मुंबईच्या पहिल्या मेट्रो मार्गाचे संचालन करणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (MMOPL) ला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. कंपनीने नॅशनल अॅसेट रीकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (NARCL) सोबत तब्बल २,७७१.३२ कोटी रुपयांच्या कर्जाच्या पुनर्रचनेचा करार केला असून, त्यामुळे कंपनीवरील दिवाळखोरीचे संकट टळले आहे. या निर्णयामुळे दररोज पाच लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा खंडित होण्याची भीती आता दूर झाली आहे.
९ जुलै रोजी दोन्ही संस्थांमध्ये मास्टर रिस्ट्रक्चरिंग अॅग्रीमेंट (MRA) वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे MMOPL वरील कर्जाचा मोठा भार कमी होणार असून, कंपनीविरुद्ध सुरू असलेली दिवाळखोरी प्रक्रिया मागे घेतली जाणार आहे. या आर्थिक पुनर्बांधणीमुळे कंपनीची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि मेट्रो-१चे संचालन कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवणे शक्य होणार आहे.
हे ही वाचा:
तेलबाजारावर युद्धाचे सावट
“काश्मीरमध्ये आमचेच दहशतवादी लढले आणि…”, हिजबुल कमांडरच्या कबुलीने पाकची नाचक्की
तीन अर्धशतकांनंतरही भारताचा डाव २८५ धावांवर आटोपला
MMOPL ही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांचा संयुक्त उपक्रम आहे. कंपनीत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा ७४ टक्के, तर MMRDAचा २६ टक्के हिस्सा आहे. वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर हा मुंबईतील सर्वाधिक वर्दळीचा मेट्रो मार्ग असून, शहराच्या पूर्व-पश्चिम जोडणीसाठी तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
कर्ज पुनर्रचना करारानुसार NARCL ला कंपनीच्या संचालक मंडळावर एक संचालक नियुक्त करण्याचा अधिकार मिळणार आहे. तसेच कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी NARCL आणि MMOPLच्या प्रतिनिधींची संयुक्त मॉनिटरिंग समितीही स्थापन केली जाणार आहे. ही समिती आर्थिक पुनर्रचनेची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे राबवली जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवणार आहे.
या करारामुळे MMOPL च्या कर्जात सुमारे १,१०० कोटी रुपयांहून अधिक कपात होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि मुंबईच्या पहिल्या मेट्रो मार्गाचे दीर्घकालीन संचालन अधिक सक्षमपणे करता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या आर्थिक पुनर्रचनेचा कोणताही नकारात्मक परिणाम प्रवाशांवर होणार नाही. मेट्रो सेवा पूर्वीप्रमाणेच नियमित आणि अखंड सुरू राहणार असल्याने लाखो मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.







