मुंबईतील नागपाडा परिसरात भरदिवसा दरोडा टाकून ३ कोटींचे सोने लुटण्यात आले आहे.डायना ब्रिजजवळ सकाळी ८:४५ वाजताच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दुसऱ्या दुचाकीला अडवले आणि सुमारे ३ किलो सोने असलेली बॅग घेऊन पळ काढला.
भरदिवसा झालेल्या दरोड्याच्या घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
नागपाडा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे सोने काळबादेवी येथील पावसकर ब्रदर्स या दागिन्यांच्या दुकानाचे होते. दुकानातील दोन कर्मचारी सोने घेऊन एन.एम. जोशी मार्गावरील एका उत्पादन युनिटकडे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
ते डायना ब्रिजजवळ पोहोचताच, दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मागून येऊन त्यांना थांबवले आणि सोन्याने भरलेली बॅग हिसकावून घेतली.दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांच्या स्कूटरची चावी देखील घेतली आणि घटनास्थळावरून पळून गेले.
हे ही वाचा:
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन!
एअर इंडिया विमान अपघात एक प्रवासी बचावला!
एअर इंडिया विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर!
या घटनेनंतर नागपाडा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुदध गुन्हा नोंदवला आणि मुंबई गुन्हे शाखेसोबत समांतर तपास सुरू केला. सध्या अनेक पथके पूल आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत आहेत आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गुप्त सूत्रांचाही वापर केला जात आहे.
पोलिसांना असा संशय आहे की दरोडेखोर काळबादेवी येथील कर्मचाऱ्यांचा पाठलाग करत होते, हल्ला करण्यासाठी योग्य क्षणाची वाट पाहत होते. सोन्याची वाहतूक करण्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची संभाव्य भूमिका किंवा निष्काळजीपणा देखील तपासत आहेत.







