गोवंडीतील लोटस जंक्शन येथे शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरने एका मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकल स्वारासह चार जणांचा मृत्यु झाला आहे, मृत्यू झालेले चौघेही एकाच कुटूंबातील असून चौघे एकाच मोटारसायकलवरून साकिनाकाच्या दिशेने निघाले होते.
या अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर रास्ता रोको आंदोलन केले होते.
दरम्यान वाहतूक कोंडी होत असल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना रास्ता मोकळा करण्याचे आवाहन केले मात्र नागरिकांनी आंदोलन सुरूच ठेवल्यामुळे आंदोलकांना हटविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
देवनार पोलिसांनी अपघाताप्रकरणी डंपर चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती परिमंडळ ६चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी दिली.
पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी साकिनाका येथे राहणारे काका आणि तीन पुतणे एकाच मोटारसायकल वरून गोवंडी देवनारच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, लोटस जंक्शन येथे एका भरधाव डंपरने मोटारसायकलला धडक दिली, ही धडक एवढी भीषण होती की, या अपघातात मोटारसायकल वरील चौघांचा मृत्यू झाला.या अपघातानंतर डंपर चालकाने डंपर सोडून तेथून पळ काढला.
या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर ठिय्या आंदोलन केले, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आंदोलकांना तेथून हटविण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांनी तेथून जात नसल्यामुळे पोलिसांनी अधिक कुमक मागविण्यात आली.
हे ही वाचा:
ब्लॅक बॉक्स डेटा डीकोड केला जातोय!
पुतीन यांची इच्छा, ट्रम्प यांची करणी भारत-चीन यांची हातमिळवणी
“विश्वासाधारित शासना”मुळे अर्थव्यवस्था शिखर गाठू शकते
विमान अपघात : चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत
आंदोलन चिघळत असल्याचे बघून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न केला असता आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केली. अखेर पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करून आंदोलकांना ताब्यात घेऊन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
दरम्यान अपघाता प्रकरणी देवनार पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती परिमंडळ ६चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी दिली.







