समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल करत २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले की, “उत्तर प्रदेशातील आगामी निवडणूक आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर समाजवादी पक्ष २०२७ ची निवडणूक हरला, तर संपूर्ण समाजवादी पक्ष चंबळमध्ये जाईल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर निशाणा साधताना निवडणुकांमध्ये विविध सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला. लोकशाही प्रक्रियेवर दबाव निर्माण करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचे सांगत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी रुपयाच्या घसरणीवरूनही भाजपला लक्ष्य केले. “डॉलरचा दर जितका वाढेल तितका रुपया कमकुवत होईल आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. त्यामुळे चहासारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूही अधिक महाग होतील,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
खाद्यपदार्थांच्या पॅकिंगसाठी पिन-स्टेपलर वापरण्यास बंदी
बांगलादेशात प्रभू श्रीरामांच्या सर्वात मोठ्या मूर्तीचे बांधकाम थांबवलं
ज्याच्यावर जग हसले, त्यानेच इतिहास लिहिला!
रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या दोन माजी अधिकाऱ्यांना अटक
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक ठिकाणी नागरिकांनी हे मीटर काढून टाकल्याचा दावा करत त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीवर टीका केली. त्याचबरोबर भाजपमधील काही मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांनी सांगितले की, गैरव्यवहारामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही मंत्र्यांकडील महत्त्वाची खाती काढून घेतली आहेत. आगामी काळात अनेक भाजप आमदारांची तिकिटेही कापली जातील, असा दावाही त्यांनी केला.
पश्चिम बंगालच्या राजकारणाचा उल्लेख करत अखिलेश यादव यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरील कारवाईचा संदर्भ दिला. लोकप्रिय नेत्यांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना राजकीयदृष्ट्या त्रास देण्याची प्रवृत्ती देशात वाढत असल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारच्या कारवाया लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचा आरोप त्यांनी केला.
इंडिया आघाडीबाबत बोलताना अखिलेश यादव यांनी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट कायम ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. “भाजप ४०३ जागांसाठी तयारी करत आहे आणि आम्हीही ४०३ जागांवर तयारी करत आहोत. त्यामुळे इंडिया आघाडीची तयारी दुप्पट ताकदीने सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचाही त्यांनी उल्लेख केला.
भाजप नेत्यांच्या भाषाशैलीवरही त्यांनी आक्षेप घेतला. समाजवादी पक्षाने कधीही कोणाच्या भावना दुखावतील अशी भाषा वापरलेली नसल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या अनेक नेत्यांकडून राजकीय शिष्टाचाराच्या मर्यादा ओलांडल्या जात असल्याचा आरोप केला. लोकशाही व्यवस्थेत न शोभणारी भाषा वापरण्याची प्रवृत्ती वाढल्याचे ते म्हणाले.
परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकारला लक्ष्य करताना अखिलेश यादव यांनी पश्चिम आशियातील संघर्षाचा मुद्दा उपस्थित केला. भारतीय नाविकांच्या मृत्यूसाठी केंद्र सरकारच्या कमकुवत धोरणांना जबाबदार धरत त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच उत्तर प्रदेशात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीवरूनही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले. राज्यात मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त होत असल्याचे सांगत त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या या विधानांमुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.







