राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पाटण्यातील निवासस्थानाबाहेर आज एक नाट्यमय आणि भावनिक प्रसंग घडला. राजदचे ज्येष्ठ नेते व मधुबन विधानसभा मतदारसंघातून तिकीट इच्छुक असलेले मदन शाह यांना पक्षाचे तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला.
राग आणि निराशेच्या भरात शाह यांनी आपला कुर्ता फाडला, रस्त्यावर पडून राहिले आणि यादव यांच्या घरासमोर मोठ्याने रडू लागले. या नाट्यमय निषेधामुळे परिसरात गर्दी जमली आणि काही वेळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहेत.
या प्रकारानंतर राजदच्या तिकीट वाटप प्रक्रियेत कथित गैरप्रकार आणि भ्रष्टाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मदन शाह यांनी स्पष्ट आरोप केला की, त्यांनी तिकिटासाठी पैसे देण्यास नकार दिल्यामुळेच त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांनी थेट राज्यसभा खासदार संजय यादव यांचे नाव घेत, “तिकिटाची दलाली झाली असून, पैसे घेऊन मधुबनची जागा डॉ. संतोष कुशवाह यांना देण्यात आली आहे,” असा दावा केला.
“पक्षाने माझ्यासारख्या प्रामाणिक आणि मेहनती कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे. आता पक्षात पैसे खर्च करणाऱ्यांनाच प्राधान्य दिले जात आहे,” असे शाह अश्रू ढाळत म्हणाले. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये शाह, लालू प्रसाद यादव यांच्या वाहनाचा पाठलाग करताना दिसले. या वेळी सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून शाह यांना परिसराबाहेर नेले आणि तेथील सुव्यवस्था पूर्ववत केली.







