30 C
Mumbai
Saturday, September 5, 2026
घरसंपादकीयजीडीपीची चढती कमान अन् एक बिनडोक प्रश्न...

जीडीपीची चढती कमान अन् एक बिनडोक प्रश्न…

Google News Follow

Related

जगात युद्धाची धामधुम सुरू आहे. सागरी व्यापार मार्गाची कोंडी केली जात आहे. जागतिक अर्थकारणावर युद्धाचे गडद सावट असताना भारताच्या विकासदराची कमान चढती आहे. कोणत्याही देशभक्त व्यक्तिला अभिमान वाटेल, असे हे आकडे आहेत. विदेशी मीडियानेही भारताच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. वाढत्या जीडीपीमुळे इंडिया ‘इज डेड इकोनॉमी’, असे विधान करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची री ओढणारे भारतीय राजकारणातील राजपाल यादव अर्थात राहुल गांधी यांचे थोबाड पुन्हा एकदा फुटले आहे. देशाचे काही बरे होत असेल तर काँग्रेसला पोटदुखी होते. ही पोटदुखी काँग्रेसने कोणती लाज न बाळगता व्यक्तही केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली प्रतिक्रिया जीडीपी इतकीच दमदार आहे. ‘जागतिक अनिश्चिततेच्या काळात, तेलाच्या किमतीतील चढउतार, पुरवठा साखळीतील अडचणी असतानाही भारताने एवढी दमदार वाढ साध्य केली. यामागे देशातील जनतेची सामुहीक ताकद आणि योगदान आहे. निराशावादी भाकीते करणाऱ्यांचे अंदाज पुन्हा एकदा फोल ठरले आहेत.’

Doomsayer were doomed and India bloomed…yet again!

हे पंतप्रधानांचे वाक्य आहे. या वाक्याला शंभर तोफांची सलामी. पंतप्रधानांचा हा टोल फक्त राहुल गांधींना नाही, तो ट्रम्प यांनाही आहे. भारत गुडघ्यावर यावा, सरपटत अमेरिकेला शरण यावा ही ट्रम्प आणि त्यांच्या मंत्र्यांची इच्छा होती. ती पूर्ण होताना दिसत नाही. जून अखेरीस संपलेल्या पहिल्या तिमाहित भारतीय अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. या तिमाहीत विकासदरातील अपेक्षित वाढ ७ ते ७.३ टक्के इतका होता. तेलाचे चढे दर आणि पुरवठा साखळीतील अडथळे पार करत भारताने हे यश मिळवले, असे कौतूक फायनान्शिअल टाईम्स या ब्रिटीश वर्तमानपत्राने केले आहे.

सगळे जग कौतुक करत असताना काँग्रेसने मात्र तोंड आबंट केले आहे. विकासदराचे यश मान्य केले तर मोदींचे कौतूक करावे लागेल, त्यामुळे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा भारताच्या ७.८% जीडीपी वाढीवर शंका व्यक्त करून मोकळे झाले. त्यांनी काही बिनडोक प्रश्न उपस्थित केले.

आपल्याच देशाच्या प्रगतीवर जळजळ करणारे, देशाच्या यशावर पोटदुखी व्यक्त करणारे काँग्रेससारखे कर्मदरीद्री राजकीय पक्ष जगाच्या पाठीवर अन्य कुठे नसतील. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तानमध्ये असलेले आर्थिक अराजक भारतात नाही. चीनसारख्या मजबूत देशाचे अर्थकारण सुद्धा मंदावले आहे. अशा काळात भारताचा जीडीपी वाढतो आहे. होर्मजचे संकट नसते. तेलाच्या किमती स्थिर असत्या तर कदाचित भारताचा जीडीपी एक दिड टक्क्यांनी वधारला असता.

या वाढीचा फायदा नक्की कोणाला झाला? असा प्रश्न त्यांना पडला आहे. आपण केवळ काही नवे अब्जाधीश तयार केले आहेत का? केवळ मोठमोठ्या आकडेवारीवरून नव्हे, तर आर्थिक वाढीचा फायदा किती लोकांपर्यंत पोहोचतो यावरून तिचे मूल्यमापन झाले पाहिजे’, असे ते म्हणाले. ‘सर्वसामान्य नागरिकाला विचारले तर तो सांगेल की पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, अन्नधान्य आणि घरभाडे प्रचंड महाग झाले आहे आणि जगणे कठीण झाले आहे.’

हे ही वाचा:

नीट आंदोलनामधील विद्यार्थ्यांविरोधातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश

मल्लिकार्जुन खर्गेंबाबत अस्पृश्यता ? की विनाकारण कांगावा ?

हरियाणात भाविकांच्या पिकअपची ट्रकला जोरदार धडक; ६ जणांचा मृत्यू

पुण्यात रिक्षा प्रवास महागला; किमान भाडे ३० रुपये

पित्रोदांना हे ठाऊक नाही की देशातील उद्योग क्षेत्र मोठे झाले की, उद्योगपतीही मोठे होतात. शस्त्रांच्या, हेलिकॉप्टरच्या सौद्यात दलाली घेऊन किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून आलेली ती श्रीमंती नसते. त्यामुळे जेव्हा उद्योग क्षेत्र वाढते तेव्हा रोजगारही वाढतात. रोजगार वाढले की लोकांच्या खिशात पैसेही येतात. देशात अब्जाधीश वाढतायत तसे दारिद्र्य रेषे खाली असलेले लोक मोठ्या संख्येने वर येतायत. गेल्या १२ वर्षातला हा आकडा २५ कोटी आहे. काँग्रेसच्या लुटमारीमुळे देशात वाढत असलेली गरीबी झपाट्याने कमी होते आहे. काँग्रेसचे पाकिटमार राजकारणी ही बाब मान्य करत नाहीत आणि करणारही नाहीत.

असे म्हणतात की, जीडीपीमध्ये एक टक्का वाढ झाली की देशात १० लाख नवे रोजगार निर्माण होतात. जीडीपी नेमका कोणत्या क्षेत्रात वाढला यावरही रोजगारांची निर्मिती अवलंबून असते. पहिल्या तिमाहीत औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रात ९% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. मजबूत भांडवली गुंतवणुकीसोबतच आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा क्षेत्र १२.१% ने वाढले असून, या क्षेत्रांचे विकासदराच्या वाढीत भरीव योगदान आहे.

देशांतर्गत मजबूत मागणी, भांडवली गुंतवणूक आणि उत्पादनासाठी वापरण्यात येणारे उच्च तंत्रज्ञान याचा हातभार जीडीपीला लागलेला आहे. खाणकामातील मंदी (-२.४%) आणि प्राथमिक क्षेत्राची मंद कामगिरी या कमकुवत बाजू म्हणून अधोरेखित करण्यात आल्या आहेत. पहिल्या तिमाहीच्या मजबूत आकडेवारीनंतर, रॉयटर्सच्या अहवालानुसार प्रमुख वित्तीय संस्था आणि संशोधन संस्थांनी भारताचा संपूर्ण वर्षाचा जीडीपी वृद्धीचा अंदाज वाढवून तो ७.०% च्या आसपास निश्चित केला आहे.

अर्थकारणासमोर अनंत अडचणी आहेत. फक्त आखातात चाललेले युद्ध नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारताच्या विरोधात आर्थिक युद्ध छेडले आहे. टेरीफास्त्राचा वापर करून भारताचा व्यापार उदीम ठप्प होईल असे प्रयत्न केले आहेत. अमेरिकेत भारताची सर्वाधिक निर्यात होते. तिथे कोलदांडा घातला तर भारत आर्थिकदृष्ट्या गाळात जाईल यावर ट्रम्प यांचा प्रचंड विश्वास होता. त्यामुळे त्यांनी जमेल तेवढ्या काड्या केला. भारताची निर्यात कोलमडेल अशी व्यवस्था केली. तरीही भारताची आगेकूच सुरू आहे.

कारण अमेरिका दगाफटका करणार हे लक्षात आल्यानंतर भारताने युके, युरोपियन युनियन, युएई, ऑस्ट्रेलिया, ओमान सह ३८ देशांशी मुक्त व्यापार करार करून अमेरिकेच्या टगेगिरीला उत्तर दिले. भारताच्या निर्यातीसाठी मोठ्या संख्येने पर्याय शोधले. परिणामी २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताने ८६३ अब्ज डॉलरची निर्यात नोंदवली आहे. हा एक विक्रम आहे. २१ ऑगस्ट २०२६ च्या आकडेवारी नुसार भारताच्या तिजोरीत ७२९ अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी आहे. देशाची तिजोरी भरलेली आहे. निर्यात वाढते आहे. जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमती कडाडलेल्या असून सुद्धा भारतात या किमती स्थिर आहेत. आखाती युद्धामुळे जगभरात खतांची प्रचंड कमतरता निर्माण झाली आहे. किमती भडकल्या आहेत, परंतु भारतात मात्र खतांच्या किमती स्थिर आहेत. जगाच्या तुलनेत भारतात महागाईही आटोक्यात आहे. अर्थकारणावर नकारात्मक प्रभाव टाकणारे सगळे घटक निष्प्रभ करण्यात मोदी सरकारला यश आले आहे.

भारताचे आय़ात निर्यात धोरण अत्यंत आक्रमक आणि चतुर राहिलेले आहे. युरोप-अमेरिकेच्या दबावाला धुडकावून रशियाकडून आपण आज सर्वाधिक तेल विकत घेत आहोत. रशियाच्या रिफायनरी युक्रेनने उद्ध्वस्त केल्यानंतर आपल्याला कच्चे तेल विकणाऱ्या रशियाला आपण पेट्रोल-डिझेलची निर्यात करीत आहोत. तेलाच्या ८७ टक्के गरजेसाठी जगातील अन्य देशांवर अवलंबून असलेला भारत आज तेलाचा एक बडा निर्यातदार झाला आहे. हा चमत्कार आहे. तो मोदींमुळे झाला आहे. शस्त्र निर्यातीत आपण ३८ हजार कोटींचा टप्पा गाठला आहे. देशात जागतिक स्तराच्या शस्त्र निर्मितीला सुरूवात झालेली आहे. जगातील ८० ते १०० देशांना आपण शस्त्रांची निर्यात करीत आहोत. तरीही काँग्रेसवाल्यांच्या तोंडून कौतुकाचा एक शब्द बाहेर येणे तर सोडा, देशाची जितकी बदनामी होईल तितकी करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते करत आहेत. देशाच्या जीडीपी बाबत सॅम पित्रोदा या गांधी घराण्याचा पाळीव अमेरिकेत बसून बोलतो कारण ते जगाला ऐकू जावे, आणि जगात भारताच्या अर्थकारणाबाबत एक नकारात्मक वातावरण निर्माण व्हावे ही काँग्रेसची इच्छा आहे. असे काही होण्याची शक्यता नाही. कारण काँग्रेस नेत्यांची बौद्धिक कुवत आणि त्यांची देशविरोधी भूमिका आता जगाच्या व्यवस्थित लक्षात आली आहे. भारतीयांना ती आधीपासून ठाऊक आहे. म्हणून प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला अधिक खोलवर कसे बुडवता येईल असा प्रयत्न भारतीय मतदार करत असतो.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा