पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी पंजाबमधील आदमपुर विमानतळाचे उद्घाटन केले. याच वेळी या विमानतळाचे नाव बदलून ‘श्री गुरु रविदास जी विमानतळ, आदमपुर’ असे ठेवण्यात आले. संत गुरु रविदास यांच्या ६४९ व्या जयंतीच्या पवित्र दिवशी त्यांच्या स्मरणार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान महत्त्वाची रणनीतिक भूमिका बजावणाऱ्या पंजाबमधील आदमपूर विमानतळाचे नाव बदलण्यात आले आहे.
हा निर्णय संत गुरु रविदास यांच्या समता, करुणा, मानव प्रतिष्ठा आणि सामाजिक न्याय या मूल्यांना समर्पित असल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO) अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संत गुरु रविदास हे महान संत, कवी आणि सामाजिक सुधारक होते. त्यांच्या विचारांनी भारतीय समाजात समता, बंधुता आणि मानवाधिकारांची जाणीव अधिक बळकट केली.
हे ही वाचा:
‘विलिनीकरणाची चर्चा भाजपाला सांगितल्याशिवाय झालीच नसती!’
अर्थसंकल्पाच्याच वेळी सेन्सेक्स १५०० अंकानी कोसळला
“ममता बॅनर्जींच्या आदेशावरून हिंदूविरोधी टिप्पणी केली”
अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, संरक्षण, एआय आणि आरोग्यावर भर
PMO च्या निवेदनानुसार, या नावांतराचा उद्देश संत गुरु रविदास यांच्या शिकवणुकीचा आदर व्यक्त करणे तसेच त्यांचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवणे हा आहे. या निर्णयामुळे विमानतळाला केवळ नवीन ओळख मिळालेली नसून, त्यामागे असलेले सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वही अधोरेखित झाले आहे.
या निर्णयाचे राजकीय अर्थही लक्षवेधी मानले जात आहेत. गुरु रविदास यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर दलित समुदायात आढळतात. पंजाब तसेच उत्तर भारतातील राजकारणात हा समुदाय महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे हे नावांतर दलित समुदायाशी सकारात्मक संवाद साधण्याच्या आणि सामाजिक समावेशकतेचा संदेश देण्याच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.
आदमपुर विमानतळ हे जालंधर आणि होशियारपूर या शहरांना हवाई सेवा देणारे महत्त्वाचे केंद्र आहे. यासोबतच हे भारतीय वायुसेनेचेही एक प्रमुख विमानतळ आहे. विमानतळाला मिळालेल्या नव्या नावामुळे या परिसरात सामाजिक ऐक्य आणि समरसतेची भावना अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







