधून पर्वताच्या आतून मार्ग काढल्यानंतर रेल्वे कॉरिडॉरचा पुढचा महत्त्वाचा भाग आहे—खोल दऱ्या, नदीखोरी आणि उंचसखल भूभागाला जोडणारी पूल आणि व्हायाडक्ट्सची संरचना. या प्रकल्पात ३५ हून अधिक पूल उभारले जात आहेत. हिमालयीन भूभागात रेल्वेची सलग आणि सुरक्षित कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यासाठी या संरचना महत्त्वाची भूमिका बजावतात.

डोंगराळ प्रदेशात अनेक ठिकाणी नैसर्गिक भूभागात मोठ्या प्रमाणात उंचीचा फरक आहे. अशा ठिकाणी रेल्वेचा मार्ग जमिनीच्या उतारानुसार नेण्याऐवजी पूल आणि व्हायाडक्ट्सच्या माध्यमातून तो अधिक नियंत्रित उंचीवरून पुढे नेला जातो. त्यामुळे रेल्वेसाठी आवश्यक असलेली अलाइनमेंट आणि उताराची मर्यादा कायम ठेवणं शक्य होतं.

मात्र हिमालयासारख्या संवेदनशील भूभागात पूल उभारणं ही अत्यंत अचूक अभियांत्रिकी प्रक्रिया आहे. पुलाची रचना करताना भूगर्भरचना, फाउंडेशनची क्षमता, डोंगराची स्थिरता, नदीचा प्रवाह, पाण्याची पातळी, भूकंपीय परिस्थिती आणि रेल्वेचा भार या सर्व घटकांचा एकत्रित विचार केला जातो. यामुळे या प्रकल्पातील प्रत्येक पूल हा केवळ दोन टोकांना जोडणारी संरचना राहत नाही, तर पर्वतीय भूभाग आणि आधुनिक रेल्वे तंत्रज्ञान यांच्यातील महत्त्वाचा दुवा बनतो.

एकीकडे बोगदे पर्वताच्या आतून रेल्वेला मार्ग देतात, तर दुसरीकडे पूल आणि व्हायाडक्ट्स खोल दऱ्या, नदीखोरी आणि उंचसखल भूभागावरून हा मार्ग पुढे नेतात. यामधील जमिनीवरील सेक्शन या दोन्ही संरचनांना जोडतात. म्हणूनच १२५ किलोमीटरचा हा कॉरिडॉर म्हणजे एका सलग रेल्वे ट्रॅकची निर्मिती नाही. हा बोगदे, पूल, व्हायाडक्ट्स, फाउंडेशन आणि जमिनीवरील रेल्वे सेक्शन यांना एकात्मिक पद्धतीने जोडणारा आधुनिक पर्वतीय रेल्वे कॉरिडॉर आहे. आणि या संपूर्ण संरचनेचा उद्देश एकच—हिमालयाच्या कठीण भौगोलिक रचनेशी जुळवून घेत, सुरक्षित, स्थिर आणि कार्यक्षम रेल्वे कनेक्टिव्हिटी निर्माण करणं.

प्रकल्पामुळे उत्तराखंडच्या पर्वतीय प्रदेशाच्या पायाभूत सुविधांमध्ये काय बदल होऊ शकतो?

या प्रकल्पाचा परिणाम केवळ प्रवासाचा वेळ कमी होण्यापुरता मर्यादित राहणार नाही. रेल्वे कनेक्टिव्हिटी ही पर्वतीय भागाच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक क्षमता, स्थिरता आणि वर्षभराची जोडणी देणारी पायाभूत सुविधा ठरू शकते. सध्या ऋषिकेशपासून पुढील पर्वतीय भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर रस्ते नेटवर्कवर अवलंबून आहे. रेल्वे सुरू झाल्यानंतर या वाहतूक व्यवस्थेला एक पर्यायी आणि अधिक क्षमतेचा मार्ग मिळेल. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसोबतच प्रदेशातील मालवाहतूक आणि लॉजिस्टिक नेटवर्कलाही त्याचा फायदा होऊ शकतो.

देवप्रयाग, श्रीनगर, रुद्रप्रयाग आणि कर्णप्रयागसारख्या प्रमुख ठिकाणांपर्यंत रेल्वे पोहोचल्याने या प्रदेशाची देशातील इतर भागांशी कनेक्टिव्हिटी मजबूत होईल. पर्यटक आणि भाविकांची वाहतूक अधिक सुलभ झाल्यास हॉटेल्स, स्थानिक वाहतूक, पर्यटन सेवा आणि इतर संबंधित व्यवसायांसाठी बाजारपेठ विस्तारण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर स्थानिक उत्पादनं आणि कृषीमाल मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवणं अधिक सुलभ होऊ शकतं. स्टेशन, रस्ते, लॉजिस्टिक आणि पर्यटन सुविधांच्या विकासामुळे स्थानिक रोजगार आणि सेवा क्षेत्रालाही फायदा होण्याची शक्यता आहे.

यासोबतच उत्तराखंडचा सीमावर्ती आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा भूभाग लक्षात घेता, मजबूत आणि विश्वासार्ह रेल्वे कनेक्टिव्हिटीला धोरणात्मक महत्त्वही आहे. त्यामुळे हा कॉरिडॉर भविष्यात पर्वतीय प्रदेशाच्या नागरी वाहतुकीसोबतच व्यापक लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटीचा महत्त्वाचा भाग ठरू शकतो.

म्हणून ऋषिकेश–कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्पाकडे फक्त १२५ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाच्या दृष्टीने पाहता येणार नाही. हा असा रेल्वे कॉरिडॉर आहे, जिथे प्रत्येक बोगदा, प्रत्येक पूल आणि प्रत्येक किलोमीटरमागे हिमालयाच्या भूगोलाशी जुळवून घेतलेलं अभियांत्रिकी आहे. पर्वतांमधून मार्ग काढत, खोल दऱ्या ओलांडत आणि कठीण भूगर्भरचनेतून रेल्वेची सलग कनेक्टिव्हिटी उभी करणं—हीच या प्रकल्पाची खरी ओळख आहे. आणि म्हणूनच ऋषिकेश–कर्णप्रयाग रेल्वे हा केवळ उत्तराखंडला रेल्वेने जोडणारा प्रकल्प नाही… तर हिमालयातील पायाभूत विकासाची क्षमता दाखवणारा एक महत्त्वाचा अभियांत्रिकी टप्पा आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
331,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा