व्यापार करार करण्यासाठी अमेरिकेने भारताला दिलेली ९ जुलैची डेडलाईन आज सरली. व्यापार करार टप्प्यात असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे. मिनी डील होणार असल्याचीही चर्चा आहे. परंतु प्रत्यक्षात या क्षणापर्यंत तरी असा करार झाल्याची घोषणा झालेली नाही. आम्हाला राष्ट्रहीत जपणारा चांगला करार हवा आहे, आम्ही डेडलाईन मानत नाही, असे भारताचे वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी वारंवार सांगितले. तसे करूनही दाखवले. ९ जुलैच्या आधी व्यापार करार झाला नसल्याने ट्रम्प यांनी काल १४ देशांना ३५ टक्के टेरीफ लावून कोलले आहे. भारताचा त्यात अपवाद आहे. ही भारताची ताकद आहे. ही ताकद ओळखणारे सरकार केंद्रात बसले आहे. यापुढे करार होईल न होईल भारताचा ठामपणा जगाने पाहीलेला आहे. ब्रिक्स गटामुळे अमेरिकेचा पित्त प्रकोप झालेला दिसतो. ब्रिक्स देशांवर १० टक्के अतिरिक्त टेरीफची घोषणा ट्रम्प यांनी केली. भारतही याला अपवाद नसेल. आम्ही त्यांच्या तांब्यावर ५० टक्के आणि फार्मा क्षेत्रावर २०० टक्के टेरीफ लावू असे, ब्राझिलमध्ये झालेल्या ब्रिक्स परीषदेच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी जाहीर केलेले आहे. अशा प्रकारच्या धमक्या एका बाजूला आणि ट्रेड डील अर्थात व्यापार कराराच्या वाटाघाटी एका बाजूला असे चित्र गेले तीन महिने आपण पाहीलेले आहे.



