चीनची दक्षिणी समुद्रात सुरू असलेली दादागिरी आणि वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने क्वाड्रीलॅटरल सेक्युरीटी डायलॉग अर्थात क्वाड या गटाची स्थापना करण्यात आली. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यानंतर क्वाडचे लोणचे घालण्याचा कार्यक्रम सुरू झाला. चीन कधीही तैवानचा घास घेऊ शकतो, अशी परीस्थिती निर्माण झालेली असताना क्वाड हा गट एखाद्या मृत शरीरासारखा थंड पडलेला आहे. तैवानच्या मुद्द्यावरून युद्ध झाले तर अमेरिकेसोबत कोणीही नसेल असे चित्र आज तरी दिसते आहे. अमेरिकेचे कर्म तैवानला भोगावे लागणार अशी स्थिती आहे. दुसऱ्या महायुद्धातील सुरूवातीच्या पॅटर्नची इथे पुनरावृत्ती होणार याची दाट शक्यता आहे. मदतीचा हात आणि धाक ही दोन शस्त्रे वापरून अमेरिकेने जगाला अनेक वर्षे आपल्या पंजाखाली ठेवले. एकेकाळी परराष्ट्र धोरणात अमेरिकेच्या सावलीसारखी वावरणारी राष्ट्रे आता अमेरिकेला फाट्यावर मारताना दिसत आहेत. हे कर्तृत्त्व ट्रम्प यांचे आहे. त्यांनी सगळ्या जगाला अमेरिकेच्या विरोधात उभे केले आहे. अमेरिकेला ग्रेट करण्याच्या बाता ट्रम्प यांनी केल्या. जुनी नाती टीकवूनही हे शक्य होते. परंतु त्यांना ते जमले नाही. पूर्वी अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांचे मित्र-शत्रू एक होते. आता ती परीस्थिती राहीली नाही. याचा सगळ्यात मोठा लाभार्थी चीन हाच ठरणार आहे.



