तिबेटचे धर्मगुरू, बौद्ध धर्मीयांमध्ये अत्यंत वंदनीय नेते दलाई लामा तेन्झिन गात्सो यांचा काल ६ जुलै रोजी ९० वा वाढदिवस होता. चीनने तिबेट गिळल्यानंतर त्यांनी भारताचा आश्रय घेतला. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे कार्यरत असलेल्या तिबेट मध्यवर्ती प्रशासनाचे अर्थात तिबेट सरकारचे ते प्रमुख आहेत. वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांचे अभिष्ट चिंतन केले. त्यांना शुभेच्छा दिल्या. परंतु चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कारकीर्द उतरणीला लागल्यानंतरही काँग्रेसची त्यांच्यावर असलेली निष्ठा पातळ झालेली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यात निष्ठेला स्मरून दलाई लामा यांना शुभेच्छा दिल्या नाहीत. डॉ. मनमोहन सिंह देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी एकदाही दलाई लामा यांना शुभेच्छा दिल्या नव्हत्या. चीनचे मिंधे कोण? चीनला कोण घाबरतो ? चीनचे हितसंबंध कोण जपतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दलाई लामा यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मिळाली. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हे मे महिन्यापासून गायब आहेत. त्यांच्याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. ते आता फार राष्ट्राध्यक्ष पदी राहणार नाहीत, इथपासून त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यात आले आहे, इथपर्यंत सर्व प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. चीनमध्ये जिनपिंग यांचे मे पासून जाहीर कार्यक्रमात सुद्धा दर्शन होत नाही. ग्लोबल टाईम्समध्ये त्यांचे फोटो येईनासे झालेले आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ब्राझिल, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आदी दहा देशांचा समुह असलेल्या ब्रिक्सच्या बैठकीत जिनपिंग यांची अनुपस्थिती या चर्चांना बळ देणारी ठरली आहे. ब्रिक्सची बैठक यंदा ब्राझिलमध्ये आहे.



