ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पाऊस आणि भूस्खलनाने कहर केला आहे. रविवारी ( ०१ जून ) संध्याकाळी सिक्कीममधील एका लष्करी छावणीत भूस्खलन झाल्याने काही सैनिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच नऊ सैनिक देखील बेपत्ता असल्याची माहिती आहे, त्यांच्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ७ वाजता उत्तर सिक्कीममधील चट्टन येथील लष्करी छावणीत भूस्खलन झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाले. या भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण बेपत्ता आहेत. मृतांची ओळख पटविण्यासाठी आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.
उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, लोचन आणि लाचुंग भागात सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत. मंगन जिल्ह्याचे एसपी सोनम देचू भुतिया यांनी सांगितले की, लाचेनमध्ये ११५ आणि लाचुंगमध्ये १,३५० पर्यटक मुक्कामी आहेत. भूस्खलनामुळे दोन्ही बाजूंनी रस्ते बंद झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाचुंगला जाणारा रस्ता संपर्क पूर्ववत करण्यात आला आहे आणि आजपासून पर्यटकांचे स्थलांतर सुरू होईल. बीआरओ (सीमा रस्ते संघटना) टीमने भूस्खलनामुळे साचलेला ढिगारा साफ केला आहे, खराब झालेले भाग पुन्हा बांधले आहेत आणि फिदांग येथील ‘सस्पेंशन ब्रिज’जवळील भेगा भरल्या आहेत, जेणेकरून लाचुंग-चुंगथांग-शिपग्यारे-शांकलांग-डिक्चू रस्त्यावर अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचा मार्ग मोकळा होईल.
हे ही वाचा :
महाराष्ट्र एटीएसची ठाण्याच्या पडघामध्ये धाड!
महाराष्ट्राचे ईलेक्ट्रिक वाहन धोरण एक महत्त्वाचे पाऊल!
आवळा खाणार त्याला आरोग्याचा वरदान
भद्रासन – पोटाचे दुखणे आणि गुडघ्याच्या वेदनेवर औषध
बीआरओने म्हटले आहे की, सततच्या मुसळधार पावसानंतर, ३० मे रोजी अचानक ढगफुटी झाल्याने उत्तर सिक्कीममध्ये मोठे नुकसान झाले. या काळात, १३० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आणि लाचेन, लाचुंग, गुरुडोंगमार, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि झिरो पॉइंट यासारख्या प्रमुख पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या आपत्तीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना भेगा पडल्या, पुलांचे नुकसान झाले आणि डिकू-सिंकलांग-शिपगियार रोड, चुंगथांग-लेशेन-झेमा रोड आणि चुंगथांग-लाचुंग रोड यासारख्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले.







