साडेतीन महिन्यांचा अडथळा संपला! होर्मुझ ओलांडून भारतात पोहोचले एलएनजी जहाज

६२ हजार टन एलएनजी घेऊन ‘दिशा’ जहाज दाहेज बंदरात दाखल

साडेतीन महिन्यांचा अडथळा संपला! होर्मुझ ओलांडून भारतात पोहोचले एलएनजी जहाज

इराण- अमेरिका शांतता करारानंतर आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदी हटवल्यानंतर भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. तब्बल ६२,३७० मेट्रिक टन द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) घेऊन जाणारे ‘एलएनजीसी दिशा’ हे सुपरटँकर गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील दाहेज बंदरात सुरक्षितपणे दाखल झाले आहे. इराण-अमेरिका संघर्ष संपल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून भारतात पोहोचणारे हे पहिले एलएनजी जहाज ठरले आहे.

साडेतीन महिने समुद्रात अडकले होते जहाज

माल्टाचा ध्वज असलेले ‘एलएनजीसी दिशा’ हे जहाज कतारमधील रास लाफान बंदरातून भारताकडे रवाना होणार होते. जहाज १ मार्च २०२६ रोजी रास लाफान येथे पोहोचले होते आणि २ मार्च रोजी त्यावर एलएनजीची लोडिंग प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र त्याच काळात इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष तीव्र झाल्याने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक धोक्यात आली. परिस्थिती इतकी गंभीर बनली होती की, जहाज भारतात कधी पोहोचेल याबाबत कोणतीही खात्री नव्हती. परिणामी हजारो टन एलएनजी घेऊन हे जहाज जवळपास साडेतीन महिने अडकून पडले होते.

जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी होर्मुझ सामुद्रधुनी इराण-अमेरिका लष्करी संघर्षामुळे धोकादायक क्षेत्र बनली होती. जगभरातील अनेक व्यापारी जहाजांना मार्ग बदलावा लागला, तर काही जहाजे बंदरांमध्येच थांबवण्यात आली. या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेतही अस्थिरता निर्माण झाली होती. विशेषतः एलएनजी आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला होता.

इराण आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक शांतता करार झाल्यानंतर १५ जूनपासून होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा जहाजवाहतुकीसाठी खुली करण्यात आली. त्यानंतर ‘एलएनजीसी दिशा’ने आपला प्रवास सुरू केला आणि अखेर १९ जून रोजी गुजरातमधील दाहेज बंदरात पोहोचले. या जहाजाच्या सुरक्षित आगमनामुळे केवळ भारतालाच नव्हे, तर जागतिक सागरी व्यापारालाही मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानातील गुरुद्वारात शीख दाम्पत्याच्या हत्या प्रकरणी मुख्य संशयिताला अटक

लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधामोहन मिश्राला अटक

मान्सूनची वाटचाल ठप्प! एल निनोच नव्हे, ‘हे’ घटकही रोखतायत पावसाचा मार्ग

“प्रत्येक संकटावर लष्करी कारवाई हाच उपाय नसतो”

तब्बल ६२,३७० मेट्रिक टन एलएनजीच्या आगमनामुळे भारताच्या नैसर्गिक वायू पुरवठ्याला मोठा आधार मिळणार आहे. औद्योगिक वापर, वीज निर्मिती तसेच घरगुती गॅस वितरणासाठी या पुरवठ्याचे महत्त्व मोठे मानले जाते. ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या जहाजाचे आगमन भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी सकारात्मक संकेत असून मध्यपूर्वेतील तणाव कमी झाल्याने पुढील काळात इंधन पुरवठा अधिक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version