आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनोखा उपक्रम हाती घेऊन त्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट महिलांच्या हाती सोपवले आहे. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी जाहीर केले होते की, महिला दिनाच्या दिवशी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट अशा महिलांद्वारे चालवले जातील, ज्या विविध क्षेत्रांमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. त्यांनी सहा प्रतिभावान महिलांकडे आपले सोशल मीडिया अकाउंट सोपवून त्यांच्या प्रेरणादायी कहाण्यांवर प्रकाश टाकून नारी शक्तीप्रती असलेल्या वचनबद्धतेला अधोरेखित केले आहे.
देशाच्या वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या या महिलांचा अनोखा प्रवास पंतप्रधान मोदींच्या पुढाकारातून दिसून आला. चेन्नई येथील वैशाली रमेशबाबू, दिल्ली येथील डॉ. अंजली अग्रवाल, नालंदा येथील अनिता देवी, भुवनेश्वर येथील एलिना मिश्रा, राजस्थान येथील अजैता शाह आणि सागर येथील शिल्पी सोनी या महिला सध्या सक्षमपणे नरेंद्र मोदींचे अकाउंट सांभाळत आहेत.
एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी
एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी या संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या दोन शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एकत्रितपणे पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडिया अकाउंटची जबाबदारी घेतली आहे. एलिना मिश्रा या भाभा अणु संशोधन केंद्र (BARC), मुंबई येथे अणुशास्त्रज्ञ आहेत, तर शिल्पी सोनी या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेत (ISRO) अवकाश शास्त्रज्ञ आहेत. भारत देश हा विज्ञानासाठी सर्वात चैतन्यशील ठिकाण असून आम्ही अधिकाधिक महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी आवाहन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
अजैता शाह
फ्रंटियर मार्केट्सच्या संस्थापक आणि सीईओ अजैता शाह यांनी ३५,००० हून अधिक महिला उद्योजकांना डिजिटली सक्षम बनवून ग्रामीण उद्योजकतेचे स्वरूप सुधारण्यासाठी काम केले आहे. त्यांच्या उपक्रमाद्वारे त्या महिलांना स्वावलंबी व्यवसाय मालक आणि जीवनावश्यक वस्तू, सेवांचे शेवटच्या टप्प्यातील वितरक बनण्यास मदत करते, ग्रामीण बाजारपेठ आणि आर्थिक विकासातील दरी भरून काढते.
वैशाली रमेशबाबू
बुद्धिबळातील प्रतिभावान अशी वैशाली रमेशबाबू ही वयाच्या सहाव्या वर्षापासून स्पर्धात्मकपणे बुद्धिबळ खेळत आहे. तिने २०२३ मध्ये बुद्धिबळ ग्रँडमास्टर ही प्रतिष्ठित पदवी मिळवली आहे. तिने तिच्या धोरणात्मक बुद्धिमत्तेने आणि दृढनिश्चयाने जागतिक व्यासपीठावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे.
अनिता देवी
‘बिहारची मशरूम लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनिता देवी यांनी २०१६ मध्ये माधोपूर शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. मशरूम लागवडीद्वारे, त्यांनी केवळ ग्रामीण महिलांचे उत्थान केले नाही तर शेकडो ग्रामीण महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत, ज्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
डॉ. अंजली अग्रवाल
सार्वत्रिक सुलभतेचा पुरस्कार करणाऱ्या चळवळीचे दीपस्तंभ, डॉ. अंजली अग्रवाल या समर्थ्यम सेंटर फॉर युनिव्हर्सल अॅक्सेसिबिलिटीच्या संस्थापक आहेत. तीन दशकांहून अधिक काळ, त्यांनी सर्वसमावेशक गतिशीलता आणि अडथळामुक्त पायाभूत सुविधा सुनिश्चित करण्यासाठी समर्पित प्रयत्न केले आहेत, विशेषतः शाळा आणि सार्वजनिक जागांमध्ये अपंग लोकांसाठी सुलभतेची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी काम केले आहे.
हे ही वाचा..
हंपीमध्ये इस्रायली पर्यटकासह तरुणीवर सामुहिक बलात्कार; पुरुष साथीदारांवर केला हल्ला
चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरणारा संघ होणार मालामाल; किती रुपये मिळणार बक्षीस?
फेब्रुवारीत २२० कोटींहून अधिक आधार ऑथेंटिकेशन व्यवहार
भारताकडून अमेरिकन आयातीवरील कर कमी करण्यास सहमती; ट्रम्प यांचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिलांच्या योगदानाचे कौतुक करत विकसित भारत मोहिमेच्या प्रणेत्या असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, या महिलांचा दृढनिश्चय आणि यश आपल्याला महिलांमध्ये असलेल्या अमर्याद क्षमतेची आठवण करून देतो. आज आणि दररोज, आम्ही विकसित भारत घडवण्यात त्यांचे योगदान साजरे करतो आहोत.