गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काम केले त्याचा आवाका खूप मोठा आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी झेंडा रोवला आहे. संरक्षण, अर्थकारण, परराष्ट्र धोरण अशा मोजक्या क्षेत्रातील यशाची चर्चा होते, बरेच विषय अनुल्लेखित राहतात. हरीत उर्जेचा प्रांत त्यापैकीच एक आहे. पॅरीस करारात भारताने जे लक्ष्य गाठण्यासाठी २०३० ची काल मर्यादा स्वीकारली होती. ती पाच वर्षांपूर्वी गाठण्यात आपल्याला यश आले आहे. भारतात तेल, कोळशाला फाटा देऊन आपण ५० टक्के स्वच्छ ऊर्जा तयार करण्यात यश आलेले आहे. आपण अमेरिका, चीन, फ्रान्ससारख्या अनेक देशांना मागे टाकले आहे. हा चमत्कार सर्वसामान्यांचे आरोग्य आणि देशाच्या अर्थकारणाला बळ देणारा आहे. जगाची लोकसंख्या वाढते आहे, स्वाभाविकपणे इंधनाचा वापर वाढतो आहे. प्रदूषण वाढते आहे आणि त्यामुळे जगात उष्मा वाढला आहे. हिमनग वितळू लागले आहेत. जगाला ग्लोबल वॉर्मिंगचा फटका बसतो आहे. सर्वत्र पूर, दुष्काळाचे थैमान निर्माण झाले आहे. अमेरिका, चीनसारखे पुढालेले देशही याला अपवाद नाहीत. हे सगळे रोखले नाही तर एक दिवस मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तेल, कोळशामुळे होणारे प्रदूषण जर रोखायचे असेल तर स्वच्छ ऊर्जेकडे वळल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन जगातील देश एकत्र आले. त्यांनी एकदिलाने प्रयत्न सुरू केले.



