संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (२१ जुलै) सुरू होत आहे. ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर भारताच्या अचूक हवाई हल्ल्यानंतर संसदेचे हे पहिलेच अधिवेशन आहे. हे अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत सुरू राहील आणि ३२ दिवसांत २१ बैठका होतील. स्वातंत्र्यदिनाच्या समारंभासाठी संसदेचे दोन्ही सभागृह १२ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट पर्यंत तहकूब केले जातील आणि १८ ऑगस्ट रोजी पुन्हा सुरू होतील. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केल्याने लोकसभा दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, सरकार विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नावर चर्चा करण्यास तयार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व खासदारांना संसदेचे कामकाज शांततेत चालविण्याची विनंती केली. ते म्हणाले की, सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. अध्यक्षीय सभापती जगदंपिका पाल यांनी सर्वांना संयम बाळगण्याची विनंती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरला ‘विजय उत्सव’ म्हणून वर्णन केल्याबद्दल केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, ज्या प्रकारे भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करून दहशतवाद्यांना योग्य उत्तर दिले, त्यातून आपण जगाला संदेश दिला की दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही.
लोकसभेचे कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षाच्या खासदारांनी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यांनी सरकारकडून यावर त्वरित चर्चा करण्याची मागणी केली. दुसरीकडे, सभापतींनी प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले. दोन प्रश्न विचारल्यानंतरही गोंधळ सुरूच राहिला. यानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले. मात्र, सभागृहाचे कामकाज १२ वाजता पुन्हा सुरु झाले तेव्हा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पुन्हा घोषणाबाजी सुरु केली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज २ वाजूपर्यंत तहकूब करण्यात आले.







