उत्तर प्रदेशातील वीजपुरवठा विभागाच्या एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे गोरखपूरपासून लखनऊपर्यंत खळबळ माजली. विजेचे बिल म्हणून ग्राहकाने चार हजार रुपये जमा केले. मात्र त्याने १९७ कोटी रुपये जमा केल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे बुधवार संध्याकाळपासून गुरुवार संध्याकाळपर्यंत अधिकाऱ्यांची धांदल उडाली होती. अखेर लखनऊच्या शक्ती भवनमधून हीच चूक दुरुस्त करण्यात आली.
सहजनवा क्षेत्रातील तेनऊ गावातील वीजग्राहक छोहाडीदेवीचा मुलगा त्याच्या घरगुती वीजजोडणीचे बिल (जोडणी क्रमांक १९७५८७६०००) जमा करण्यासाठी संध्याकाळी ग्रामीण वीजबिलभरणा केंद्रात पोहोचला. त्याचे विजेचे बिल चार हजार ९५० रुपये आले होते. तेथील कर्मचाऱ्याने पैसे घेतले, मात्र नोंद करताना या कर्मचाऱ्याने गडबड केली. कर्मचाऱ्याने वीजबिल रकमेचा आकडा लिहिण्याऐवजी संबंधित रकान्यात ग्राहकाचा १० अंकी जोडणी क्रमांक नोंद केला आणि पावती दिली.
हे ही वाचा:
हवामान बदल शिखर परिषदेसाठी मोदी दुबईत!
‘बोगद्यातून सुटका झालेले सर्व कामगार तंदुरुस्त’
राजस्थान, मध्य प्रदेशात भाजप; तेलंगणात बीआरएसपेक्षा काँग्रेस सरस
दत्ता दळवी यांचे पाप प्रकाश आंबेडकरांपेक्षा मोठे आहे का?
त्यानंतर कोणीतरी १९७ कोटी रुपयांचे वीजबिल भरल्याची बातमी सर्वदूर पसरली. मात्र पावती पाहिल्यानंतर स्वतः कर्मचाऱ्याला आपण केलेली चूक उमगली. त्याने लगेचच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवले आणि ही चूक दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले. बुधवारी संपूर्ण रात्रभर अकाऊंट विभागाशी संबंधित सर्व कर्मचारी ही चूक दुरुस्त करण्याच्या कामाला लागले. अखेर लखनऊतील शक्ती भवनमधील डेटा सेंटरच्या मार्गदर्शनानुसार, हे पेमेंट रद्द करण्यात आले आणि चूक दुरुस्त करण्यात आली. तेव्हा कुठे वीजपुरवठा अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला.







