केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) छत्तीसगडमध्ये राबविलेल्या समन्वित नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान मोठी कारवाई करत शस्त्रसाठा जप्त केला आहे. कारवाई दरम्यान पोलीस दलाने नक्षलवाद्यांच्या आठ शस्त्रसाठे आणि स्फोटकांच्या ठिकाणांचा शोध लावला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी (१३ जून) दिली.
गुप्त माहितीच्या आधारे बिजापूर जिल्ह्यातील पिडिया आणि कुप्पागुडा परिसरातील अद्री, हर्रा आणि मदुमपारा गावांच्या घनदाट जंगलात सीआरपीएफने शोधमोहीम राबवली. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून कसून तपासणी केली. यावेळी शस्त्रे आणि स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. या कारवाईत एक बॅरल ग्रेनेड लाँचर (BGL) रायफल, एक ८ मिमी रायफल, एक १२-बोअर रायफल आणि २१ इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइसेस (IED) जप्त करण्यात आल्या. तसेच आयईडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही सापडले. यामध्ये कॉर्डेक्स वायर, सेफ्टी फ्यूज, इलेक्ट्रिक वायर, एअर गन राऊंड्स आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश आहे.
याशिवाय, नक्षलवाद्यांकडून वापरल्या जाणाऱ्या कपड्यांसह एकूण ५८ विविध वस्तू जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे परिसरात अस्थिरता निर्माण करण्याचा नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अद्री, हर्रा आणि मदुमपारा हा परिसर दीर्घकाळ नक्षलवादी कारवायांचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, सीआरपीएफच्या सातत्यपूर्ण मोहिमांमुळे नक्षलवाद्यांचा प्रभाव हळूहळू कमी होत असून स्थानिक नागरिकांचा विश्वास वाढत आहे. त्यामुळे विकासकामांनाही गती मिळत असल्याचे सांगितले जाते.
हे ही वाचा:
२०२७ मध्ये पराभव झाला तर सपा चंबळमध्ये जाईल : अखिलेश यादव
खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी पिन-स्टेपलर वापरण्यास बंदी
ज्याच्यावर जग हसले, त्यानेच इतिहास लिहिला!
अभिषेक बॅनर्जींच्या निवासस्थानी छापा
दरम्यान, गरियाबंद जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या आणखी एका कारवाईत सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने दंडईपानी जंगलात नक्षलवाद्यांचे आणखी एक संशयित ठिकाण शोधून काढले. बॉम्ब शोध व निकामी पथकाने (BDDS) येथे स्फोटकांची उपस्थिती निश्चित केली. यामध्ये ४ किलो वजनाचा प्रेशर आयईडी आणि कुकर आयईडी आढळून आले. दोन्ही स्फोटके सुरक्षितपणे निकामी करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कारवाईत एक भरमार रायफल, इंटरसेप्टर, यूबीजीएल राऊंड्स, मॅगझिन, कॉर्डेक्स वायर, दारुगोळा, फटाके, औषधे तसेच दैनंदिन वापरातील विविध वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत.







