ग्राहकांच्या तक्रारींच्या आधारे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म स्विगी इन्स्टामार्टला नऊ नोटिसा बजावल्या आहेत. कालबाह्य (एक्सपायर्ड), कुजलेले, खराब, दूषित आणि मानवी सेवनासाठी असुरक्षित अन्नपदार्थांची ग्राहकांना पुरवठा केल्याच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
एफएसएसएआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगितले की, तपासादरम्यान अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या. त्यातील एका प्रकरणात अंडी अशा ब्रँड नावाने विकली जात होती, जी कंपनीच्या विद्यमान FSSAI परवान्यात मंजूर उत्पादन श्रेणीत समाविष्ट नव्हती. प्राधिकरणाने संबंधित फूड बिझनेस ऑपरेटरला (FBO) वैध परवाना मिळेपर्यंत अशा उत्पादनांची विक्री तातडीने थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आवश्यक असल्यास परवान्यात दुरुस्ती करण्यासाठी अर्ज करण्यासही सांगितले आहे.
नोटिसमध्ये ‘हेल्थिफाय १०० टक्के व्हे प्रोटीन १ किलो’ आणि ‘नोइस होमस्टाइल मद्रास मिक्स्चर विथ पीनट्स’ यांसारखी उत्पादने एक्सपायरी डेट संपल्यानंतरही ग्राहकांना पुरवल्याची तक्रार प्राप्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय ‘अक्षयकल्प ऑर्गेनिक अंडे’ या उत्पादनाबाबतही तक्रार करण्यात आली आहे. संबंधित अंडे कालबाह्य झालेले, कुजलेले, दुर्गंधीयुक्त असून त्यात संसर्गाची लक्षणे आढळल्यामुळे ते मानवी सेवनासाठी पूर्णपणे अयोग्य असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याचप्रमाणे ‘कक्के दा पराठा’ हा पदार्थ खराब झालेला आणि दुर्गंधीयुक्त असल्याची तक्रारही नोंदवण्यात आली असून तो खाण्यायोग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.
एफएसएसएआयने असा आरोपही केला आहे की, ग्राहकांनी तक्रारी नोंदवल्यानंतर आणि त्या कंपनीकडे पाठवूनही संबंधित फूड बिझनेस ऑपरेटरने कोणतीही प्रभावी सुधारात्मक कारवाई केली नाही. आणखी एका प्रकरणात शिशूंसाठीचे तयार खाद्यपदार्थ खराब आणि असुरक्षित अवस्थेत आढळले. विशेष म्हणजे ग्राहकाने दोषपूर्ण उत्पादन परत केल्यानंतरही तेच उत्पादन पुन्हा ग्राहकाला पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एफएसएसएआयने स्विगी इन्स्टामार्टकडे या सर्व कथित उल्लंघनांबाबत आणि त्यामागील कारणांबाबत सविस्तर स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच कंपनीच्या अन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा, करण्यात आलेल्या सुधारात्मक उपाययोजना आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार आहेत, याची माहितीही मागवली आहे.
हे ही वाचा:
एकेकाळी ‘नकोशी’ असणारी वाघीण बनली गिरडच्या जंगलाची ‘राणी’
भारतीय नौदलाला नवे बळ! अत्याधुनिक ‘आयएनएस महेंद्रगिरी’ ताफ्यात
राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणी २० जणांना जिल्हा सोडण्यास बंदी
कीव्हवर रशियाचे क्षेपणास्त्र हल्ले!
निर्धारित मुदतीत स्पष्टीकरण आणि अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत. तसे न केल्यास अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ अंतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते, असा इशाराही एफएसएसएआयने दिला आहे.







