महाराष्ट्र सरकारने राज्याच्या नव्या पोलिस महासंचालकपदासाठी (DGP) वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद वसंत दाते यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. १९९० बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या दाते यांची दोन वर्षांच्या निश्चित कालावधीसाठी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने बुधवारी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ ३ जानेवारी २०२६ रोजी संपत असून त्यांच्या जागी दाते पदभार स्वीकारणार आहेत.
लोकसेवा आयोगाच्या (UPSC) कमिटीच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकाश सिंग विरुद्ध भारत सरकार या निकालानुसार, राज्याच्या पोलिस प्रमुखांना किमान दोन वर्षांचा कार्यकाळ देणे बंधनकारक आहे.
त्यानुसार दाते यांच्याकडे पदभार स्वीकारण्याच्या तारखेपासून पुढील दोन वर्षे राज्याची कायदा-सुव्यवस्थेची धुरा असेल.
गेल्या एक वर्षापासून दाते हे राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीनंतर केंद्र सरकारने त्यांना अलीकडेच कार्यमुक्त केले.
हे ही वाचा:
पुतिन यांनी ठरवले सैनिकांना ‘नायक’
चालत्या कारमध्ये आग, एका वर्षाच्या बाळाचा मृत्यू
शेअर बाजारात नववर्षची सुरुवात उत्तम
एनआयए प्रमुख म्हणून त्यांनी दिल्ली ब्लास्ट प्रकरण, पहलगाम दहशतवादी हल्ला यांसारख्या अनेक संवेदनशील प्रकरणांची चौकशी केली. २६/११ मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा तसेच कुख्यात गँगस्टर अनमोल बिश्नोई यांना अमेरिकेतून भारतात आणण्याची प्रक्रिया त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाली. दोघांचीही सखोल चौकशी दाते यांनी स्वतः केली होती.
महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख असताना दाते यांनी पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी डीआरडीओचे वैज्ञानिक प्रदीप कुरुलकर यांना अटक केली. त्यांच्या नेतृत्वाखाली आयएसआयएसशी संबंधित अनेक दहशतवाद्यांवरही कारवाई करण्यात आली.
मुंबई क्राइम ब्रांचचे प्रमुख असताना रवि पुजारी गँग मोडून काढण्यात दाते यांची महत्त्वाची भूमिका राहिली. फिल्म निर्माता करीम मोरानी यांच्या घरावर गोळीबार, अभिनेता शाहरुख खान यांच्या कार्यालयाला धमक्या आणि महेश भट्ट यांच्या हत्येचा कट उधळून लावण्यात त्यांनी निर्णायक कामगिरी बजावली.
२६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यावेळी दाते हे मुंबईच्या सेंट्रल विभागाचे अतिरिक्त आयुक्त होते.
कामा रुग्णालयात दाखल झालेल्या पहिल्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होता. तेथे दहशतवाद्यांनी फेकलेल्या हँड ग्रेनेडमध्ये ते जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांनी खासगी रुग्णालयाऐवजी सरकारी रुग्णालयालाच प्राधान्य दिले होते.
अजमल कसाबला फाशी देण्याच्या वेळी दाते हे मुंबईचे संयुक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) होते. कसाबला आर्थर रोड जेलमधून येरवडा जेलमध्ये नेण्याचा अत्यंत गोपनीय ऑपरेशन त्यांच्या थेट देखरेखीखाली पार पडला.
साधी राहणी, कठोर शिस्त आणि लो-प्रोफाइल कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे दाते नियमांचे काटेकोर पालन करणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. रिकामी रस्ता असला तरी पादचारी सिग्नल हिरवा झाल्याशिवाय रस्ता न ओलांडणारा अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. खासगी कार्यक्रमांना जाताना सरकारी वाहनावरील स्टार झाकण्याची सूचनाही ते देतात.
अत्यंत संघर्षमय परिस्थितीतून त्यांनी आपला प्रवास केला. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी सकाळी वृत्तपत्र विक्रीचे कामही केले आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडणारे आणि चुकीच्या गोष्टीला ठामपणे ‘नाही’ म्हणणारे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे.
३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात दाते यांनी दहशतवादविरोधी कारवाई, संघटनात्मक सुधारणा, सामुदायिक पोलीसिंग आणि पोलीस कल्याण या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांना महात्मा गांधी शांती व सांप्रदायिक सद्भाव पुरस्कार, २००७ मध्ये पोलीस पदक (सराहनीय सेवा) आणि २००९ मध्ये राष्ट्रपती पोलीस पदक (वीरता) प्रदान करण्यात आले आहे.
पुणे येथील मूळ रहिवासी असलेल्या सदानंद दाते यांनी पुणे विद्यापीठातून आर्थिक गुन्ह्यांच्या निरीक्षणावर पीएचडी केली आहे. भंडाऱ्याचे एसपी, सीबीआय, मुंबई क्राइम ब्रांच, फोर्स वन, सीआरपीएफ, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालय आणि एटीएस अशा प्रत्येक पदावर त्यांनी ठसा उमटवला आहे. आता त्यांच्या नेतृत्वाकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.







