ठाकरे गटाचे सहा खासदार हे उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राजकीय हालचालींना वेग आलेला असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर टीका केली आहे. माध्यमांसमोर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली असून त्यांनी या खासदारांना राजीनामा देऊन उघडपणे एनडीएमध्ये सामील होण्याचे आव्हान दिले आहे.
ठाकरे गटाचे नऊ पैकी सहा खासदार फुटणार असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली. शिवीगाळ करत त्यांनी बंडखोर खासदारांवर टीका केली. तसेच आपण बोललेले वक्तव्य बीप करून दाखवू नये, अशा सूचनाही त्यांनी माध्यमांना दिल्या.
संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी आम्हाला भावासारखं वागवलं. बाळासाहेबांनी आम्हाला वडिलांसारखं प्रेम केलं. हे सा** भो*** लोकं कोण जातात हे, डोन्ट कट. कट मत करना ये. हे बेईमान आहेत. त्यांच्या रक्तात बेईमानी आहे. मी कोणत्या पार्टीचं आणि व्यक्तीचं नाव घेत नाही. सध्याच्या लोकशाही व्यवस्थेत, आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि लोकसभा अध्यक्षांची काय परिस्थिती आहे माहीत आहे.” पुढे ते म्हणाले की, शिवसेना आमची आई आहे. शिवसेनेशी बेईमानी करणार असेल तर सोडणार नाही. जे करायचं ते करा. हे खासदार पंतप्रधान मोदी किंवा एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर निवडून आलेले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले आहेत. मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. गद्दारी कराल तर याद राखा. काल रात्री १५ कोटी मिळाले. त्यानंतर चार्टेड फ्लॅटने नांदेड आणि पुण्यातून दिल्लीत आले.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षातून संभाव्य फुटीच्या चर्चा वाढत असताना, खासदारांना बाजू बदलण्यासाठी ५० कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राऊत म्हणाले की, पक्षात फूट पडल्याची कोणतीही अधिकृत माहिती पक्षाकडे नाही आणि काही खासदार वेगळे होत असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून कळत आहेत. ते म्हणाले की, ठाकरे गटाने कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, गुरुवारी होणाऱ्या संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी व्हीप जारी केला आहे आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून घटनात्मक तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
हे ही वाचा:
फ्रान्समध्ये आता भारतीय पर्यटकांना यूपीआयद्वारे थेट पेमेंटची सुविधा
ट्रम्प यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष; लेबनॉनवरील इस्रायली हल्ले सुरूच
दहशतवादी कट उधळला; शहजाद भट्टी नेटवर्कशी संबंधित सात जणांना अटक
आत्मनिर्भर भारताची विक्रमी भरारी! संरक्षण उत्पादन १.७८ लाख कोटींवर
संजय राऊत म्हणाले की, “जर कोणाला पक्ष सोडायचा असेल, तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा. ते आमच्या पक्षाच्या तिकिटावर आणि मतदारांनी निवडून दिल्यामुळेच संसदेत आले आहेत,” असे राऊत म्हणाले. ते पुढे म्हणाले की, रविवारी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या खासदारांच्या बैठकीत एका खासदाराने चार वेळा साईबाबांची शपथ घेतली, दुसऱ्याने देवी भवानीच्या नावाने शपथ घेतली, तर इतरांनी आपल्या मुलांची आणि आईची शपथ घेऊन आपण पक्षासोबत राहू असे सांगितले.
संजय राऊत यांनी असाही आरोप केला की, धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावर दबाव आणला जात आहे. राऊत म्हणाले की, निंबाळकर यांच्या वडिलांच्या २० वर्षे जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल बुधवारी लागणार होता आणि खासदारांना सांगण्यात आले होते की, जर त्यांना अनुकूल निकाल हवा असेल तर त्यांनी त्यांच्या गटात सामील व्हावे.







