पाकिस्तानातील पेशावरच्या बाहेरील भागात झालेल्या संशयित ड्रोन हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर त्याच कुटुंबातील सहा जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी उशिरा रात्री हसन खेल उपविभागातील पस्तावाना परिसरात घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉनने स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जखमी झालेले सातही जण एकाच कुटुंबातील होते. सुरुवातीला एका महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळाली होती. नंतर स्थानिकांनी सांगितले की, शेर मस्त आणि त्यांचा १५ वर्षीय मुलगा अद्याप पेशावरच्या लेडी रीडिंग रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर इतर जखमींना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
हसन खेलमधील एका स्थानिक ज्येष्ठ नागरिकाने शेर मस्त यांच्या सुनेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची पुष्टी केली. हा ड्रोन हल्ला कोणी केला आणि त्यामागील उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुरक्षा यंत्रणांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. उल्लेखनीय म्हणजे, एप्रिल महिन्यातही हसन खेल उपविभागातील चंदोका परिसरात झालेल्या संशयित ड्रोन हल्ल्यात एका मशिदीचे किरकोळ नुकसान झाले होते. मात्र, त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. चंदोका परिसर हा पेशावर आणि कोहाट यांच्या सीमेवर आहे.
हे ही वाचा:
हा प्रयोग भारतासाठी गेम चेंजर ठरणार…
30 जून ठाकरेंचं पतन आणि सचिन अहीर
ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहतांचे निधन, पंतप्रधानांकडून श्रद्धांजली
मुंबईत दमदार पाऊस सुरू, ऑरेंज अलर्ट, कोकणातही जोरधार
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे की, अफगाणिस्तानच्या सीमेलगतून बलुचिस्तानमध्ये मंगळवारी चार साधे (रुडिमेंटरी) ड्रोन पाठवण्यात आले होते. पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणेने वेळीच त्यांचा शोध घेऊन ते पाडले.
लष्कराच्या जनसंपर्क विभागाने (आयएसपीआर) सांगितले की, हे ड्रोन अफगाण तालिबान सरकारकडून अफगाणिस्तानच्या नियंत्रणाखालील भागातून कार्यरत दहशतवादी संघटनांना मिळणाऱ्या समर्थन आणि संरक्षण धोरणाचा भाग होते.
आयएसपीआरने म्हटले की, हवाई संरक्षण यंत्रणेने या सर्व ड्रोनचा तात्काळ शोध घेतला. सुरक्षा दलांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रतिकारात्मक उपायांचा वापर करून चारही ड्रोन यशस्वीपणे निष्प्रभ केले.
लष्कराच्या म्हणण्यानुसार, तातडीने करण्यात आलेल्या कारवाईमुळे कोणतेही नुकसान झाले नाही आणि सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात आले.
पाकिस्तानी लष्कराने असा आरोपही केला की, अफगाण तालिबान सरकारच्या अशा कारवाया त्यांच्या स्वतःच्या नागरिकांचे लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न आहेत. आयएसपीआरने म्हटले की, अशा बेजबाबदार वर्तनामुळे अफगाण जनतेच्या अडचणी आणखी वाढत आहेत.







