मराठी रंगभूमीवरील तेजस्वी आणि प्रतिभावान नाटककार, मालवणी भाषेच्या नाटकांचा पाया रचणारे गंगाराम गवाणकर (वय ८६) यांचे सोमवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. दहिसर (पूर्व) येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना आणि नातवंडं असा परिवार आहे.
गवाणकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी (२८ ऑक्टोबर) दहिसरमधील अंबावाडी, दौलतनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी ९.३० वाजता त्यांचे पार्थिव बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यांच्या निधनाने मराठी नाट्यविश्वात शोककळा पसरली असून, रंगकर्मी, सहकलाकार आणि साहित्यप्रेमी या सर्वांनी त्यांच्या जाण्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
गंगाराम गवाणकर हे नाव मराठी रंगभूमीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांच्या लेखणीतून साकारलेलं प्रसिद्ध नाटक ‘वस्त्रहरण’ हे मालवणी रंगभूमीचं एक ऐतिहासिक पर्व ठरलं. या नाटकाने केवळ प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणले नाहीत, तर मालवणी बोलीभाषेला मुख्य प्रवाहात आणून सांस्कृतिक प्रतिष्ठाही दिली. या नाटकाचे तब्बल ५,००० पेक्षा अधिक प्रयोग झाले, तर ‘वात्रट मेले’ या त्यांच्या दुसऱ्या नाटकाचेही २,००० पेक्षा अधिक प्रयोग झाले होते.
दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे ‘वस्त्रहरण’चा प्रयोग सादर होणं हे मराठी रंगभूमीसाठी अभिमानास्पद ठरलं.
‘वस्त्रहरण’मुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे कलाकार मच्छिंद्र कांबळी यांसारखे प्रतिभावान नट उदयास आले. या नाटकाने मालवणी बोलीला एक नवं जीवन दिलं, तर ग्रामीण कोकणी संस्कृतीचं जिवंत दर्शन घडवलं. गवाणकर यांनी १९७१ साली आपल्या रंगभूमी प्रवासाची सुरुवात ‘बॅकस्टेज’वरून केली. त्याच काळात ते एमटीएनएलमध्ये नोकरी करत होते. नोकरीच्या जोडीला त्यांनी नाट्यलेखनाची आवड जोपासली. संघर्षमय काळातही त्यांनी कलाकृतींमधून समाजातील वास्तव, विनोद आणि व्यंग यांचा सुंदर संगम साधला.
हे ही वाचा :
“महागठबंधन सुधारणा करू शकते पण वक्फ कायदा रद्द करू शकत नाही”
“ट्रम्प यांची स्तुती करण्याच्या ऑलिंपिक खेळात शरीफ सुवर्णपदकासाठी आघाडीवर”
“मतदार यादी वेळेवर तयार झाली नाही तर निवडणुका होणार नाहीत, राष्ट्रपती राजवट लागू होईल”
“भारतासोबत खूप मोठी चूक करतोय” अमेरिकेच्या माजी वाणिज्य सचिवांनी असे का म्हटले?
‘वस्त्रहरण’, ‘वात्रट मेले’ व्यतिरिक्त त्यांनी ‘वेडी माणसं’, ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वरपरीक्षा’, ‘वन रुम किचन’ अशी अनेक गाजलेली नाटके लिहिली. विशेष म्हणजे, ‘दोघी’ हे नाटक त्यांनी काळाच्या पुढचा विचार करून लिहिलं होतं.
त्यांच्या नाटकांत वास्तववादी दृष्टिकोन आणि लोकजीवनातील कटू गोड अनुभवांचे जिवंत चित्रण आढळते.
आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष, नाट्यलेखनातील अनुभव आणि ‘वस्त्रहरण’च्या आठवणी त्यांनी ‘व्हाया वस्त्रहरण’ या पुस्तकात जपल्या आहेत.
गंगाराम गवाणकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमीने एक सर्जनशील, लोकभाषेचा प्रामाणिक पुरस्कर्ता आणि मालवणी रंगभूमीचा आधारस्तंभ गमावला आहे. त्यांच्या लेखणीने कोकणचा आवाज महाराष्ट्रभर पोहोचवला — आणि म्हणूनच त्यांच्या जाण्याने रंगभूमीवर एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.







