आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून केवळ अंतिम सामना उरला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये होणार आहे. दुबईत हा सामना रविवार, ९ मार्च रोजी खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी २.३० वाजता सुरू होईल. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा चार गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, दुसरीकडे न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ५० धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरणारा संघ चांगलाच मालामाल होणार आहे. इतकेच नाही तर, पराभूत होणाऱ्या संघालाही चांगलाच धनलाभ होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या स्पर्धेसाठीची बक्षीस रक्कम आधीच जाहीर केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला सुमारे १९.४८ कोटी रुपये (२.२४ दशलक्ष डॉलर्स) मिळणार आहेत. अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला, म्हणजेच उपविजेत्या संघाला सुमारे ९.७४ कोटी रुपये (१.१२ दशलक्ष डॉलर्स) मिळणार आहेत.
शिवाय, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांनाही बक्षीस मिळाले आहे. सुमारे ४.८७ कोटी रुपये (५,६०,००० अमेरिकन डॉलर्स) इतके बक्षीस देण्यात आले. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांना ही रक्कम मिळाली आहे. तर, गट फेरीतून बाहेर पडलेल्या संघांनाही बक्षीस रक्कम देण्यात आली आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना (अफगाणिस्तान आणि बांगलादेश) समान रक्कम ३,५०,००० डॉलर्स (सुमारे ३.०४ कोटी रुपये) मिळाले. तर सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या संघांना (पाकिस्तान आणि इंग्लंड) समान रक्कम १,४०,००० डॉलर्स (सुमारे १.२२ कोटी रुपये) मिळाले.
हे ही वाचा :
कोकेन, हेरॉईन या ड्रग्सला मागे टाकत हेड्रोपोनिक गांजा तस्करीत अव्वल
भारताकडून अमेरिकन आयातीवरील कर कमी करण्यास सहमती; ट्रम्प यांचा दावा
महिला दिनानिमित्त सीएसएमटी- साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’चे सारथ्य महिलांच्या हाती
माशांच्या हालचालींवर नजर ठेवायला चीन- मालदीवमध्ये करार? नक्की हेच कारण की ड्रॅगनचा वेगळाच मनसुबा?
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गट फेरीत सामना जिंकल्याबद्दल संघाला ३४,००० डॉलर्स (सुमारे २९.६१ लाख रुपये) मिळाले. याशिवाय, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आठही संघांना १,२५,००० डॉलर्स (सुमारे १.०८ कोटी रुपये) ची हमी रक्कम देण्यात आली आहे. आयसीसी या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण ६.९ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६० कोटी रुपये) बक्षीस रकमेचे वितरण करत आहे. हे २०१७ पेक्षा ५३ टक्के जास्त आहे.