जळगाव जिल्ह्यात मोठी रेल्वे दुर्घटना घटना घडली आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांनी आगीच्या अफवेमुळे चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. यामुळे ११ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव- मुंबई रेल्वे मार्गावर माहिजी आणि परधाडे स्थानकादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेसचे ब्रेक दाबल्यामुळे ही घटना घडली. ब्रेक दाबल्यामुळे चाकातून आगीच्या ठिणग्या उडाल्या. याच दरम्यान, दरवाजाच्या कडेला बसलेल्या लोकांना ट्रेनला आग लागल्याचे वाटले. यानंतर त्यांनी ट्रेनला आग लागल्याचा एकच गोंगाट सुरु केला.
ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरताच प्रवाशांनी एक्सप्रेसची साखळी ओढली. यानंतर ट्रेन थांबताच त्याचवेळी, ट्रेनमधून काही प्रवाशांनी उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या बाजुने कर्नाटकडे जाणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसखाली हे प्रवासी चिरडले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. आताच्या आकडेवारीनुसार, दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये चार जण गंभीर असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यात वर्तविली जात आहे.
हे ही वाचा :
प्रजाकसत्ताक दिनी होणार संविधानाचा जागर
गोहत्या थांबवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी!
मणिपूरमधून जेडीयूने भाजपाचा पाठींबा काढून घेतला; सरकार राहणार स्थिर
पवई येथील कॉल सेंटरवर छापेमारी, ४ महिलांसह ७ जणांना अटक!
या दुर्घटनेवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस ट्वीटकरत म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत.
८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे,
जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटकरत म्हटले, जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ संध्याकाळी झालेल्या दुर्घटनेची माहिती आताच मी प्रशासनाकडून घेतली आहे. आग लागल्याची अफवा पसरल्याने पुष्पक एक्सप्रेस मधून काही प्रवाशांनी शेजारच्या रुळावर उड्या मारल्यामुळे सदर दुर्घटना घडली आहे अशी प्राथमिक माहिती मिळते. रेल्वेचे अधिकारी आणि त्यांची बचाव पथके देखील घटनास्थळी पोहचत आहेत. नक्की किती प्रवासी जखमी आहेत आणि मरण पावले आहेत याविषयी अद्याप आकडेवारी हाती आलेली नाही. मात्र तातडीने बचाव पथकांनी जखमींना रुग्णालयात हलवावे आणि योग्य ते उपचार करावेत अशा सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील जळगाव येथील रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. स्थानिक प्रशासन जखमींना सर्वतोपरी मदत करत आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करतो.







