मुंबई येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) प्रादेशिक केंद्रात आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ “सशक्त महिला, सशक्त राष्ट्र” या प्रेरणादायी संकल्पनेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात क्रीडा, तंदुरुस्ती, नेतृत्व आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. तरुण मुलींना आत्मविश्वास, शिस्त आणि सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. स्मिता डोळस सोमणे, अतिरिक्त महासंचालक, मूल्यांकन संचालनालय, मुंबई (IRS – १९९८ बॅच) उपस्थित होत्या. त्या एक उत्कृष्ट धावपटू आणि फिटनेसप्रेमी असून त्यांनी आतापर्यंत ३४ मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉन पूर्ण केल्या आहेत. तसेच गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झाली असून साताऱ्यातील अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये त्यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे.
यावेळी बोलताना डॉ. स्मिता डोळस सोमणे म्हणाल्या, “महिलांना आत्मविश्वास, तंदुरुस्ती आणि स्वप्न पूर्ण करण्याचे धैर्य मिळाले तरच खऱ्या अर्थाने मजबूत राष्ट्र घडते.”
हे ही वाचा:
भारतीय कंपनी हिकल राफेल विमानाच्या कंट्रोल सिस्टीमसाठी बनवणार महत्त्वाचे घटक
होर्मुझ सामुद्रधुनीत किती भारतीय जहाजं अडकली?
विश्वविजेत्या टीम इंडियावर पैशांचा पाऊस!
‘आयुष्यातील सर्वात मोठी चूक’ म्हणत सायली सुर्वेने स्वीकारला हिंदू धर्म
कार्यक्रमात “सशक्त महिला, सशक्त राष्ट्र” या विषयावर दोन विशेष पॅनेल चर्चांचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांनी आपल्या अनुभवांमधून आलेल्या आव्हानांची आणि प्रेरणादायी प्रवासाची माहिती सहभागींसोबत शेअर केली.

या कार्यक्रमात विशेष पाहुण्यांमध्ये खालील मान्यवरांचा समावेश होता:
हिमानी शिवपुरी – ज्येष्ठ चित्रपट व दूरदर्शन अभिनेत्री
मधु चोप्रा – उद्योजिका व चित्रपट निर्माती
अलिना आलम – राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, Mitti Café
प्रियांका बजाज सिबल – मिसेस इंडिया २०२२
निवेदिता श्रेयांस – शिक्षणतज्ज्ञ, संचालक (पीआर), हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट
अयोनिका पॉल – ऑलिम्पियन व आंतरराष्ट्रीय रायफल शूटर
स्नेहल पिंटो – संचालक, रायन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स
पारुल चावला – पिक्चर अँड क्राफ्ट मीडियाच्या प्रमुख व जनसंपर्क तज्ज्ञ
पॅनेल चर्चेदरम्यान वक्त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतःवरील विश्वास, जिद्द, नेतृत्व, क्रीडेत सहभाग आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी मधू चोप्रा म्हणाल्या, “महिला स्वतःवर विश्वास ठेवतात आणि एकमेकींना साथ देतात तेव्हा त्या केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी मोठा बदल घडवतात.”
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांना त्यांच्या प्रेरणादायी कार्याबद्दल गौरवून फिट इंडिया मूव्हमेंटचे फिट इंडिया ऍम्बेसेडर म्हणून सन्मानित करण्यात आले. या उत्सवात मुली आणि तरुण सहभागींकडून विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. त्यामध्ये:
मुलींचे कुस्ती प्रात्यक्षिक, मिट्टी कॅफेच्या मुलांचे विशेष सादरीकरण, योगासन प्रात्यक्षिक, “मर्दानी” स्वसंरक्षण सादरीकरण तसेच सहभागींच्या मानसिक आरोग्य आणि अंतर्गत संतुलनासाठी हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट च्या वतीने विशेष ध्यान सत्र आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमात सुमारे ५०० मुली, त्यांचे पालक आणि स्थानिक नागरिक उत्साहाने सहभागी झाले. त्यामुळे साई प्रादेशिक केंद्र, मुंबई येथे प्रेरणादायी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमातून भारतीय क्रीडा प्राधिकरणाने महिलांच्या क्रीडा सहभागाला प्रोत्साहन देण्याबरोबरच फिटनेसला जीवनशैलीचा भाग बनवण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. महिलांना क्रीडा, शिक्षण आणि आरोग्याच्या माध्यमातून सक्षम करणे हेच “सशक्त महिला, सशक्त राष्ट्र” या संकल्पनेचे खरे प्रतिबिंब असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.







