29.3 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरसंपादकीयदसऱ्याआधीच कॉकरोच दहन...

दसऱ्याआधीच कॉकरोच दहन…

Google News Follow

दिल्लीतील पितमपुरा येथे रामलीलेचे आयोजन करणाऱ्या केशव रामलीला कमिटीने दसऱ्याच्या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि इंद्रजितसह कॉकरोच पुतळ्याचे दहन करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु तामिळनाडूमध्ये विरोधी बाकावर बसलेल्या द्रमुक पक्षाने कॉकरोच जनता पार्टीचे आधीच दहन केले आहे. तेही पाठिंबा जाहीर करून. एखाद्या संघटनेच्या सगळ्या मागण्यांना पाठिंबा देऊनही त्यांची कबर कशी खणता येते, याचे उत्तम उदाहरण द्रमुकचे नेते एम.के.स्टॅलिन यांनी दिलेले आहे. जगभरात सध्या ज्या काही घटना घडतायत, त्या पाहता अराजकवाद्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पॅलेट गन चालवल्या तरीही जनता समर्थन करेल. दिपकेचे वाईट दिवस सुरू झालेले आहेत.

१७ ऑगस्ट रोजी द्रमुक खासदारांची बैठक झाली. लोकसभेचे २२ आणि राज्यसभेचे ८ खासदार यात सामील होते. पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी खासदारांना मार्गदर्शन केले. दोन महत्त्वाच्या घोषणा या बैठकीत करण्यात आल्या. पहिली घोषणा यापुढे काँग्रेससोबत जायचे नाही. दुसरी घोषणा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा. या दोन घोषणांचे अनेक अर्थ निघतात. द्रमुक काँग्रेससोबत जाणार नाही म्हणजे इंडिया आघाडीतही द्रमुक नसणार. बैठकीत तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरू करून द्रमुकने यावर शिक्कामोर्तब केले आहे. तिसरी आघाडी म्हणजे काँग्रेस आणि भाजपेतर पक्षांची मोट. तिसरी आघाडी स्थापन झाली तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कबर खणली जाईल. हा काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्या बेभरवशी राजकारणाला मोठा धक्का आहे. चुकीची रणनीती आणि अहंकारामुळे राहुल गांधी यांनी शत्रूंची संख्या वाढती ठेवलेली आहे. प.बंगालच्या निवडणुकांच्या आधी राहुल गांधी यांचा पंगा ममता बॅनर्जी यांच्याशी होता. या निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपाएवढाच विरोध ममतांचा केला होता. ममतांच्या कारभारामुळे भाजपाला संधी मिळाली, अशी टीका त्यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीनंतर विजय जोसेफ यांच्या टीव्हीके या पक्षाला मिठ्या मारून राहुल गांधी यांनी द्रमुकलाही दगा दिला.

द्रमुक आता इन्स्टॉलमेंटमध्ये त्याचा वचपा काढत राहणार. परंतु राहुल गांधी यांच्यापेक्षा जास्त धक्का अभिजीत दिपके आणि कॉकरोच जनता पार्टीला दिलेला आहे. वरकरणी हे विधान पटणार नाही. कारण द्रमुकच्या बैठकीत पक्षाने जाहीरपणे कॉकरोच जनता पार्टीला साथ देण्याची घोषणा केली. शिवाय स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनला विरोध, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा या मुद्द्यांना पाठिंबा दिलेला आहे.

या पाठिंब्यामुळे दिपके आणि टोळी अधिकच अडचणीत आलेली आहे. गेल्या काही दिवसांतील घडामोडींत एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे. स्वबळावर काहीही करण्याची ताकद या मंडळींमध्ये नाही. जंतर मंतरवरील पहिले आंदोलन यशस्वी झाले, त्यामागे आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची ताकद होती. जंतर मंतर पार्ट-२ फ्लॉप झाले. मुंबई, बंगळुरुतील आंदोलने साफ पडली. आशुतोष रांका आणि सौरव दास यांना अटक झाली. त्यांची तिहारमध्ये रवानगी झाली. दिपकेलाही अटक झाली. परंतु जनतेत कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. दिपकेला पाठिंबा देणारी एक पोस्ट राहुल गांधी यांनी केली. सीजेपीशी जवळीक निर्माण करण्याचे संकेत दिले. दिपकेनेही त्यांना ‘थँक्स’ असे उत्तर दिले.

हे शक्य झाले कारण दोघांची परिस्थिती वाईट आहे. दोघांना एकमेकांच्या टेकूची गरज आहे. कालपर्यंत दिपके हे केजरीवालांचे पाळीव पिल्लू आहे, हे ठाऊक असल्यामुळे राहुल गांधी त्याच्यापासून अंतर ठेवून होते. दिपकेही तेच करत होता. परंतु जंतर मंतर पार्ट-२ आंदोलनामध्ये आम आदमी पार्टीने एक भलामोठा तिरंगा घेऊन सीजेपीपेक्षा वेगळे आंदोलन केले. ते पोलिसांनी दिलेल्या चौकटीत केले. अत्यंत शांततापूर्ण मार्गाने केले. त्यामुळे सीजेपी एकाकी पडल्याचे चित्र होते.

दिपकेला केजरीवालांनी अडचणीत आणले. राहुल गांधी जनता सोबत नाही म्हणून अडचणीत आहेत. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मनातही आपण त्यांच्या पाठीशी फरफटत चाललो असल्याची भावना आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी आणि दिपके यांच्यात जवळीक होण्याची शक्यता दिसते आहे. ‘दोस्ती’ हा एक ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातला सुपरहिट सिनेमा, दोन मित्रांची कथा आहे. त्यातला एक पायाने दिव्यांग आणि एक अंध असतो. तशीच राहुल आणि दिपकेची दोस्ती शक्य होती. हे दोघे एकत्र येण्याची शक्यता असताना द्रमुकने कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा जाहीर केला आणि दोस्तीत बिब्बा घातला.

हे ही वाचा:

‘त्या’ पद्धतीने रिजिम चेंजवर आमचा विश्वास नाही!

टायगर गोळीबारप्रकरणी तिघांना रेल्वेत पकडले

टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी आरोपींचे धागेदोरे हाती; फडणवीसांची माहिती

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, इजा नाही

 

सीजेपीला फक्त भाजपाच्या विरोधात आंदोलन करायचे असते. तामिळनाडूमध्ये विजय जोसेफ यांच्या टीव्हीके या पक्षाची सत्ता आहे. तिथे कॉकरोच कशाला जातील? द्रमुकला तामिळनाडूच्या बाहेर कोणी विचारत नाही. त्यामुळे द्रमुकचा पाठिंबा हा कॉकरोच मंडळींसाठी घाट्याचा सौदा आहे. जर दिपके काँग्रेसच्या वळचणीला गेला तर द्रमुकचा त्याला पाठिंबा नसणार, ही गोष्ट उघड आहे. द्रमुक सोबत गेला तर राहुल गांधी त्याला दूर करतील. राहुल गांधींचा पाठिंबा हवा असेल तर सोबत त्यांचे राजकीय विरोधकही मिळणार, ही बाब स्पष्ट आहे. त्यात केजरीवाल यांचाही समावेश आहे.

 

दिपके आता जाळ्यात सापडला आहे. एखाद्याच्या पाठिंब्यामुळे तुमचा फायदाच होईल असे नाही. द्रमुकच्या पाठिंब्यानंतर यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे. कॉकरोच आंदोलनात सामील झालेल्या नेहा बोराने बांगलादेशमध्ये झालेले सत्तापरिवर्तन ही आमची प्रेरणा आहे, अशी हाळी दिल्यामुळे, प्रशांत भूषण यांनी रिजीम चेंजची बांग दिल्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा, एसआयआर आदी मुद्दे अगदीच निकामी झाले आहेत. खरा हेतू रिजीम चेंज हाच होता, हे जनतेच्या लक्षात आले आहे. सीजेपीच्या पाठीशी जनता नव्हतीच, आता तर ती अजिबात सोबत येणार नाही. आंदोलन केले तर तिहारमध्ये रवानगी निश्चित. फ्रान्स, इटलीत जे काही घडते आहे, ते आपल्या देशात नको हीच भारतीयांची मानसिकता आहे. त्यामुळे दिपकेच्या अडचणी वाढल्या आहेत. द्रमुकने दिपकेचा व्यवस्थित गेम केला आहे. द्रमुक आता पूर्वीप्रमाणे भाजपाविरोधी राजकारणात काँग्रेसला साथ देणार नाही, ही बाब उघड आहे.

भाजपाला लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेण्यासाठी, लोकसभेतील जागांची संख्या वाढवण्यासाठी, नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर करून घेण्यासाठी लोकसभेत, राज्यसभेत दोन-तृतीयांश मतांची गरज आहे. त्यासाठी भाजपाला द्रमुकची गरज आहे. द्रमुक एनडीएमध्ये सामील होणार नाही, ही बाब स्पष्ट आहे. कारण हिंदुत्व, सनातन धर्म, एसआयआरसारख्या अनेक मुद्द्यांबाबत भाजपा आणि द्रमुकची भूमिका परस्परविरोधी आहे. परंतु नारीशक्ती वंदन, लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि लोकसभेत जागांची संख्या वाढवणे या तिन्ही विधेयकांना पाठिंबा देण्यात त्यांना काहीच तोटा नाही. शिवाय राहुल गांधी यांचा वचपा काढण्याची संधी त्यांना मिळते. पडद्यामागे भाजपाशी काही डीलही होऊ शकते. त्यामुळे कॉकरोच ही द्रमुकसाठी गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.

जगभरात जे काही घडते आहे, ते पाहून भारतातील नागरिक धडे घेतो आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात झालेल्या तख्तापालटानंतर हिंदूंवर झालेले अनन्वित अत्याचार भारतातील हिंदूंनी पाहिले. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र, हरियाणाच्या निवडणुकांवर झाला. आज जे काही फ्रान्स, इटली आदी युरोपीय देशांत होत आहे, ते भीतीदायक आहे. रिजीम चेंजवाल्यांनी हे अराजक निर्माण केले आहे. ते चित्र पाहून भारतातील जनताही भयचकित झाली आहे. हे भारतात घडू नये म्हणून ती सजग आहे. भारतातील अराजकवादी आंदोलने रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी जर उद्या पॅलेट गन चालवल्या तर जनता त्याचेही समर्थन करेल. हेच सगळे सीजेपीच्या मुळावर येणार आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा